नातं स्वीकारताना...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 04:01 PM2018-01-17T16:01:41+5:302018-01-18T07:36:31+5:30
मूळ यवतमाळचा हृषिकेश आणि त्याचा पार्टनर वीन्ह. - सध्या अमेरिकेत वास्तव्याला असलेल्या या समलिंगी तरुण जोडप्याने नुकताच ‘कमिटमेण्ट सेरेमनी’ केला, आणि तोही यवतमाळमध्ये!
- आॅक्सिजन टीम
मूळ यवतमाळचा हृषिकेश
आणि त्याचा पार्टनर वीन्ह.
- सध्या अमेरिकेत वास्तव्याला असलेल्या
या समलिंगी तरुण जोडप्याने नुकताच
‘कमिटमेण्ट सेरेमनी’ केला,
आणि तोही यवतमाळमध्ये!
हृषिकेश सांगतो,
लोकांनी इतक्या आपलेपणाने
आमचं नातं स्वीकारलं, की
काय सांगू!!!
गेल्या काही दिवसांपूर्वी ठळकपणे प्रसिद्ध झालेले काही फोटो तुम्ही पाहिले असतील. सध्या अमेरिकेत वास्तव्याला असणाºया हृषिकेश साठवणे यानं त्याच्या पार्टनरशी केलेल्या ‘कमिटमेंट सेरेमनी’चे फोटो यवतमाळात लागलेलं समलैंगिक लग्न म्हणून प्रसिद्ध झाले आणि चर्चा सुरू झाली.
समलैंगिक संबंधांना अपराध ठरवणा-या आयपीसी कलम ३७७चा पुनर्विचार करण्यासाठी जस्टीस दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली. समलिंगी संबंधांनाच गुन्हा ठरवण्याºया या कायद्याचा पुनर्विचार करावा, अशी मागणी गेली अनेक वर्षे या विषयात काम करणाºया व्यक्ती आणि संस्थांनी लावून धरली होती..
-हा पुनर्विचाराचा निर्णय एकीकडे होत असतानाच दुसरीकडे या समलिंगी विवाहाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. मुळात देशात समलिंगी संबंधांना कायद्यानं मान्यता नसताना हा विवाह कसा झाला, असा प्रश्न उपस्थित होणं साहजिक होतं. दुसरीकडे समलिंगी संबंधांबाबत जनभावना बदलत असल्याचंही हे सुचिन्ह होतं.
यासंदर्भात खरं काय हे जाणून घेण्यासाठी थेट हृषिकेश साठवणेशीच संपर्क साधला. तो अमेरिकेत वास्तव्याला असतो. फोन आणि फेसबुकद्वारे त्याच्याशी बोलणं झालं तेव्हा समजलं की त्यानं भारतात विवाह केलेला नाही तर ३० डिसेंबर २०१७ रोजी त्यानं त्याचा पार्टनर व्हिनशी एक छोटा ‘कमिटमेण्ट सेरेमनी’ यवतमाळ येथे केला. आपल्या जवळच्या माणसांना आमंत्रित करून एक छोटेखानी रिसेप्शन त्यानं केलं. हौसेखातर, मजेमजेत हळद, आंतरपाट, मंगलाष्टक अशा पारंपरिक गोष्टीही त्यावेळी केल्या इतकंच.
हृषिकेश सांगतो, ‘दोन जीव एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्यांना त्यांची जवळची माणसं, कुटुंबीय, मित्र साथ देतात. त्यांच्या नात्याला स्वीकारतात हेच मोलाचं होतं. आणि म्हणून एक छोटेखानी समारंभ, ज्याला मी कमिटमेण्ट सेरेमनी म्हणतो तो आम्ही आयोजित केला. जिथं माझ्या जिवाभावाची माणसं आली. आम्ही परस्परांना जे नातं ‘कमिट’ केलं, त्या नात्याला आणि आमच्या जन्मभर एकत्र राहण्याच्या इच्छेला त्यांनी स्वीकृती दर्शवत शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले इतकंच. भारतात कलम ३७७ अंतर्गत समलिंगी संबंध बेकायदा आहेत. पण कमिटमेण्ट सेरेमनीला रोखणारा कायदा नाही. ते कायदेशीर वा बेकायदेशीरही नाही. त्यामुळे या सोहळ्याच्या कायदेशीर असण्याविषयी उठलेल्या प्रश्नांनाच काही अर्थ नाही!’
