झिरो टॉलरन्स ! कुणी मुद्दाम त्रास देत असेल, तर त्याला सोडू नकोस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 07:30 AM2020-01-09T07:30:00+5:302020-01-09T07:30:06+5:30
माणसं असं स्वत:च्याच विशीकडे वळून पाहतात तेव्हा त्यांना फक्त आपल्या वयाचं नाही तर त्या वेळच्या आणि आजच्या समाजाचं आणि भोवतालातल्या बदललेल्या वास्तवाचंही बरंच काही सापडत जातं. ते सापडावं म्हणून हा ऑक्सिजनचा विशेष अंक
- स्वाती साठे
स्वाती. मी वीस वर्षाची होते, तेव्हा आजच्याइतकी जीवघेणी स्पर्धा नव्हती. आज स्पर्धाही मोठी आहे आणि कष्टही अधिक आहेत. त्यामुळे प्रशासनातच काम करणार असशील तर शासकीय सेवेत काम करतानाचे माझे अनुभव मी सांगेनच तुला. आपल्या हातून नकळत होणार्या चुका कशा टाळता येतील, त्याविषयीही बोलूच.
पण त्याहून महत्त्वाचं असं काही मला तुला सांगायचं आहे.
स्वतर्कडे दुर्लक्ष नको करू. तुझी तब्येत, तुझ्या आवडी-निवडी याकडे लक्षच द्यायचं नाही असं नको करू!
स्वतर्कडे लक्ष दे ! तब्येत, आवडी-निवडी, त्यासाठी वेळ देणं, स्वतर्साठी वेळ काढणं हे जमायला हवं. आपलं जगणं हा एक हॅपी बॅलन्स असला पाहिजे. व्यक्तिगत आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य यांचा नीट मेळ घाल, बॅलन्स कर दोन्ही. त्यातून आनंद घे. आनंदी राहा. ते महत्त्वाचं आहे.
आणि अजून एक, आता विशाखासारख्या कायद्यांमुळे कार्यालयीन ठिकाणी होणार्या सेक्शुअल अब्यूजशी लढता येऊ शकतं. त्यासाठी धोरण एकच, झिरो टॉलरन्स. चालतंच, होतंच, असं काहीही मनात आणायचं नाही. कामाच्या ठिकाणी त्रास होत असेल तर कायद्याची मदत घे. सोसायचं, सहन करायचं नाहीच.
आपण काम करतो तेव्हा अनेकदा आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. आपल्या पाठीमागे काय चर्चा होते, त्याकडे दुर्लक्ष कर; पण समोरून कुणी मुद्दाम त्रास देत असेल, तोंड वाजवत असेल तर धोरण एकच, झिरो टॉलरन्स. त्याला सोडू नकोस.
तुझ्याकडे कायद्यानं दिलेले अधिकार आहेत, हक्क आहेत. त्यांचा योग्य वापर करायला शिक. भरपूर काम कर. मनापासून काम कर. आणि आनंदी राहा.
(उपमहानिरीक्षक, मुख्यालय, कारागृह व सुधारसेवा)