इंटरनेट यूजर्सच्या 5 चुकीच्या सवयी
By admin | Published: November 27, 2015 09:23 PM2015-11-27T21:23:15+5:302015-11-27T21:23:15+5:30
आपण इंटरनेट वापरून ऑनलाइन ‘उद्योग’ करतो, पण त्यातून आपण कसे नि किती चुकीचं वागतो,
Next
>आपण इंटरनेट वापरून ऑनलाइन ‘उद्योग’ करतो,
पण त्यातून आपण कसे नि किती चुकीचं वागतो,
हे आपल्या लक्षात येतंय का?
तंत्र तर आपल्या हातात आलं पण ते वापरण्याचं ‘ज्ञान’ आलंय का?
आणि जर ते नसेल तर मग आपल्या हातातलं तंत्रच आपल्या मानगुटीवर बसण्याची शक्यता वाढेल, हे सांगायला कुडमुडय़ा ज्योतिष्याचीही गरज नाही!
सध्या झालंय तसंच आणि त्या आपल्या तंत्रअज्ञानतेवर शिक्कामोर्तब केलंय एका अलीकडच्या सव्र्हेनं!
इंटरनेट यूजर्सच्या घाणोरडय़ा, चुकीच्या सवयी अर्थात ‘वस्र्ट इंटरनेट हॅबिट्स’ असा एक सव्र्हे देशभरात अलीकडेच झाला.
‘टेलेनॉर इंडिया’च्या वतीनं हा सव्र्हे केला, त्यात इंटरनेट यूजर्सना अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यात अॅडिक्शन किती, ते खरंच आहे का, याचाही शोध होताच. नेट वापरताना काय आवडतं, काय आवडत नाही, या प्रश्नांच्या रांगेत बाकी बरेच प्रश्न होते. अर्थात अनेकजणांनी सांगितलं की, इंटरनेट आपल्या आयुष्यात आल्यानं आपल्या जगण्याच्या दर्जात चांगला बदल झाला, आपल्या जगण्याचा स्तर उंचावला, आपण जास्त कनेक्टेड झालो.
पण तरीही या सव्र्हेत सापडल्या काही इंटरनेट यूजर्सच्या वस्र्ट हॅबिट्स!
त्यातल्या पहिल्या 5 चुकीच्या सवयींची ही एक यादी.
कितीही नाही म्हटलं तरी यापैकी एक किंवा खरं तर त्याहूनही अधिक सवयी आपल्याही असतातच. आहेतच!
जरा ताडून पाहू, इतकंच!
1) खोटय़ा-नाटय़ा माहितीचे फॉरवर्डस
ही सगळ्यात वाईट खोड. जे येईल ते खातरजमा न करता, क्रॉसचेक न करता, न वाचताही अनेकदा फॉरवर्ड ठोकले जातात. आपण जी माहिती पसरवतो ती खरी आहे का? ती वाचून त्याचे इतरांवर काय परिणाम होतील? त्यामुळे धार्मिक-जातीय भावना भडकतील का? त्यातून गैरसमज पक्के होतील का? मुळात माहितीच एकांगी आणि चुकीची आहे का, हे सारे प्रश्न स्वत:ला न विचारता फॉरवर्ड ठोकणं ही सगळ्यात पहिली आणि सगळ्यात घातक आणि चुकीची सवय आहे.
2) गेम खेळण्याची आमंत्रणं
आपल्याला आवडत असतील गेम खेळायला; पण म्हणून सतत इतरांना या ना त्या गेम्सचे ऑनलाइन इन्व्हिटेशन्स पाठवणं, अगदी आपल्या बॉसपासून ते सन्माननीय लोकांनाही, ही अत्यंत गचाळ सवय आहे. आणि आपण चुकून असली आमंत्रणं पाठवतोय, हे अनेकांना लक्षातही येत नाही.
3)वाट्टेल ते शेअर
अनेकजण काय वाट्टेल ते शेअर करतात. ते वाचून आपल्याविषयी लोकांचं काय मत होईल, याचा विचारही न करता अनेकजण सोशल साइट्सवर काय वाट्टेल ते म्हणजे त्यात अश्लील गोष्टीही आल्या, शेअर करत सुटतात.
4) सहानुभूतीच्या पोस्ट
आज काय, बरं नाही, आज काय, पाणीच नाही आलं इथपासून ते अनेक सेण्टी पोस्ट शेअर करण्याचा आणि त्यातून सतत सहानुभूती मिळवण्याचा एक चाळाच काहीजणांना असतो. सतत सिम्पथी सिकिंग. सतत रडायचं. सतत प्रेमभंगी मूड!
हे लोक सतत अशाच पोस्ट शेअर करतात आणि मग त्यातून गोतावळा जमवतात.
5) हल्लेखोर काहीजण तर इंटरनेट हल्लेखोर झालेत. जरा आपल्या मनाविरुद्ध, विचारसरणीविरुद्ध पोस्ट दिसली की, याचं ट्रोलिंग सुरू, लगेच भडकतात, शिवीगाळ करतात, नको नको ते बोलतात, ही हल्लेखोरी अत्यंत भयाण आहे.
- निशांत महाजन