२५ मिनिटं शांतता

By admin | Published: March 1, 2017 01:40 PM2017-03-01T13:40:18+5:302017-03-01T13:40:18+5:30

अठरा.. एकोणीस.. वीस... बरोब्बर वीस पावलं झाली सरांनी सांगितलं तशी. आता? सांगितलंय तसं ‘तीन टाळ्या वाजेपर्यंत पंचवीस मिनिटं शांतता अनुभवायची. बाहेरची आणि आतली’ बघूया कसं किती जमतंय ते!

25 minutes silence | २५ मिनिटं शांतता

२५ मिनिटं शांतता

Next
>- प्रसाद सांडभोर
 
अठरा.. एकोणीस.. वीस... बरोब्बर वीस पावलं झाली सरांनी सांगितलं तशी.  आता? 
सांगितलंय तसं ‘तीन टाळ्या वाजेपर्यंत पंचवीस मिनिटं शांतता अनुभवायची. बाहेरची आणि आतली’ 
बघूया कसं किती जमतंय ते!
बाहेरून दाट वाटली होती ही झाडी, पण इथे उभं राहून अगदी मोकळं मोकळं वाटतंय रान. कसला आवाज होता तो? दिसत तर नाहीये काही अंधारात. सरांनी गॅरंटी दिलीय की इथे जंगली प्राणी नाहीयेत. कोल्हा, बिबट्या वगैरे नसेल. कुत्रा असता तर भुंकला असता. कदाचित झाडाची फांदी पडली असेल... 
श्या! केवढे विचार डोक्यात!
बास आता - एक, दोन, तीन- शांत.
खाली बसावं का जरा? पालापाचोळा आहे - त्यात काही असेल? साप, मुंगळे, मुंग्या? नको - उभंच राहूया. कपडेपण खराब होतील. अरेच्चा! 
...पुन्हा तेच - शांत रहायचंय. मनात काही विचार नको. 
सर असते सूचना द्यायला तर बरं होतं राव. सोप्प झालं असतं. 
हे वरचं झाड - निलगिरी आहे का? काय माहीत! 
- वर कसलं किती भारी दिसतंय. सगळ्या बाजूंनी झाडांची टोकं आणि मधे गडद निळं आकाश. झाडांची टोकं तेवढी हलताहेत मधून मधून. त्या टोकांवर बसून वाऱ्यासोबत डुलायला कसलं भारी वाटेल ना. शेजारून विमानं जातील, तारे पडतील. वरून खालचं सगळं कसं बरं दिसत असेल? पक्षी किंवा खार नाहीतर माकडांनाच माहीत! आत्ता कुणी वर असतील तर म्हणत असतील, हा कोण वेडोबा, असा वर पाहतोय! माझ्या डोक्यातले आवाज ऐकू जात असतील का त्यांना?
डोक्यात चाललंय तितकंच काय ते ध्वनिप्रदूषण. 
बाकी सगळं शांत आहे.- डोळे. कान. त्वचा. जिभ.
तीन टाळ्या वाजल्या? संपली वेळ? 
पंचवीस मिनिटं? इतक्या लवकर? 
श्या! आत्ता कुठे जमायला लागलं होतं यार ... 

sandbhorprasad@gmail.com 

Web Title: 25 minutes silence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.