आए कुछ अब्र..
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 09:13 AM2018-04-12T09:13:13+5:302018-04-12T09:13:13+5:30
तिला जोडीदार हवाय; पण चारचौघींसारखं स्थळ पाहून कुणाला तरी नवरा म्हणून वरणं नकोय..पण मग नक्की हवंय काय तिला..?
१९९० हे वर्ष ‘आर्थिक उदारीकरणा’चं वर्ष म्हणून ओळखलं जातं. पण यामुळे आपल्या देशातलं आर्थिक आघाडीवरचंच चित्रं बदललं असं नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवरही बदलाचे वारे वाहू लागले. स्त्री- पुरुषांच्या आयुष्यातही खूप काही बदलत होतं. विशेषत: स्त्रियांचं आयुष्य. आतापर्यंत मुलींचं शिकणं लग्नासाठी अनुरूप होण्याच्या कसोटीत उतरण्यापुरतं महत्त्वाचं होतं. उदारीकरणाच्या वाऱ्यानं मात्र मुलींचं शिक्षण, त्यांचं पायावर उभं राहाणं, नोकरी करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणं याला विशेष महत्त्वं आलं.
‘आए कुछ अब्र’ हा मराठी लघुपट १९९० नंतरच्या काळात नोकरी करणा-या, पण अविवाहित असलेल्या स्त्रीची गोष्ट सांगतो. ही खरं तर गोष्ट नाहीच. हा एक प्रवास आहे एका शोधाचा. हा शोध आहे तिच्या मनातल्या अपेक्षित जोडीदाराचा.
शिक्षण झालं, वय लग्नायोग्य झालं म्हणून घरातील वडीलमंडळी सांगतील तिथं लग्न करण्याची पद्धत तिला अगदीच अमान्य आहे. मुलाकडचे म्हणतात म्हणून परंपरा पाळायच्या, मुलाकडच्यांची अपेक्षा म्हणून साडी नेसून कपाळावर गोल टिकली लावून समोर यायचं, घरंदाज मुलीसारखं वागायचं या आणि असल्या कसोट्यांवरचं लग्न आणि अशा जुनाट अपेक्षा ठेवणारा जोडीदारच तिला नको आहे. तो मिळत नाही म्हणून वयाची तिशी उलटून गेली तरी ती अविवाहितच आहे. वडिलांना ती डोईजड झालीये. रोजचे वादविवाद नको, होतात म्हणून मग ती आॅफिसच्या जवळ घर घेऊन स्वतंत्र राहाते. ती अतिशय संवेदनशील आहे. तिला आपल्याला समजून घेणारा, स्वतंत्र अवकाश देणारा जोडीदार हवा आहे. अर्थात, त्याला नव-याचं लेबलच लावायला हवं असं मात्र तिला वाटत नसतं.
ती स्वतंत्र जगते आहे, आई-वडिलांपासून दूर राहाते आहे, कसली बंधनं नाहीत की कसले नियम नाहीत; पण तरीही ती समाधानी आणि आनंदी नाही. तिच्या या शोधाच्या प्रवासात तिला अनेकजण भेटतात. त्यात काही तिला पसंत नसतात तर काहींना ती. अनेकांकडून आलेल्या थेट नकारानं ती खचते; पण शोध सुरूच ठेवते. आपल्याला जोडीदार म्हणून काय हवं आहे हे ती सतत तिच्या पातळीवर तपासत राहते. आपल्याला केवळ शरीरसंबंधांपुरता जोडीदार हवा का, असाही तिला प्रश्न पडतो. एकदा असा अनुभव ती घेऊनही पाहाते. या प्रवासात तिला कळतं की आपल्या जोडीदाराचा शोध केवळ लैंगिक गरजेपुरता नसून त्या पलीकडचा आहे.
या शोधातलाच एक मोहन. खूप दिवस त्याच्या सोबत असल्यानं तिला तोच खरा जोडीदार वाटू लागतो. कदाचित तिची मैत्रीण शिरीन म्हणते तसा तिचा तो भ्रमही असू शकतो; पण या भ्रमात असतानाच मोहनचा मृत्यू होतो. जोडीदार शोधाच्या या प्रवासात तिला शेवटी एकजण भेटतोही. स्वतंत्र विचारांचा, आपली मतं दुस-यांवर न लादणारा, समोरच्याच्या मनाचा विचार करणारा आणि एकटा. अगदी तिच्यासारखाच. कुंद वातावरण एका स्वच्छ सकाळी मागे पडावं तसं काही घडतं. तिच्या अपेक्षांचे, तिला हवेहवेसे ढग तिच्या घरापर्यंत येतात. तो तिला भेटायला तिच्या घरी येतो. तो सोबत असतो. पेटीवर त्याने सूर लावलेले असतात. आणि मोहनच्या सहवासात तिच्या मनात रूतून बसलेली फैय्याज अहमद फैज यांची ‘आए कुछ अब्र’ गझल ती गायला लागते. आणि फिल्म या सुरेल नोटवर संपते. आपल्याला वाटतं तिचा जोडीदाराचा शोध संपला असेल कदाचित. पण, तरीही जे वाटतं ते ठाम नसतंच.
खरं तर या फिल्मचे दिग्दर्शक, पटकाथाकार आणि सिनेमॅटोग्राफर असलेल्या मयूरेश गोटखिंडीकर यालाही ‘आता तिचा शोध संपला आणि ते सुखानं एकत्र नांदू लागले’ असा थेट शेवट करायचा नव्हताच. एका स्वतंत्र विचाराच्या स्त्रीची गोष्ट सांगताना त्याला ती आपल्या स्वत:च्या नजरेतून मांडायची नव्हतीच. तो ती तिच्याच नजरेतून मांडण्याचा प्रयत्न करत होता. आणि म्हणूनच जर-तरच्या सीमारेषेवर फिल्मचा शेवट होतो. मेघना पेठे या मराठी कथालेखिकेच्या दीर्घ कथेवर ही शॉर्ट फिल्म आधारित आहे. २८ मिनिटांच्या या फिल्ममध्ये बदाबदा गोष्टी घडत नाहीत. जे घडतं, तो एक शोधच असतो असं मात्र वाटत राहातं..
फिल्म पाहण्यासाठी https://youtu.be/bNmlGU0SvT4