सगळंच ठरवून, प्लॅनिंग केलेलं असेल तर काय मजा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 07:00 AM2020-01-09T07:00:00+5:302020-01-09T07:00:01+5:30

माणसं असं स्वत:च्याच विशीकडे वळून पाहतात तेव्हा त्यांना फक्त आपल्या वयाचं नाही तर त्या वेळच्या आणि आजच्या समाजाचं आणि भोवतालातल्या बदललेल्या वास्तवाचंही बरंच काही सापडत जातं. ते सापडावं म्हणून हा ऑक्सिजनचा विशेष अंक 

2020 - life's 20-20 - Writer Pranav sakhdev shares what he would like to share with his 20-year-old-self | सगळंच ठरवून, प्लॅनिंग केलेलं असेल तर काय मजा!

सगळंच ठरवून, प्लॅनिंग केलेलं असेल तर काय मजा!

Next
ठळक मुद्देआपल्याला आपल्या विशीत परत जाता आलं तर?  

- प्रणव सखदेव

मानेवर रुळणारे केस, अंगात घातलेलं आणि स्ट्रीट लाइटच्या प्रकाशात चमकणारं जॅकेट, त्याची मळकटलेली जीन्स पँट, पायातले जुनाट दिसणारे बूट.. 
त्यानं एकदा मागे वळून पाहिलं आणि मी दचकलोच! 
तो मीच होतो, हो मीच! 
विशीतला मी!  
किती वेगळाच दिसत होतो मी! म्हणजे समजा आत्ता जगासाठी मी फुलपाखरासारखा असेन, तर तो फुलपाखरू होण्याआधी असलेल्या सुरवंटासारखा होता. राकट, बेफिकीर, बेधडक. काहीसा अपरिपक्व, नाइव्ह.. 
इतका वेळ तो कोण आहे, याकडे माझं लक्षच गेलं नव्हतं. तो अगदी समोर उभा असूनदेखील. मी माझ्यातच गुरफटून गेलो होतो. माझी नोकरी, माझं आयुष्य, फ्रस्ट्रेशन्स, त्यातली दुर्‍खं, कंटाळा, लेखन, त्यातलं पॉलिटिक्स असल्याच गोष्टींवर त्याच्याशी बोलत बसलो होतो. माझी सगळी मळमळ, माझा सगळा राग बाहेर काढत होतो. 
आणि मग मी थोडा शांत झाल्यावर तो इतकंच म्हणाला, जस्ट फॉलो युअर ड्रीम्स! आणि मी गप्प झालो. एकदम गप्प! त्याने बेफिकिरीने, पण गांभीर्याने उच्चारलेलं ते वाक्य माझ्या कानात घुमत राहिलं.
मला प्रश्न पडला, काय आहेत माझी स्वप्नं? आपण आपलं सगळं फ्रस्ट्रेशन काढलं खरं, सगळ्या जगाला शिव्या दिल्या खर्‍या; पण आपल्याला काय करायचंय याचा विचार कुठे केला आपण? तसं तर एकच एक विचार घेऊन, एकच एक दिशा ठरवून मार्गक्र मण करणारे आपण कधीच नव्हतो, अगदी विशीतल्या ध्येयवेडय़ा वयातही नव्हतो! पण आत्ता आपण ‘काय नाहीये, सगळं कसं वाईट आहे’ हेच बोलत बसलोय. ‘काय करू शकतो’ किंवा ‘काय करायचंय’ हे बोलतच नाहीयोत; नव्हे त्याचा विचारदेखील करत नाहीयोत. एवढे सिनिकल कसे झालो आपण? एक ठरलेली दिशा नसली तरी, एक वाट तर निवडावी लागेलच ना आपल्याला. आणि त्या वाटेवरही फाटे, चोररस्ते लागतीलच की! म्हणजे भरकटणं आलंच, भटकणं आलंच! अज्ञातात बुडी मारणं आलंच. सगळंच ठरवून, छान प्लॅनिंग केलेलं असेल तर काय मजा! विशीतल्या आपण आत्ताच्या आपल्याला चंद्रशेखर सानेकर यांचा काय मस्त शेर ऐकवला होता –  
हेच भरकटणे 
उद्या होईलही माझी दिशा
फक्त माझा एकदा 
तारा चमकला पाहिजे.. 
या भरकटण्यातून कदाचित वेगळी वाटही सापडेल आपल्याला. कदाचित अलीबाबाची गुहाही सापडेल. कदाचित पडू-झडू. असंही वाट चुकणं किंवा भरकटणं हे सबजेक्टिव्ह असतं नेहमी! मुद्दा असतो तो पुढे जाण्याचा, प्रवास करत राहण्याचा!
तो दूर दूर निघून जात होता आणि मला त्याला काही केल्या भेटायचं होतं. मी धावत धावत जात त्याला गाठलं. 
त्याला विचारलं र्‍ तू इथे कसा? का?
तो र्‍ पण मी कुठे गेलोच नव्हतो, इथेच तर होतो.  
मी र्‍ पण मला कसा कधीच दिसला नाहीस ते?
तो र्‍ कारण तू तुझ्याच व्यापात बिझी होतास. मी तुला कितीतरी दिवसांपासून बोलवत होतो, पण तू लक्षच देत नव्हतास. मी तुझी वाट पाहत होतो इथे, बाटलीतल्या राक्षसासारखी. खूप हसलो तुला मी! पण मला माहीत होतं की, एक ना एक दिवस तुला मला ओ द्यावीच लागेल. चल, आता आपला खेळ सुरू झालाय..
मी र्‍ खेळ? कुठला?  
तो र्‍ पकडा-पकडीचा. तू माझ्यामागे धावत यायचं, मला पकडायचं.
मी र्‍ कुठवर?
तो र्‍ तिथवर. त्या वाळवंटार्पयत.. 
दूरवर चमकणार्‍या वाळूच्या टेकडय़ांकडे बोट दाखवत त्याने सांगितलं. आपण तिथे पोहोचलो की, तू मला पकडू शकशील. मधल्या प्रवासात आपल्याला नवी गावं, नवी माणसं, नवे प्राणी-पक्षी भेटतीलच. त्यांच्यासोबत चार दिवस घालवायचे नि पुन्हा पुढे निघायचं. एकदा का त्या वाळवंटात पोहोचलो की मी मुक्त! तिथे गेलो मी ढग होऊन जाईन आणि मनसोक्त बरसून घेईन!
माझा चेहरा उजळला; पण मग एक प्रश्न मनातून घरंगळत ओठांवर आलाच र्‍ त्यानंतर काय?
त्यानंतर?  कुणास ठाऊक! तो उत्तरला आणि हसायला लागला.  
मीही हसलो, विशीत असताना हसायचो अगदी तसंच.. मनमोकळं!


( सुप्रसिद्ध लेखक)

Web Title: 2020 - life's 20-20 - Writer Pranav sakhdev shares what he would like to share with his 20-year-old-self

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.