६ थिंकिंग हॅट्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 08:50 AM2018-05-24T08:50:20+5:302018-05-24T08:57:34+5:30
आपण चर्चा करतो, पण कामाचं बोलतो का? ते नेमकं, कामाचं आणि प्रभावी कसं बोलता येईल?
- प्रज्ञा शिदोरे
pradnya.shidore@gmail.com
तुम्ही एखाद्या गटात काम करत असताना, तुम्हाला असं कधी जाणवलं आहे का, की आपण उगीचच ‘मीटिंग, मीटिंग’ खेळत असतो. एखादं काम जे एका मेलने फत्ते होऊ शकत त्यासाठी लोक भेटतात, आणि मग भेटलोच आहोत तर इतरही काही मुद्दे बोलू म्हणून बोलायला लागतात. मूळ मुद्दा बाजूला राहतो आणि सगळ्यांचाच वेळ मात्र वाया जातो.
कॉर्पोरेट जग जसं वाढत गेलं तसं माणसानं परस्परांशी कसं वागावं, बोलावं यामध्येही बदल झाले; त्यापेक्षाही, माणसाने गटात कसं वागावं, आपली मतं प्रभावीपणे कशी मांडावी, याची एक नवीच विद्याशाखा उदयाला आली. मग लोकं जेव्हा एकत्र बसून एखाद्या गहन विषयावर चर्चा करत असतील, एखाद्या समस्येवर उपाय शोधात असतील तेव्हा ते कशा प्रकारे एकमेकांशी बोलले तर त्यांची ती चर्चा कशी प्रभावी होऊ शकते, ते योग्य निर्णयापर्यंत कसे येऊ शकतात या सर्व पद्धतीला एडवर्ड डी बोनोची ‘६ थिंकिंग हॅट्स’ पद्धत म्हटलं जातं. बोनोने १९८५ साली याविषयी पुस्तक लिहिलं आणि त्याला आजही व्यवस्थापनशास्त्रातील सर्वोत्तम पुस्तकांमध्ये गणलं जातं.
विचारांना आणि अर्थातच त्यामुळे चर्चेला योग्य दिशा मिळावी यासाठी ही थिंकिंग हॅट्सची पद्धत. प्रत्येक हॅट किंवा टोपीला विचारांची एक पद्धत किंवा दिशा मानलं गेलं आहे. गटामध्ये चर्चा करत असताना आपण प्रत्यक्ष अशा सहा रंगांच्या टोप्या घालायच्या आणि आपलं मत मांडायचं. अशा टोप्या घालणं विनोदी वाटत असेल तर आपलं म्हणणं हे कशाच्या पार्श्वभूमीवर आहे याची मांडणी करूनच मग बोलायला लागायचं.
विचारांच्या या सहा दिशा म्हणजे - माहितीपर, विषयाची पार्श्वभूमी, त्याबद्दलच्या भावना, काळजी करण्याची कारणं, विषयाची चांगली बाजू, विषयाकडे कल्पकतेने बघणं या पद्धतीने विचार केला तर आपल्या मेंदूला योग्य अशी चालना मिळते आणि प्रश्न लवकर सुटतात असा अनुभव आहे.
अनेक मॅनेजर्सच्या मते अशा पद्धतीमळे वेळ वाया जात नाही आणि चर्चा मुद्देसूद होते, चर्चेतून निष्पन्नही चांगलं होतं. लहान लहान गटामध्ये चर्चा सोप्या व्हाव्यात यासाठी ही पद्धत कशी वापराल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
आणि अधिक माहितीसाठी गुगल करून पाहा.
६ थिकिंग हॅट्स
https://www.youtube.com/watch?v=QJmoq1R3KVc