सहा अटेम्प्ट दिले आणि मग ठरवलं, आता थांबू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 04:12 PM2019-02-27T16:12:43+5:302019-02-27T16:13:53+5:30

बरेच लोक ‘कोण अधिकारी होण्याचे चान्सेस जास्त आहेत’ हे हेरून त्याच्या/तिच्यासोबत ‘कॅलक्युलेटेड लव अफेअर’ करताना दिसतात.

6 UPSc Attempts & full stop. story of a attempter. | सहा अटेम्प्ट दिले आणि मग ठरवलं, आता थांबू !

सहा अटेम्प्ट दिले आणि मग ठरवलं, आता थांबू !

Next
ठळक मुद्देजिथं ‘स्पर्धा’ असते, तिथं ‘ह्युमन एलिमेन्ट’ कमी-कमी होत जातो.

-शर्मिष्ठा  भोसले 

एसआयएसीमध्ये अधिकारीपदी असलेल्या अश्विनी आडिवरेकर यांनी मला गजानन वडजेचा संपर्क दिला होता. त्याला फोन केला, तर म्हणाला, ‘यशोदा डेअरीजवळ ये, मी तिथंच उभा असेन.’ 
मी पत्ता विचारत पोचले तर तो होताच तिथे. मध्यम उंची, गव्हाळ रंग, डोळ्यांवर स्कॉलरवाला चश्मा आणि चेहर्‍यावर मस्त मोकळं हसू.
आम्ही ‘ओल्ड राजेंदर नगर वॉक’ वर निघालो. गजानन आता माझा गाईड होता. कुठली-कुठली ठिकाणं दाखवत त्यांच्याबद्दल बोलत होता अखंड.
‘पूर्वी एक काळ होता तेव्हा इंजिनिअरिंगची क्र ेझ होती. मग एमबीएची आली. सध्या स्पर्धा परीक्षांचा बबल आहे हवेत. पण तो 2-3 वर्षात फुटणार! पूर्वी दहावीत गुणवत्तायादी असायची. ती बंद करण्यात आली. मग झळाळतं यश मिळवण्याचं जे ‘सायकॉलॉजिकल क्रेव्हिंग’ हुशार मुलांमध्ये साठून राहायला लागलं, ते त्यांना ‘स्पर्धा परीक्षा’ या प्रकाराकडे खेचून आणतंय असं वाटतं. स्वतर्‍च्या क्षमता पुरेपूर जोखण्याची, त्या जगाला दाखवण्याची संधी ही परीक्षा देते. ती संधी एक तरु ण म्हणून घेतलीच पाहिजे. पण एक महत्त्वाचं कळलं पाहिजे, ‘कुठं थांबायचं!’ तयारीला कितव्या वर्षी सुरुवात करायची हे सतत सांगितलं जातं. पण कितव्या वर्षी थांबायचं त्याचं काय? पोरगा आपला अटेम्प्टवर अटेम्प्ट देत राहतो. ‘आता केलेला अभ्यास वाया जाईल, एवढा एकच शेवटचा प्रयत्न करू’ या मोहाला बळी पडतो. शिवाय ‘ग्रेसफुल एक्झीट’ घेण्याची संधी तरी कुठं असते? त्यानं स्पर्धापरीक्षा सोडली तर भोवतालचे लोक त्याला सतत चिडवत-डिवचत राहणार. बरं चल आपण चहा घेऊ. मी माझीपण गोष्ट सांगतो तुला,’ असं म्हणत गजानन मला चहा प्यायला घेऊन गेला. 
