आपुलकी

By admin | Published: June 8, 2017 12:23 PM2017-06-08T12:23:15+5:302017-06-08T12:23:15+5:30

आयटीतले तरुण दोस्त.त्यांनी २०११ मध्ये ठरवलं कीआपण नुस्ती चर्चा करण्यापेक्षाशेतकऱ्यांना मदत होईल असं काही करू..त्यातून सुरू झालं एकवेगळंच काम..

Affection | आपुलकी

आपुलकी

Next

 - अभिजित फालके

मी मूळचा विदर्भातला. २००३ मध्ये पुण्यात आलो. आयटी सेक्टरमध्ये काम करतो. आता पुण्यात राहतो. त्याआधी भारताबाहेरही काही काळ राहिलो. मात्र वाटत होतं की आपण विदर्भातले, तिथं शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न मोठा. त्यासाठी आपण काही करायला हवं. बायकोशी बोललो, सहकारी व मित्रांशी बोललो. आणि २०१२ मध्ये आमच्या आपुलकी संस्थेचं काम सुरू केलं. २० इंजिनिअर मुलांनी एकत्र येवून हे काम सुरु केलं. आज साधारण ८००० जण आमच्या आपुलकी संस्थेचे सदस्य आहेत. आता गेली पाच वर्षे आम्ही शेती क्षेत्रात काम करतो आहोत. ना आम्ही सरकारी अनुदान घेतो, ना आमचं कुठं आॅफिस आहे, ना पगारी लोक. सारे जण आपल्या व्यापातून वेळ काढून हे काम करतात.


हे काम सुरू करताना मनात एवढंच होतं की, आपली आपल्या मातीशी बांधिलकी आहे. आपण त्यासाठी काम करायला हवं. अर्थात आपण काही उपक्रम करू हे ठरवताना ते काम किती दिवस करू, त्यात किती सातत्य राखू असा संभ्रम मनाशी होताच. आमचा अनुभव आयटीचा, शेतीक्षेत्राचा काहीही अनुभव नव्हताच.


म्हणून सुरुवातीला आम्ही उडान नावाची एक कार्यशाळा शेतकऱ्यांसाठी घेतली. पूर्णत: नि:शुल्क. निवास-भोजनाची व्यवस्थाही आम्ही केली. या प्रशिक्षणात पाण्याच्या स्रोतांचे संरक्षण, पाण्याचा वापर, सॉइल टेस्टिंग, शेतमालाचं मार्केटिंग, तंत्रज्ञानाची मदत, त्याचा वापर यासंदर्भात माहिती दिली. ६००० शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.


या कार्यशाळेत आम्ही शेतकऱ्यांना विचारलं होतं की तुमच्या मुख्य अडचणी कोणत्या? शेतमालाला भाव मिळणं, शेतीत पायाभूत सुविधा नसणं, विजेचे प्रश्न, साठवणुकीच्या सोयी नाहीत, पाण्याच्या सोयी नाहीत. त्यासाठीचा पैसा या मुख्य तक्रारी तर होत्याच, पण त्यासोबत शेतीकामासाठी मजूर मिळत नसणं, कमी मनुष्यबळ उपलब्ध होणं ही एक मोठी अडचण समोर आली. ती अडचण अनेक शेतकऱ्यांनी सांगितली. शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाची, शेतीत आॅटोमेशनची गरज मोठ्या प्रमाणात आहे हे लक्षात आलं. त्यावर उपाय म्हणून आम्ही सचिन तेंडुलकर यांच्याशी संपर्क केला. सचिनने केलेल्या आर्थिक मदतीतून अमरावती जिल्ह्यातील मोर्डी या गावी रमेश तेंडुलकर अ‍ॅग्रीकल्चर टूल बॅँक आम्ही सुरू केली. त्यासाठी महिंद्रा कंपनीनेही सहकार्य केलं. हे केंद्र ना नफा ना तोटा तत्त्वावर चालतं.

अल्पदरात शेतीची कामं यातून करुन दिली जातात. सचिन तेंडुलकरच्याच खासदार निधीतून उस्मानाबाद जिल्ह्यातील भोगजी गाव दत्तक घेतलं आहे, तिथंही अशी कामं सुरू आहेत. आजवर आम्ही २९ शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून त्यांचा सातबारा कोरा करून घेतला.
ही सारी कामं करताना एक लक्षात आलं की शेतकऱ्याला शेतीसोबत जोडधंदाही हवा. म्हणून आत्महत्याग्रस्त भागात आम्ही आटा चक्की, शेळीपालन, कुक्कुटपालन असे उद्योग प्रशिक्षण महिलांसाठीही राबवले.


असे अनेक उपक्रम आम्ही करतो आहोत. त्यातून शिकतो आहोत. एक मात्र नक्की की शेतीचे प्रश्न मोठे आहेत. जिथं सरकार पुरं पडत नाही तिथं आपण किती पुरं पडणार? पण तरीही आपण आपले प्रयत्न करत राहायचे. आमचा एक्सपर्टाइज आयटी क्षेत्रातला आहे तो वापरून, डाटा प्रोसेस करून आम्ही त्यातून काही उपक्रम करत असतो.


शेतमालाचं मार्केटिंग कसं करायचं याची माहिती शेतकऱ्यांना देतो. त्यासाठीची प्रशिक्षणं घेतो. लंडनला आम्ही विदर्भातल्या हळदीचं प्रदर्शन लावलं होतं. पुण्यात संत्रा महोत्सव भरवला होता. तिथं ६४ लाख रुपयांची संत्री विक्री झाली. नोटाबंदीच्या काळातच आम्ही पुण्यात हा संत्री महोत्सव भरवला होता. आयटी क्षेत्रात डायरेक्ट हापूस आंबा विक्री केली, त्यातून साधारण २३ लाख रुपये शेतकऱ्यांना कमावून दिले. हे करताना मग त्यासाठीची पोर्टल बनवली. त्याचा प्रचार-प्रसार, आॅनलाइन आॅर्डर घेऊन शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणं असे अनेक उपक्रम आम्ही याकाळात केले.
त्यातून शिकलो एकच, की करण्यासारखं खूप आहे. आपण एकत्रित प्रयत्नांतून बरंच काही करू शकतो.

fabhijeet1980@gmail.com

Web Title: Affection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.