3690 पत्रं, 700 हून अधिक ई-मेल्स आणि एकरंगी चर्चा!
By admin | Published: February 25, 2016 09:49 PM2016-02-25T21:49:17+5:302016-02-25T21:49:17+5:30
‘हुंडा’ घेणाऱ्या तरुण मुलग्यांसाठी ही चर्चा जाहीर केली, तेव्हा आम्हाला वाटलं होतं, की मुलं म्हणतील, ‘हद्दपारच व्हायला हवी ही प्रथा!’
‘हुंडा’ घेणाऱ्या तरुण मुलग्यांसाठी ही चर्चा जाहीर केली, तेव्हा आम्हाला वाटलं होतं, की मुलं म्हणतील, ‘हद्दपारच व्हायला हवी ही प्रथा!’
चर्चा मुलांसाठी असली, तरी अर्थात मुलींना त्यात सहभागाची संधी होतीच; मात्र मुख्यत्वे हुंड्याच्या संदर्भात तो घेताना किंवा त्यास नकार देताना तरूण मुलांचं काय म्हणणं असतं, एरवी स्वतंत्र-बेडर असलेली ही तरुण मुलं हुंडा घेतानाच एकदम वडीलधाऱ्यांची आज्ञाधारक बाळं का होतात? असा प्रश्न आम्ही विचारला होता.
तर मुलं म्हणाली, ‘काय चुकलं हुंडा घेतला तर? ग्रामीण भागात तर घ्यावच लागतो हुंडा!’
आणि आश्चर्य म्हणजे काही मुलींच्या पत्रांमधूनही लग्नातल्या चैनचंगळीचं समर्थनच लपलेलं दिसत होतं.
- आलेल्या पत्रांचा आणि ई-मेल्सचा ढीग उपसताना आमचे चेहेरे काळवंडत गेले, गोंधळात पडले आणि एका टप्प्यावर तर हुंड्याचं सरळसरळ समर्थन करणाऱ्या या इतक्या पत्रांचं, ई-मेल्सचं काय करावं, असा संभ्रमही पडला.
- अखेरीस जे हाती लागलं ते, जसं आहे तसं वाचकांसमोर मांडायचं ठरवलं.
पण, पुढला अंक वाचण्यापूर्वी काही खुलासे करून ठेवणं जरुरीचं आहे. ते असे :
* हा शास्त्रीय पद्धतीने केलेला सॅम्पल सर्व्हे नाही. त्यामुळे यातून हाती लागलेल्या निरीक्षणांना निष्कर्षांचा दर्जा देण्याची घाई न केलेली बरी.
* या अंकातली निरीक्षणं केवळ वाचकांनी लिहिलेल्या पत्रातून, ई-मेल्समधून दिसलेली वस्तुस्थिती आहे.
* या चर्चेत बहुसंख्य मुलं पत्र लिहून, काही ई-मेलद्वारे सहभागी झाली. बहुसंख्य मुलं आणि मुलीही मुख्यत्वे ग्रामीण, निमशहरी आणि छोट्या शहरांतली आहेत. त्यातुलनेने मोठ्या, मेट्रो शहरातील पत्रांचं प्रमाण या चर्चेत कमी दिसलं. त्यामुळे हे सर्वसमावेशक चित्र नाही.
* ज्यांना जबरदस्ती हुंडा द्यावा लागला किंवा हुंड्याची सक्ती अनुभवावी लागते आहे, ग्रामीण भागात ‘हुंडा’ या जटिल समस्येला सामोरं जावं लागत आहे, अशाच मुलींची आणि मुलांचीही बहुतांश पत्रं या चर्चेत वाचायला मिळाली. नव्या आणि आधुनिक जीवनशैलीचा स्वीकार करणारे तरुण-तरुणी मोठ्या संख्येने आहेत, याची आम्हाला जाणीव आहे. पण, त्यांचा सहभाग या चर्चेत नाही.
* या अंकातलं हुंड्याबद्दलचं सामाजिक वास्तव हे काहीसं एकरंगी चित्र आहे (म्हणजे असावं); पण हाही रंग अद्याप टिकून आहे एवढे मात्र आॅक्सिजनची टीम खात्रीने सांगू शकते.