गजानननं 2011-12 साली स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. तोवर बी.ई. झालेलं होतं. घरी अडचणी होत्या म्हणून पाचेक र्वष नोकरी केली. त्यातला वर्षभर अमेरिकेतही होता. या काळात भाऊ-बहिणी यांचं शिक्षण-लग्नं-नोकर्‍या असं झालं. मग मात्न डोक्यातला युपीएससीचा किडा स्वस्थ बसू देईना. मुंबईत नोकरी करतानाच एक विकेन्ड क्लास त्याने जॉईन केला होता. तो फ्रॉड निघाला. काही हजाराला बुडाला. पुन्हा सगळी बचत खर्च केली. पहिली प्री दिली 2012 ला. मित्नपण ‘होईल रे तुझं’ असं म्हणत भुलवायचे. 2013 ला अचानक युपीएससीचा सिलॅबसच बदलला. गजाननसकट अनेकांना त्या काळात प्रचंड निराशा आली. त्याच्या एका मित्नाच्या वडिलांनी तर त्यांची शेती विकून त्याला दिल्लीत पाठवलेलं. तो रडायलाच लागला, अशी सगळी कथा.
गजानन सांगत होता, ‘ मी सहा अटेम्प्ट दिले, आणि मग ठरवलं, आता थांबू या. तसंही मी सुरुवात केली, तेव्हा वयोमर्यादेनुसार तितकेच अटेम्प्ट उरले होते. सध्या मी एका एनजीओमध्ये नोकरी करतो शिवाय ऑनलाइन टेस्ट सिरीजचे पेपर भारतभरातल्या मुलांना तपासून देतो. माझं छान चाललंय.’
स्पर्धा परीक्षांसाठी क्वालिफाय न झालेले अनेक जण बॅँकिंग, एलआयसी, तलाठी अशा सगळ्या परीक्षा देत राहतात. तिथंही अपयश आलं, तर त्यांचा आत्मविश्वास पारच ढासळतो. घरी जाऊन पुन्हा शेती, व्यवसाय यांत मन लागत नाही. पुन्हा लग्नाचाही प्रश्न असतोच. इथं येणार्‍या अनेकांच्या प्रसंगी जोडय़ाही जुळतात, असं गजानन मिश्कील हसत सांगत होता. रॅन्क मिळवून किंवा न मिळवताही लग्न करून गावी जाणारे बरेच आहेत. बरेच लोक ‘कोण अधिकारी होण्याचे चान्सेस जास्त आहेत’ हे हेरून त्याच्या/तिच्यासोबत ‘कॅलक्युलेटेड लव अफेअर’ करताना दिसतात. 
गजानन हसून म्हणतो, ‘एकूण सगळी गंमत आहे! इथं एका चिंचोळ्या-अंधार्‍या खोलीत राहणारी बिचारी सात-आठ पोरं आहेत, तसा 3 बीएचकेमध्ये राहणारा ‘बडे बापका बेटा’ही इथेच आहे. कसंय, जिथं ‘स्पर्धा’ असते, तिथं ‘ह्युमन एलिमेन्ट’ कमी-कमी होत जातो. एकमेकांचा हेवा, अस्वस्थता, नैराश्य हे त्याचे साइड इफेक्ट्स! मग पोरं सिगारेट दारूच काय, अगदी चरस-गांजालाही बळी पडतात. इथली अस्वस्थता हेरून माफियांनी सगळं चोरीछुपे उपलब्ध करून दिलंय!’ 
गजानन आणि आदेश मुळे या दोघांनी iasdelhi.org नावाची वेबसाईट वर्षभरापूर्वी सुरू केलीय. ‘आमचं इथं आल्यावर अनेक प्रकारे खूप शोषण झालं. शोषण सध्याही अटळ आहे. पण आता येणार्‍या नव्या पोरांचं शोषण जरा कमी व्हावं म्हणून आमचा हा प्रयत्न आहे.’ - तो सांगतो, आणि हसताहसता गंभीर होऊन जातो एकदम.
**

(...पुढे ? वाचा  उद्या इथेच .. )

क्रमशः भाग 5

( लोकमत  दीपोत्सव  २०१८  दिवाळी  अंकात  "स्वप्नांचे  गॅस  चेंबर" हा लेख  प्रसिद्ध झाला आहे. )

Web Title: 6 UPSc Attempts & full stop. story of a attempter.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.