6500 किलोमीटर 46 दिवस आणि 2 मुली सायकलवर भारतभ्रमणाला जातात तेव्हा.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 03:00 AM2018-07-05T03:00:00+5:302018-07-05T03:00:00+5:30
उत्कर्षा बारभाई आणि वैष्णवी भुजबळ. वय अनुक्रमे 21 आणि 19 वर्षे. दोघी पुण्याच्या. भारतभ्रमणाला निघाल्या. तेही सायकलवरुन. कसा घडला हा प्रवास?
-नेहा सराफ
हा देश महिलांसाठी सुरक्षित नाही. अगदी सिरिया, अफगाणिस्तानपेक्षाही भारतातली स्थिती भयावह आहे असा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. त्याविषयी उलटसुलट चर्चाही झाली. त्यात होता होईतो मुलींनी सातच्या आत घरात यावं म्हणजे त्या सुरक्षित राहतील अशी एक जुनाट मानसिकता आपल्याकडे डोकं वर काढू लागली आहे. ‘चार भिंतीतच राहिल्या मुली तर बरं, त्या फार ‘प्रेशिअस’ आहेत’ असे भावनिक तडका मारलेले व्हॉट्सअॅप मेसेजेस तर डोळे झाकून फॉरवर्ड केले जात आहेत. एकूण वातावरण एक तर या टोकाचं किंवा त्या टोकाचं.
त्यात या दोन मुली भेटल्या. पुण्याच्याच. जेमतेम विशीतल्या. कायद्यानं नुकत्याच सज्ञान झालेल्या. एक 21 वर्षाची तर एक फक्त 19 वर्षाची. या दोन तरुणी चक्क सायकल घेऊन घराबाहेर पडल्या आणि सायकलवरुन भारत परिक्रमाच करुन आल्या. नुकत्याच पुण्यात पोहचल्या आणि त्यांच्या या सायकल परिक्रमेविषयी गप्पा मारायच्या म्हणून त्यांना गाठलं. विचारलं की असा देश फिरायचा, पहायचा म्हणून थेट दोघीच कशा निघाल्या, भीतीबिती नाही का वाटली? आणि घरचे? ते बरे तयार झाले? असे एकाहून एक अवघड प्रश्न माझ्या डोक्यात असताना त्या मुलींची उत्तरं मात्र अगदी सोपी, सहज होती.
उत्कर्षा बारभाई आणि वैष्णवी भुजबळ. उत्कर्षा इंजिनिअरिंगच्या दुसर्या वर्षाला शिकतेय तर वैष्णवी बी.एस.सीच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी. ज्या वयात मुली मैत्रिणींच्या कळपातच फिरतात, शॉपिंग किंवा पिरलासुद्धा सहसा एकटं जात नाही, मैत्रिणी येणार नसतील तर आपणही कॉलेजला दांडी मारतात, त्या वयातल्या या मुली. दोघीच. तेही सायकलवर! देशाच्या चारी टोकांना जोडणार्या रस्त्यानं प्रवास करत निघाल्या. प्रवास फक्त 6 हजार 500 किलोमीटर, 46 दिवस, सायकल चालवत, हे ऐकतानाही धाप लागते.
त्यांना विचारलं, हे सुचलं कसं?
त्या सांगतात, एकीकडे देश कठुआ अत्याचारानं ढवळून निघत होता, दुसरीकडे मुलींनी रात्नी उशिरा बाहेर पडायला नको, संध्याकाळी लवकर घरी परतायला हवं, असे विचारही मांडले जात होते. पण त्याचवेळी वाटलं, मुलींनी एखादा रस्ता निवडून पुढं जायचं ठरवलं तर त्यांना तो अमलात आणायचं स्वातंत्र्य का नसावं?
त्याच काळात या सायकल परिक्रमेची कल्पना वैष्णवीच्या डोक्यात आली. उत्कर्षाची आणि तिची काही कॉमन मित्रमैत्रिणींमुळे ओळख होतीच. वैष्णवीनं उत्कर्षाला ही कल्पना सांगितली. तीही तयार झाली. भारताच्या चार टोकांना जोडणार्या प्रवासाला जायचं ही कल्पना मूळ धरु लागली. सुरुवातीला सायकलपेक्षा बाईकवर हा प्रवास करावा असाही विचार त्यांच्या मनात होता, पण हा प्रवास एक दोन आठवडय़ात पूर्ण होईल आणि रस्त्यावर असणारी गावं, तिथलं जगणं, माणसांना भेटणं, अनेक नवीन गोष्टी बघण्याचं राहून जाईल असं वाटलं म्हणून सायकलनं प्रवास करायचं ठरवलं. वैष्णवी बॉक्सिंग करते, त्यात ती राष्ट्रीय स्तरावर चमकलेली आहे. उत्कर्षा तर बाईक रेसर आहे. त्यामुळे दोघींकडे खिलाडूवृत्ती आणि आव्हान स्वीकारण्याची धमक होतीच, त्यांनी हे आव्हान मग स्वतर्हूनच निवडलं.
पहिलं आव्हान तर घरातच उभं होतं, मोठी परीक्षा घरातच द्यायची होती. या प्रवासासाठी घरच्यांची परवानगी हवी होती. दोन ‘एकटय़ा’ मुली सायकलवर फिरायला जातो म्हणतात या कल्पनेला घरचे तरी कशी चटकन परवानगी देणार होते? त्यांना काळजी वाटणं साहजिकच होतं, पण या मुलींनी घरच्यांना आपली कल्पना शांतपणे समजावून सांगितली. आपण कोणत्या मार्गानं जाणार हे नीट सांगितलं, त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं शांतपणे उत्तर दिलं, शंकांचं समाधानही केलं. घरचेही मग तयार झाले, मात्र त्यांची एक अट होती. ते म्हणाले, परवानगी देतो, पण मुलींसाठी सुरक्षित नसलेल्या बिहार, उत्तर प्रदेशात जायचं नाही. ती दोन राज्यं तुमच्या मार्गातून वगळा. पण या दोघी आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या, म्हणाल्या, आम्हाला जाऊ द्या, पाहू द्या त्या राज्यात आमच्याच वयाच्या मुली कशा जगतात? कसं आहे वातावरण? तिथं तर जायलाच हवं. शेवटी मुलींपुढे पालक नमले आणि प्रवासाची परवानगी मिळाली.
पण सायकलवरुन रोज प्रवास ही सोपी गोष्ट नव्हती. सायकलवरून पन्नास- शंभर किलोमीटरची सहल एखाद्या दिवशी करणं काही अशक्य नाही, पण देश पालथा घालायचा तर रोज सायकल चालवायला हवी. ती फक्त चालवता नाही, तर दुरुस्तही करता यायला हवी. हाच विचार करून या दोघींनी मग सायकलचं पंक्चर काढणं, दुरुस्ती करणं यासारख्या गोष्टी शिकून घेतल्या. सायकलवर 20 किलो वजन घेऊन प्रवासाचा सराव केला. तीन महिने सराव केल्यावर त्यांचा आत्मविश्वास वाढला. 16 मे 2018 रोजी त्यांनी आपल्या मोहिमेचा प्रारंभ केला.
ठरलेला मार्ग आणि नियोजित दिवस यांचं गणित सांभाळायचं तर रोज कमीतकमी 150 किलोमीटरचं अंतर कापणं भाग होतं. हा एवढा प्रवास अनेकदा अंत बघायचा. तासन्तास प्रवास आणि वाटेत एकही हॉटेल नाही, थांबायचं विसाव्याला तर जागा नाही, असे अनुभवही आले. राजस्थानमध्ये 46 डिग्री तापमानात त्यांनी रात्नी प्रवास केला. एकदा तर चक्क दुपारी रस्त्यात थांबून झाडाखाली झोप काढली. आजूबाजूचे लोक त्यांच्या राज्यात कधीही न दिसणारं दृश्य बघत होते. अनेक ठिकाणी त्यांना संध्याकाळी महिला बाहेरही दिसल्या नाहीत. मुक्काम केलेल्या ठिकणी स्थानिक महिलांशी त्यांच्या गप्पा व्हायच्या. दोनच मुली सायकलवरुन देशभर फिरताहेत याचं बाकीच्या बायकांना अप्रूप वाटायचं.
एकदा संध्याकाळी उदयपूरहून निघाल्यावर पुढे 100 किलोमीटर अंतरार्पयत एकही ढाबा नाही अशी त्यांना माहिती मिळाली. सायंकाळ होत आली होती, मग त्या माघारी फिरल्या. ही संपूर्ण रात्न त्यांनी एका ढाब्यावर बसून काढली. पहाटेला उजाडलं आणि त्यांनी पुन्हा सायकलिंगला सुरुवात केली.
ज्या उत्तर प्रदेश, बिहारमध्ये महिलांवर अत्याचार होतात असं म्हटलं जातं, जिथं जाऊ नका म्हणून घरचेही हटून बसले होते. तिथला अनुभव कसा होता, असं विचारलं तर त्या म्हणाल्या, तिथल्या माणसांनी जितक्या आपुलकीनं आमचं स्वागत केलं, मदत केली तसा अनुभव इतर राज्यात आला नाही. आमचा फिरण्याचा उद्देश सांगितला तेव्हा तर अनेकांनी स्वतर्हून जेवायचा आग्रह केला. आवजरुन जेवायला वाढलं, पाणी दिलं. बिहारमध्ये असताना एका हॉटेलवाल्या काकांनी थांबवलं आणि गॉगल, जॅकेटमुळे मुलं समजून चौकशीला सुरुवात केली. मग त्यांना कळलं की या मुली आहेत आणि दोघीच एवढा लांबचा प्रवास करताहेत, मग तर त्यांनी जास्तच प्रेमानं नाश्ता खाऊ घातला. पुढच्या प्रवासात काळजी घ्या म्हणत मायेनं निरोप दिला.
उत्तर प्रदेशात रस्त्यात काही मुली भेटल्या. आमच्याच वयाच्या. त्यांच्याशी गप्पा झाल्या. सहज बोलताना म्हंटलं, तुमच्याकडच्या बातम्या नेहमी वाचतो आम्ही. त्यावर एक मुलगी पटकन म्हणाली, आप लोग हमेशा क्यों सोचते हो की, युपी-बिहारके लोग गुनहगार क्यूं है? इथेही आम्ही जगतो ना, सुरक्षित वाटतं. गरिबी असली तरी शिक्षण सुरु झालं आहे, गोष्टी बदलतील हळूहळू असं त्यांचं मत होतं. उरलेल्या भारतानं आमच्याकडे बदललेल्या नजरेनं बघावं अशी आमची इच्छा आहे. ते सांगा तुमच्या भागात लोकांना, असं त्या मुली म्हणत होत्या. वाराणसीच्या रस्त्यावर तर एका काकूंनी त्यांना कुतुहलाने घरात बोलावलं. कुठून आलात, कुठे जाणार विचारत थंड पाणी दिलं, थोडा वेळ इथे आराम करा असा आग्रहही केला. माणसांनी मायेनं केलेल्या मदतीच्या, चौकशीच्या, आपुलकीच्या अशा अनेक गोष्टी या मुलींकडे आहेत.
प्रवासात काही वाईट अनुभव आले का असं विचारलं तर त्या सांगतात, एकदा बेळगावच्या घाटात एका ट्रक चालकानं आम्हाला आपुलकीनं विचारलं कुठे जायचं? का आलात? त्या ट्रकचा नंबर एमएच 12 असल्यानं हा आपल्याच भागातला आहे असं वाटलं म्हणून आम्हीही त्याच्याशी बोललो. पण काही वेळानं लक्षात आलं की तो ट्रक ड्रायव्हर आमचा पाठलाग करतोय. तब्बल दोन तास तो आमच्या मागे होता. पुढे मग निघून गेला. हा एकच अनुभव, नंतर मात्र असा काही वाईट अनुभव आला नाही.
फक्त अनेकदा प्रवासामागचा हेतु सांगितला तर काहीजण कौतुकानं, कुतुहलानं बघायचे. काहीजण शेरेही मारायचे की, कशासाठी एवढा खटाटोप?
मात्र हे सारे कडूगोड अनुभव घेत त्या सायकल चालवत राहिल्या. आणि साडेसहा हजार किलोमीटर प्रवास करुन घरी परतल्या.
या सगळ्या प्रवासात त्यांनी सोशल मीडीयावरही प्रवासाचे फोटो आणि अपडेट्स आवर्जून टाकले. खास या प्रवासासाठी तयार केलेल्या व्हॉट्स अॅपग्रुपवरून त्या घरच्यांच्या संपर्कात होत्याच. एक जुलैला त्या पुण्यात परतल्या तेव्हा स्वागतासाठी त्यांचे सगळे मित्न-मैत्रिणी, कुटुंबीय हजर होते. ते स्वागत, तो आनंद फार वेगळाच होता असं त्या सांगतात.
मनात आलेला एक विचार जगून दाखवण्याची हिंमत या दोन मुलींनी केली. त्या हिंमतीचं कौतुक करायला हवं.
(नेहा ‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीत वार्ताहर आहे. )