बंडखोर सुलीचा एकाकी अंत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 12:47 PM2019-11-01T12:47:42+5:302019-11-01T12:49:15+5:30

ती अत्यंत लोकप्रिय. इन्स्टावर 50 लाख फॉलोअर्स तेवढीच बंडखोरही. नो मेकअप, नो ब्रा या तिच्या चळवळी खूप गाजल्या आणि..

25-year-old Korian -pop star, Sulli, found dead | बंडखोर सुलीचा एकाकी अंत?

बंडखोर सुलीचा एकाकी अंत?

Next
ठळक मुद्दे सुलीच्या जवळच्या मित्रांनी इस्टावर लिहिले आहे की, सुलीला डिसऑर्डर होता; पण ती आत्महत्या करेल असे त्यांनाही वाटलं नव्हतं.

-कलीम अजीम

दक्षिण कोरियाची प्रसिद्ध पॉप स्टार सुलीने वयाच्या 25व्या वर्षी जगातून निरोप घेतला. सुली केवळ इन्स्टा सेलिब्रिटी नव्हती तर फेमिनिस्ट चळवळीची बंडखोर तरुणी होती. कोरियाच्या भांडवलवादी उद्योगाच्या तिनं नाकी नऊ आणले होते. त्यामुळे साहजिकच तिच्या मृत्यूने दक्षिण आशिया राष्ट्रातील तिच्या फॉलोअर्समध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
कमी वयात कुणाला मृत्यू आला की हळहळ वाटतेच; पण मरणार्‍या व्यक्तीचे कर्तृत्व मोठे असेल तर तिच्यावर मृत्युलेख लिहिले जातात. 18 ऑक्टोबरला बीबीसीने सुलीवर एक दीर्घ मृत्युलेख लिहिला. शिवाय अन्य आघाडीच्या मीडिया हाउसनेदेखील सुलीवर लेख लिहिले. सुलीच्या आत्महत्येची बातमी शॉकिंग होती. एक बंडखोर तरुणी म्हणून सुलीला अल्पावधीत प्रसिद्धी मिळाली होती. एका म्युझिक इंडस्ट्रीशी सुली जोडलेली होती. तिच्या उत्तम आवाजाच्या मोहिनीने कोटय़वधी लोकांना जगण्याची ऊर्मी मिळाली होती.
प्रशिक्षणार्थीपासून प्रसिद्ध पॉपस्टार्पयतचा तिचा प्रवास फारसा रंजक नसला तरी प्रेरणादायी आहे. 29 मार्च 1994ला जन्मलेल्या सुलीचे खरे नाव ‘चोई जिन-री’ होते. 2005ला तिने एस.एम. इंटरटेन्मेंट कंपनीसाठी ऑडिशन दिले. त्यावेळी ती फक्त 11 वर्षाची होती. तिला कोरियातील सर्वात मोठय़ा म्युझिक कंपनीत ट्रेनर म्हणून काम मिळालं.
2009ला तिला के पॉप या कंपनीत मुलींच्या ग्रुपमध्ये गायनाची संधी मिळाली. अल्पावधीत पाच सदस्यांच्या गटाचा पहिला अल्बम ‘पिनोचिओ’ रिलिज झाला. काहीच दिवसात तो कोरियन संगीत चार्टमध्ये प्रथम स्थानावर आला आणि अशा रीतीने सुली के-पॉप गर्ल ग्रुपची एक मोठी सिंगर बनली. 2010 यूएस फेस्टिव्हलमध्ये या बॅण्डने आपल्या गायनाची जादू दाखवली. त्यानंतर या ग्रुपची ओळख जगाला झाली.
सुली के पॉप ग्रुपमध्ये पहिलीच स्वतंत्र विचाराची तरु णी होती. अनेकदा ग्रुपमधील सहकारी मित्रासोबत तिचा वाद होत असे. सहकारी मित्रांसोबत झालेल्या वादानंतर फ्रस्टेट होऊन तिने वर्षभरानंतर हा ग्रुप सोडला. याबद्दल तिने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत म्हटले होते माझ्याबद्दल पसरवल्या गेलेल्या संभ्रमित आणि खोटय़ा अफवांमुळे मला शारीरिक आणि मानसिक त्रास होत आहे.
बॅण्ड सोडल्यानंतर ती अ‍ॅक्टिंगकडे वळली. सुलीने टीव्हीमध्ये काम सुरू केलं. 2012मध्ये टेलिव्हिजन शो ‘टू द ब्यूटिफुल यू’च्या भूमिकेसाठी तिला न्यू स्टार अवॉर्डदेखील प्राप्त झाला. फॅशन किंग आणि रिअल या सिनेमातही ती झळकली.
