Adult under construction - मोठं  होण्याची भन्नाट  गोष्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 04:27 PM2020-07-23T16:27:50+5:302020-07-23T16:39:20+5:30

आपण मोठे होतो म्हणजे नक्की काय होतं? कधी आपण मॅच्युअर होतो? कधी स्वतंत्र? कधी गोष्टी स्वत:साठी करतो, कधी इतरांसाठी करतो, आणि मुख्य म्हणजे जे काही करतो ते का करतो. - विचारा स्वत:ला.

Adult under construction - a must watch documentry- a story of being matured. | Adult under construction - मोठं  होण्याची भन्नाट  गोष्ट !

Adult under construction - मोठं  होण्याची भन्नाट  गोष्ट !

Next
ठळक मुद्दे आणि जरा स्वत:शीही बोलता येतंय का पहा.

प्राची पाठक 

आपण मोठं होतो म्हणजे नेमकं काय होतो? आपण कॉलेजला गेलो म्हणजे आपण मोठे झालो असं समजायचं का?
आपल्या आवडी-निवडीचे कपडे आणि इतर वस्तू घ्यायला-घालायला लागलो म्हणजे मोठं झालो का?
वय पंचविशीच्या आसपास जायला लागलं किंवा ती पार केली म्हणजे मोठं झालो का?
आईवडील, नातेवाईक तर अगदी सोयीस्करपणो ‘तू अजून लहान आहेस, यात लुडबुड करू नकोस’, असा डायलॉग मारतात.
तो पचत नाही तोवर ‘एवढा मोठा घोडा/घोडी झालीस, तरी सांगावं लागतं, कळत नाही का?’ असाही डायलॉग अंगावर येतो.
घरोघरची हीच स्टोरी असते.
बहुतांश मोठय़ा पिढीला ‘आजकालची पिढी’ ही वाया जाणारी, फार आगाऊपणा करणारी, कोणाचं न ऐकणारी, फक्त स्वत:चं पाहणारी जनरेशन वाटत असते. म्हणजे ओघानं जनरेशन गॅप हा घासून गुळगुळीत झालेला शब्द आलाच! हे झालं बहुतांश मोठय़ांचं आपल्या तरु ण असण्याबद्दलच मत. 
पण मग आपल्या वयाच्या मित्रमैत्रिणींमध्ये आपलं काय सुरू असतं? एकतर शाळा-कॉलेजच्या सुरुवातीला आपल्याच मित्रमैत्रिणींची उदाहरणं. तो कसा हुशार आहे, ती कशी जिंकली, तुला तर काहीच नीट करायला नकोय, अशाप्रकारे तुलना करत आपल्या अंगावर सोडली जातात. त्यामुळे, आपल्या वयाच्या काही मुलांशी मैत्रीचा चान्सच उरत नाही. त्यांचं उदाहरण कायम आपल्याला आपण कसे फालतू आहोत, आपल्याला कसं काहीच नीट येत नाही, हे सांगण्यासाठी दिलं जातं. मनातले ते सगळे अपमान बाजूला ठेवून त्यांना नव्याने बघणं, त्यांच्याशी चांगली मैत्री करणं, हे दूरच राहतं. मग आपल्यासारखे जे इतर असतात, त्यांच्याशी आपली त्यातल्या त्यात मैत्री होते. तिथेही हा असाच, ती तशीच, अमक्यापासून दूरच राहा, तमक्याशी बोलत जाऊ नकोस, असे सल्ले मिळालेले असतात.


