जिथं समस्या आहेत तिथं जा, पैशासाठी स्वत:ला विकू नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 07:35 AM2020-01-09T07:35:59+5:302020-01-09T07:40:07+5:30
माणसं असं स्वत:च्याच विशीकडे वळून पाहतात तेव्हा त्यांना फक्त आपल्या वयाचं नाही तर त्या वेळच्या आणि आजच्या समाजाचं आणि भोवतालातल्या बदललेल्या वास्तवाचंही बरंच काही सापडत जातं. ते सापडावं म्हणून हा ऑक्सिजनचा विशेष अंक
- डॉ. अभय बंग
अभय,
वीस वर्षाच्या अभयशी बोलायचं ही गोष्टच मोठी कल्पनारम्य आहे. त्यामुळे त्याच्याशीच नाही तर त्याच्या वयाच्या, आज विशीत असलेल्या मुला-मुलींशीच थेट बोलायला मला आवडेल.
एक अगदी सुरुवातीला सांगतो, तू अतिशय भाग्यवान आहेस की तुला हे आयुष्य मिळालं आहे. त्यामुळे मी आजवर माझ्या आयुष्यात केलेल्या चुका तू जरूर कर; पण लवकर कर. चुका करण्यात साहस असतं. चुका होण्याच्या भीतीने जी माणसं ‘अचूक’ राहण्याचा प्रय} करतात ती दगड बनतात. त्यामुळे चुका करा, भरपूर चुका करा. त्यातून भरपूर शिका. भीत भीत जगू नका. जगायचं तर सिंहासारखं जगावं.
आयुष्य एकदाच मिळतं हे लक्षात घ्या. त्याला वन्समोअर नाही. आणि जर ते एकदाच मिळणार असेल तर ‘जगायचं कशासाठी?’ हा प्रश्न स्वतर्ला विचारा आणि त्याचं उत्तर विचारपूर्वक ठरवा.
मला वयाच्या 13 व्या वर्षी या प्रश्नाचं उत्तर सापडलं. ग्रामीण भागातलं आारोग्यमान सुधारण्यासाठी आपण काम करायचं हे माझं उत्तर होतं. त्या एका उत्तरानं माझ्या आयुष्याचं सोनं होऊन गेलं. हे जगण्याचं उद्दिष्ट मिळालं नसतं तर माझं काय झालं असतं? करिअरच्या, बाजाराच्या रानात भरकटलो असतो.
आयुष्य इतकं अमूल्य आहे की ते पैशासाठी विकू नका. आयुष्य एकच आहे, पैसा जगात भरपूर आहे. अनेकांकडे आहे. ठरवलं तर कमावताही येतो; पण पैशासाठी आयुष्य विकायचं हा ‘मूर्ख सौदा’ आहे. अर्थप्राप्तीसाठी जगू नका. अर्थपूर्ण जगा. सार्थक जगा.
आता तू विचारशील की हा असा जीवनाचा अर्थ कुठं शोधायला जाऊ?
- तर त्याचं उत्तर एकच, गो व्हेअर द प्रॉब्लेम्स आर, नॉट व्हेअर द फॅसिलिटीज आर.
जिथं समस्या आहेत तिथं कुणी जात नाही; जिथं सुविधा आहेत तिथं गर्दी आहे. त्या गर्दीत मलाही घ्या म्हणून अर्ज घेऊन त्या रांगेत शेवटी उभं राहणं म्हणजे आयुष्य वाया घालवणं आहे.
बघा एमपीएससीची तयारी सहा लाख मुलं करतात, दरवर्षी दोन-तीनशे जागा भरल्या जातात; पण सगळ्यांना तिथं जायचं, कारण प्रत्येकजण सरकारी खुर्चीवर बसू इच्छितो. खूर्ची म्हणजे सुविधा. त्या सुविधेसाठी स्पर्धा असते, इच्छुकांची गर्दी असते. मग आपण तिथं जावं जिथं कुणी जाऊ इच्छित नाही. तिथं गर्दी नाही.
पण त्या समस्या शोधणार कशा?
काही समस्या दूरच्या असतात, काही जवळच्या. आव्हानं पाहा, आवतीभोवती भरपूर आहेत.
शेतकरी आत्महत्या, कुपोषण, बालमृत्यू, छुपी बेरोजगारी, प्लॅस्टिक प्रदूषण, व्यसनं किती म्हणाल तेवढे आहेत. सगळे प्रॉब्लेम्स आपली वाट पाहत आहेत.
आणि काही तर आपल्या आतमध्ये आहेत. आपल्यात दडलेत.
आपण आणि अन्य हे कोण ठरवतं? आपल्या मनात आपण दुसर्यांना ‘अन्य’ ठरवतो. परक्यांचा द्वेष करतो. धर्मद्वेष आज पसरवला जातोय. इतर धर्मीय शत्रू आहेत असं वातावरण निर्माण केलं जातंय. दरी निर्माण केली जाते आहे. ते भयंकर विष आहे.
त्यातून तरुणांना स्वतर्लाच मुक्त करावं लागेल. आपल्या मनातून बाहेर काढावे लागतील हे भेद.
तिकडं ती ग्रेटा जगभरातल्या नेत्यांना जाब विचारते आहे, 16 वर्षाची मुलगी. पृथ्वी नावाचं जहाज बुडतंय. आणि आपण विचारतो सुरुवात कुठून करू?
या प्रश्नाचं एकच उत्तर सांगतो. जे उत्तर त्या म्हातार्याने कधीच देऊन ठेवलंय. त्याचीच आपण 150 वी जयंती साजरी केली. महात्मा गांधी म्हणत, बी द चेंज युवरसेल्फ यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड.
हेच ते उत्तर. करा सुरुवात स्वतर्पासून. बी द चेंज युवरसेल्फ!
( ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते)