7 दिवस आणि 70 प्रश्न
By admin | Published: July 23, 2015 06:18 PM2015-07-23T18:18:29+5:302015-07-23T18:18:29+5:30
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या सोनाळे गावात मी एक आठवडा काम करण्यासाठी गेलो. पाणलोट विकासाचं काम होतं. ‘पाणलोट’ हा शब्द खूपदा ऐकलेला होता.
Next
- निखिल जोशी
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या सोनाळे गावात मी एक आठवडा काम करण्यासाठी गेलो. पाणलोट विकासाचं काम होतं. ‘पाणलोट’ हा शब्द खूपदा ऐकलेला होता. पण तिथं गेल्यावर या शब्दाचे नवे पैलू कळले. त्याहून महत्त्वाचं म्हणजे दुष्काळ, शेती आणि खेडय़ातल्या इतरही समस्यांबद्दल डोळेच उघडले.
सोनाळे गावात काम करताना माङया लक्षात आलं, की ‘दुष्काळ’ असा सहज दिसत नाही, पण तो सर्वत्रच आहे. एका बाजूला गावाच्या मध्यवर्ती भागातील हौद पाण्याने भरला होता. गावाच्या टाकीत पाणी होतं. गावात नळ होते; मात्र दुस:या बाजूला नळाला पाच दिवसांतून एकदा पाणी यायचं. अंघोळीसारख्या क्षुल्लक गोष्टीचं खूप प्लॅनिंग करायला लागायचं. एरवी शहरात काय नळ सोडला की अंघोळ पण इथं त्या पाण्याचाही खूप विचार करायला लागायचा. पाण्याअभावी आम्हाला भेटलेले सर्वच शेतकरी आपलं प्रचंड नुकसान झाल्याचं सांगायचे. सरासरी उत्पन्नाच्या 1क् ते 2क् टक्केच उत्पन्न झाल्याचे ते सांगत. दुष्काळ ही गुंतागुंतीची प्रक्रि या असल्याचं लक्षात येऊ लागलं.
शेतात पडणारं पावसाचं पाणी आणि त्यासोबत शेतातील सुपीक मातीचा थर बांधबंधिस्तीअभावी वाहून जातो. शेतातलं पाणी आणि माती शेतातच राहावी यासाठी शेतात बांधबंधिस्ती कशी करता येईल याचे शेतक:यांसोबत नियोजन करण्याचं आमचं काम होतं. त्यासाठी आम्ही कृषी विज्ञान केंद्र, जालना येथे प्रशिक्षण घेतलं होतं. सोनाळे गावासाठी वसुंधरा योजना मंजूर झाली होती. त्याअंतर्गत शेतात बांधबंधिस्ती सरकारी खर्चाने करण्यासाठी गावात ट्रॅक्टर तयार होता. मात्र बांधबंधिस्तीचं नियोजन करणं आणि ती प्रत्यक्ष होणं यात खूप फरक असल्याचं जाणवलं. अनेक शेतकरी आम्हाला बरं वाटावं म्हणून नियोजनात सहभागी व्हायचे. त्यांची देहबोली मात्र वेगळंच बोलायची. पाणी-माती अडवण्यासाठी शेताच्या मध्ये बांध घातल्यास मशागत करणं शेतक:याला कठीण जाते. बांध बांधण्यासाठी शेतातली माती ‘वाया’ घालवण्यास शेतकरी सहज तयार होत नाही. काही शेतक:यांनी तर स्पष्टपणो सांगितलं, ‘तुम्ही हे जे काही सांगत आहात ते खरं आहे, पण आमची ती मुख्य समस्या नाही. आमच्या शेतमालाला भावच मिळत नाही. त्यावर काही करता येतंय का बघा.’
त्यावर माङयाकडे उत्तर नव्हतं. पण एक नक्की, यावर्षी हे कामाचं नियोजन करून खूप शिक्षण झालं. मात्र कागदावरचे बांध शेतात उभे राहायचे असतील तर फक्त सात दिवस काम करून स्वत:वर खूश होण्यात अर्थ नाही. ही लांब काळाची लढाई आहे हेदेखील लक्षात आलं.
आम्ही जवळपास 8क् शेतक:यांना भेटलो. त्यापैकी जमाखर्चाचा ताळेबंद एकाच शेतक:यानं ठेवला होता. इतर शेतक:यांनी हे आकडे पाहून अजूनच निराशा येईल या भीतीने ताळेबंदच ठेवत नसल्याचं सांगितलं. यापैकी कुठल्याही शेतक:याला आपल्या मुलानं शेती करावी असं वाटत नव्हतं. आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही अनेक शेतकरी कर्ज काढून आपल्या मुलांना शहरात शिकवत होते.