इतक्या खटाटोपातून काही जण आपले मित्र बनतात. आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये आपल्याला कम्फर्ट वाटू लागतो. त्यांच्यासोबत आपण जरा शायनिंगदेखील मारायचा प्रयत्न करत असतो. तरुणपणी मजा म्हणून केलेल्या अनेक गोष्टी आपल्या मित्न-मैत्रिणींमध्ये आपण कसे लै भारी आहोत, हे दाखवण्यासाठी असतात. हे आपल्याला फार नंतर कळतं. तोवर आपण अनेक लहानमोठय़ा रिस्क घेतलेल्या असतात. काही झकास पार होतात, कधी आपला फ्लॉप होतो, तर कधी भीषण लोचा! म्हणजे, मध्येच जोरात गाडी चालवायची. घरी कोणाला तरी काहीतरी बोलून यायचं. त्यांचे नियम धुडकारून लावायचे. कॉलेजमध्ये लहानमोठे राडे करायचे. मित्रंच्या सर्कल्समध्ये भांडणं ओढवून घ्यायची. हे आणि असे अनेक उद्योग आपल्या दोस्ती खातर आपण करायला लागतो. एरवी त्यात असलेले धोके बघून आपण ते करणार नाही. परंतु, चारजण सोबत असतील, तर आपल्याला जणू शो ऑफ करायचा ऊत येतो आणि त्या नादात आपण अनेक लहानाोठे राडे करत सुटतो. आपण हे असं का वागतोय, याचं फारसं भान आपल्याला असतं की नसतं? तरुण होणं, लहानपण संपणं, अॅडल्ट होणं म्हणजे नक्की काय? या वयात जो आणि जितका आनंद लहानसहान गोष्टींत होतो, जे मूलपण जपलेलं मोठं होणं असतं, ते तितक्या तीव्रतेने आपल्याला नंतर कधीच अनुभवता येणार नाही का? हे दिवस भर्रकन हातातून निसटून जातील आणि आपल्याला जबाबदा:या घेतलेला गंभीर गाढव किंवा घाण्याचा बैल बनावं लागेल का? त्याला आपण मोठं होणं म्हणायचं का? नाहीतरी अनेक लोक डायलॉग्ज मारतातच. नोकरीला लागले आणि सगळंच संपलं, लग्न झालं आणि अनेक गोष्टी तिथेच राहून गेल्या.
म्हणजे नोकरीला लागणं आणि नात्यांमध्ये पडणं म्हणजे मॅच्युअर होणं असतं का? 
एका पंचवीस वर्षांच्या मुलीने असाच तिच्या स्वत:च्या तरुण होण्याचा शोध घेतला. त्यासाठी स्वत:लाच काही प्रश्न विचारले. त्यांची उत्तरं शोधण्यासाठी काही मानस शास्रज्ञांची मदत घेतली. अगदी केजी टू पीजीपर्यंत आपण कसे बदलत गेलो, कसे मोठे होत गेलो, याचा शोध घेतला. आपण मोठे झालो असं म्हणत घेत असलेले निर्णय तिने स्कॅन केले जणू. आपण जे वागत असतो त्या सर्व गोष्टींना तिने त्रयस्थपणो पाहायचं ठरवलं. तरुणपणी शरीरात, मनात अनेक केमिकल लोचे होतात, असं म्हटलं जातं. ते कितपत खरं असतं? त्या केमिकल लोच्यांच्या कळत - नकळत आहारी जाऊन आपण जसे वागतो, तसे वागतो का? आपण जे बरे वाईट वागत असतो, जे धोके पत्करत असतो, आईवडिलांशी वाद घालत असतो, ते सर्वच्या सर्व या केमिकल भानगडींमुळे होतंय का? त्यात आपला दोष किती आणि आपल्या शरीरातल्या केमिकल्सचा दोष किती? तिला अनेक प्रश्न पडले. आपलं आयुष्य, त्यातल्या गमती-जमती, आपली आपल्याला वाटणारी कमजोर बाजू, आपली स्ट्रेंग्थ अशा सगळ्या गोष्टी तिने प्रामाणिकपणो मानस तज्ज्ञांसमोर मांडल्या. त्यातून स्वत:चा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दलच ‘अडल्ट अंडर कन्स्ट्रक्शन’ ही सुंदर डॉक्युमेंटरी तयार झाली. अगदी तासाभराचीच. परंतु, प्रत्येक तरु ण व्यक्तीने पाहावी आणि समजून घ्यावी अशी. त्यात अगदी मित्रमैत्रिणींसोबत उगाच घेतलेल्या रिस्क, कोणाबद्दल वाटणारी ओढ, आईवडिलांशी उडणारे खटके अशा अनेक बाजू तिने मांडल्या. याच वयात अनेक मानसिक आजारसुद्धा डोकं वर काढत असतात. त्यांच्याबद्दल जाणीव कशी ठेवायची? याच वयात अनेक गोष्टी करून बघायच्या असतात. कोणासाठी ते पाय घसरणं असतं. ते आपण कसं पार करणार? व्यसनांपासून दूर कसं राहणार? आपलं आरोग्य कसं राखणार? अशा तरुण होण्यासंबंधीच्या अनेक विषयांवर ती जगभरातल्या तज्ज्ञांशी बोलते.
जरूर पाहावी अशी डॉक्युमेंटरी. अडल्ट अंडर कन्स्ट्रक्शन.
त्यातून काहींना आपण सध्या जे वागतोय, त्यात काय बदल करता येतील, याची दिशा सापडू शकेल. ज्यांना अजून पंचविशी गाठायची आहे, त्यांना त्या रस्त्याला कोणते संभाव्य खाचखळगे आहेत, त्यांची कल्पना येईल. ज्यांनी पंचविशी पार केलेली आहे, त्यांनाही मागे वळून बघत स्वत:ला नव्या पद्धतीने समजून घेण्याची नजर मिळू शकेल. जरूर पाहा आणि विचारा स्वत:ला आपण मोठे झालो म्हणजे नक्की काय झालं.?

(प्राची मानसशास्त्रसह पर्यावरण आणि सूक्ष्मजीवशास्त्रची अभ्यासक आहे.)

Web Title: Adult under construction - a must watch documentry- a story of being matured.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.