- हृषिकेश हे सांगत असतो तेव्हा यवतमाळ ते अमेरिका ते हा कमिटमेण्ट सेरेमनी या प्रवासाविषयी जाणून घ्यायची उत्सुकता वाढतेच. त्याविषयी तो सांगतो, ‘मी बारावीत मेरीटमध्ये आलो होतो. तरी मी वर्षभराची गॅप घेतली आणि आयआयटीची तयारी केली. पुढच्याच वर्षी मला मुंबई आयआयटीत प्रवेश मिळाला. इंजिनिअरिंग फिजिक्स या विषयात मी बी.टेक केलं. आणि मग एमएस करायला अमेरिकेत लोवा युनिव्हर्सिटीत गेलो. नंतर मी एमबीएही केलं. त्यानंतर आता मार्केटिंग स्ट्रॅटेजी फिल्डमध्ये मी काम करतो. वयात येतानाच मला जाणवत होतं की, मी काहीतरी वेगळा आहे. पण म्हणजे काय हे नक्की कळत नव्हतं. ते कळेल किंवा समजावून सांगेल असंही कुणी माझ्या अवतीभोवती नव्हतं. मी अभ्यासात लक्ष केंद्रित केलं आणि उत्तम मार्कही मिळत होते. आयआयटीत असताना एकदा मानसशास्त्राच्या लेक्चरमध्ये होमोसेक्शुअॅलिटीचा ओझरता उल्लेख झाला. पण आपल्याला जे वाटतं ते हेच, असं काही त्यावेळी मला वाटलं नव्हतं. पुढे लोवा स्टेट विद्यापीठात शिकत असताना मी गे सपोर्ट ग्रुपच्या संपर्कात आलो. तिथं काही जणांना भेटलो. आपण गे आहोत हे उघडपणे आणि आत्मविश्वासानं मान्य करणाºया, त्याविषयी बोलणाºया अनेकांना मी भेटलो आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपणही गे आहोत. मी तसं माझ्या पालकांनाही सांगितलं. ते स्वीकारणं अर्थात त्यांच्यासाठीही अवघड होतं. पुढची काही वर्षं भावनांचा लंबक दोन्ही टोकांना झोके खात होता. हे शक्यच नाही म्हणण्यापासून ते अपराधी वाटणं ते नैराश्य, दु:ख, रडणं हे सारं झालं. माझं लग्न झालं तर हे सारे प्रश्नच मिटतील असं त्यांना सुरुवातीला वाटत होतं. पण कुणाही मुलीचं आयुष्य असं नासवण्याला माझा स्पष्ट नकार होता. माझ्या बहिणीनं मात्र मला साथ दिली. तिनं माझ्या आईवडिलांना समजावून सांगितलं. आधी खूप विरोध झाला; पण माझ्या घरानेही हळूहळू मला स्वीकारलं. अमेरिकेतल्या एका एलजीबीटी सपोर्ट ग्रुपसोबत आणि पालकांसाठीच्या एका ग्रुपसोबत मी काम करत होतो. स्वत:ला समजून घेण्यासाठी आणि पालकांना समजावून सांगण्यासाठी मला या ग्रुपची खूप मदत झाली. माझे आईवडील अमेरिकेत आले होते, तेव्हा मी त्यांना या ग्रुपला भेटवलं. आधी ते अनिश्चेनेच तिथं आले; पण मला समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हळूहळू स्वीकारलंही. असं कुटुंब माझ्यासोबत आहे, याचा मला अभिमान वाटतो.’’
...हृषिकेश त्याचा प्रवास सांगतो आणि हेही आवर्जून नमूद करतो की, ‘आपल्याला वाटतं त्यापेक्षा यवतमाळ हे शहर, तिथली माणसं पुढारलेल्या विचारांची आहेत. मी बोलावल्यावर माझे मित्र, नातेवाइक, आसपास राहणारे अनेकजण, शाळेत शिकवणारे शिक्षक या सोहळ्याला आवर्जून आले. त्यांनी प्रेमानं आमचं नातं स्वीकारलं. आम्हाला शुभेच्छा दिल्या!’
...फोनवर हृषिकेशशी हे बोलणं होत असताना आयुष्यभराची साथ-सोबत या शब्दाचे, प्रेमाचे तेच रंग आपल्याला जाणवत राहतात... लिंगापलीकडे प्रेम दोन जिवांना जोडतं, जोडू शकतं याचं हे एक उदाहरण...