वेगवेगळ्या चॅनलवर तिने अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभाग नोंदवला. चालू वर्षात तिचा एक टीव्ही शो खूप गाजला. ज्यात तिने ऑनलाइन ट्रोलिंग झालेल्या आणि हेट कॅम्पेनच्या बळी ठरलेल्या सेलिब्रिटींच्या मुलाखती घेतल्या होत्या. सुली सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह होती. इन्स्टावर तिचे 50 लाख फॉलोअर्स आहेत. अनेक विषयावर ती बेधडकपणे बोलत असे.
गेल्या महिन्यात तिने दक्षिण कोरियात ‘नो ब्रा’ चळवळ सुरू केली होती. पुरु षांच्या इच्छेप्रमाणे महिलांनी वेशभूषा का कराव्या, असा तिचा युक्तिवाद होता. पुरुषांच्या इच्छेसाठी आम्ही अंतवस्रं का घालावी, आम्ही ती नाकारतो; म्हणत तिने एक अनोखी चळवळ सुरू केली होती. दक्षिण कोरियातून या मोहिमेला भरपूर प्रतिसाद मिळाला. इन्स्टाग्रामवर सुरू केलेली ही चळवळ ट्विटर व फेसबुकवरून कोरियन रस्त्य़ावर आली होती. 
गेल्यावर्षी कोरियात ‘एस्केप द कॉर्सेट’, नो मेकअप  आणि लेडिज वॉशरूमधील गुप्त कॅमेर्‍याविरोधात मोठी चळवळ सुरू झाली होती. यातही सुलीचा सहभाग होता. मेकअप साहित्य आणि साधनांचा त्याग करणारी नो मेकअप मोहीम जगभरात चर्चेचा विषय झाली होती. त्याच्याच जोडीला ‘नो ब्रा’ चळवळ सुरू झाली. एकदम साध्या फोटोपासून सुरू झालेली ही मोहीम कोरियन कंपन्यांच्या अर्थकारणाला धक्का लावणारी ठरली.
या दोन्ही चळवळीने कोरियाचे सौंदर्य प्रसाधने बनविणार्‍या कंपन्यांवर संक्रांत आली होती. त्यामुळे सुली हेट कॅम्पेनची बळीदेखील ठरली होती. या अनोख्या मोहिमेमुळे तिच्यावर अनेक लांच्छनं लावली गेली. तिला ट्रोल करण्यात आलं. कॉर्पोरेट कंपन्यांच्या एजंटांनी तिला ट्रोल केलं असावं, अशी शक्यता तिच्या काही फॉलोअर्सनी व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ती मानसिक त्रासातून जात होती, असे तिच्या इन्स्टा स्टेट्सवरून लक्षात येते. आपल्याला पॅनिक डिसऑर्डरमुळे खूप त्नास होत आहे. या आजारामुळे मी एकटी पडली असून, कोणीही विचारपूस करत नाही, त्यामुळे अनेकवेळा आत्महत्या करण्याचा विचार येतो, असे तिने या स्टेट्समध्ये म्हटले होते.
तिच्या बेधुंद वागणुकीमुळे हा त्रास होत असल्याचे तिच्या काही जवळच्या मित्नांनी सांगितलं आहे. कोरिया टाइम्स या वृत्तापत्राने म्हटले आहे की, सुलीचा मॅनेजर तिला 13 ऑक्टोबरच्या रात्रीपासून फोन लावत होता. परंतु सुलीशी संपर्क होत नव्हते. दुसर्‍या दिवशी ज्यावेळी मॅनेजर घरी पोहोचला त्यावेळी सुली घरात मृतावस्थेत आढळली.
कोरिया हेरॉल्ड या अग्रणी दैनिकाने सुली ऑनलाइन ट्रोलिंगची बळी ठरली असावी, अशी शक्यता वर्तवली आहे. सुलीच्या मृतदेहाजवळ एक सुसाइट नोट मिळाली. परंतु पोलिसांनी त्याबाबत काहीच माहिती दिली नसल्याचे माध्यमं सांगतात. सुलीच्या जवळच्या मित्रांनी इस्टावर लिहिले आहे की, सुलीला डिसऑर्डर होता; पण ती आत्महत्या करेल असे त्यांनाही वाटलं नव्हतं.
खरं खोटं हे कळेलही लवकरच. कदाचित!

 

Web Title: 25-year-old Korian -pop star, Sulli, found dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.