पहिल्या दिवशी आम्ही सोनाळे गावात टमटमने रात्री 9 वाजता पोचलो. टमटमचा लाईट पाहून रस्त्याच्या कडेला शौचाला बसलेल्या स्त्रिया उभ्या राहून तोंड लपवून घ्यायच्या. स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी संडास किती गरजेचा आहे हे जाणवलं. मात्र घराघरात संडासबद्दल सव्र्हे करताना वेगळंच चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. सरकारतर्फे 12 हजार रुपये मिळत असूनही संडास बांधण्यासाठी अनिच्छा दिसून आली. कदाचित पुरुषांना ती एवढी महत्त्वाची समस्या वाटत नसावी. शिवाय पाण्याची कमतरता असताना प्रतिव्यक्ती पाच लिटर पाणी संडाससाठी रोज वापरावेसे कुणाला वाटेल? ज्यांनी संडास बांधले होते, त्यांचे सांडपाणी घराबाहेरच उघडय़ा गटारात सोडले जायचे. काही ठिकाणी गटारी नसल्याने रस्त्यावरच सांडपाणी सोडले जायचे. गटारींचा उतार व्यवस्थित नसल्यामुळे / गाळ साचल्यामुळे / प्लॅस्टिकचा कचरा अडकून गटारी तुंबल्याचे चित्र हमखास दिसायचे. ग्रामपंचायतीमार्फत गटारी साफ करण्यासाठी एकाच व्यक्तीची नेमणूक झाली होती व त्यामुळे गटारे साफच व्हायची नाहीत. ‘वास आणि डास’ यामुळे त्रस्त होऊन घरी संडास असूनही हगणदारीचा वापर करत असल्याचे काही स्त्रियांनी सांगितले. हे पाहून केवळ संडास बांधून गावातील स्वच्छता आणि आरोग्याची स्थिती सुधारेल का बिघडेल, असा प्रश्न मला पडला.
गावातील सर्वांत गरीब कुटुंबाशी संवाद साधायचा म्हणून आम्ही एका विधवा स्त्रीच्या घरी गेलो. अतिक्रमित जागेवर झोपडी बांधून त्या राहत होत्या. झोपडीत अगदीच मोजके सामान होते. त्यांना दोन मुली होत्या. एक मजुरीला गेली होती. दुसरी मुलगी खूपच उदास दिसत होती. त्या बाई म्हणाल्या, ‘ती अशीच दु:खी असते. काहीच बोलत नाही.’ पाच हजार रु पये हुंडा देऊन तिचं लग्न लावून दिलं होतं. काही वर्षांनी ‘ठिबकसाठी माहेरून पैसे घेऊन ये’ म्हणून सासरच्यांनी छळायला सुरु वात केली. त्या मुलीने नकार देताच तिला पेटवून दिली. मुलगी कशीबशी जीव वाचवून माहेरी परतली. वकील व कोर्टकचेरीकरता पैसे नाहीत म्हणून तिच्या आईने ही केस ताणून धरली नाही. त्या दिवशी त्या मुलीने आईच्या सांगण्यावरून लुगडं काढून आम्हा सर्वाना जाळल्याची जखम दाखवली आणि आमच्या सर्वाच्या अंगावर काटा उभा राहिला. पुढचा तासभर कोणीच कुणाशी बोललं नाही. आपल्या पाहण्यात हुंडाबळीची एकही केस नाही म्हणून ती समस्याच नाही असा समज करून घेतलेल्या मला ती एक थप्पडच होती. ‘तुङया सुरक्षित कोषात राहून तू खरेखुरे जग, जिथे 70 टक्के लोक राहतात, पाहिलेच नाहीस’असा तो संदेश होता.
आमच्या सात दिवस जाण्यानं कुठली समस्या सुटलीच नाही. पण अनेक प्रश्न आम्हालाच पडले- स्वत:बद्दल, गावाबद्दल. त्यातली एकही समस्या सोडवायची तर सात र्वष तरी द्यावी लागतील. समस्यांनी त्रस्त, पण प्रेमळ 70 टक्क्यांसोबत नातं जुळलं. सात दिवस आपल्याला ज्या गावाने शिकवलं, त्याचं आपण देणं लागतो ही भावना मनात परत येताना पक्की बसली.