सारा क्रिकेट इसे लायन के नाम से जानता है !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 07:57 AM2020-12-24T07:57:12+5:302020-12-24T08:00:12+5:30
जगातला आजच्या घडीला पट्टीचा ऑफ स्पिनर कोण? तर नेथन लायल. खेळपट्टी रोल करण्याचं काम करणारा हा तरुण, त्याच्या यशाचं रहस्य काय?
-अभिजित पानसे
नुसतं म्हणायला ऑफ स्पिनर कोणीही होतं पण पट्टीचे, जातिवंत ऑफ स्पिनर खूप क्वचित असतात.
आजच्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणी खरा पट्टीचा ऑफ स्पिनर असेल तर तो ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर नेथन लायन.
ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या पारंपरिकरीत्या वेगवान बॉलरना मदत करतात. मात्र, नेथन लायनने फक्त आणि फक्त ऑफ स्पिनच्या भरवशावर संघात स्वतःची जागा पक्की केली आहे. २०११ मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला, गॉल टेस्ट सुरू होती. श्रीलंकेचा सर्वोत्तम बॅट्समन, डावखुरा संगकारा स्ट्राइकवर होता. ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनने पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या नेथन लायनला बॉल दिला. लायनने आपला वेगवान सुंदर रनअप घेऊन बॉल टाकला, बॉल खेळपट्टीचे चुंबन घेऊन वळला आणि संगकाराच्या बॅटच्या कडेला स्पर्श करीत स्लिपमधील क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन विसावला. आपल्या पहिल्याच सामन्यात पहिल्या बॉलवर जागतिक पातळीवरील एका सर्वोत्तम बॅट्समनची लायनने विकेट घेतली; पण ही विक्रमी सुरुवात करण्यापूर्वी नेथन लायन कुठं होता?
ॲडिलेड ओव्हल या ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक मैदानावर रोलर फिरवण्याचं काम एक तरुण मुलगा करायचा. कोणीतरी त्याला अधूनमधून बॉलिंग करतानाही पाहिलं होतं. मात्र, एक दिवस या तरुणाच्या आयुष्यात एक व्यक्ती आली, देवदूतासारखी. डॅनियल बॅरी, त्यांनी त्या तरुणाचं अर्थात नेथन लायनचं आयुष्यच बदलून टाकलं.
दक्षिण ऑस्ट्रेलियाचे टीट्वेन्टी प्रशिक्षक डॅनियल बॅरी हे ॲडिलेड येथे आले होते. त्यांना कोणीतरी सांगितलं की, खेळपट्टीला रोल करणारा इथला एक मुलगा चांगला ऑफ स्पिन करतो. डॅनियल बॅरी यांनी नेथन लायनला बॉलिंग करायची विनंती केली. मुळात लाजाळू व मितभाषी असलेल्या लायनने मला रोलिंगचं काम आहे, असं सांगून नकार दिला. शेवटी डॅनियल बॅरी यांनी लायनला स्वतःबद्दल खोटी हकिकत सांगितली, की ते एक ऑस्ट्रेलियन संघात संधी मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत, म्हणून ऑफ स्पिनचा सराव करायला बॉलर हवा.
त्यावर विश्वास ठेवून लायनने काही ऑफ स्पिन बॉल टाकले. नेथन लायनचा रनअप आणि पारंपरिक ऑफ स्पिन, ड्रिफ्ट आणि कंट्रोल बघून त्यांनी लायनच्या ऑफ स्पिनचा ‘किलर इन्स्टिंक्ट'' ओळखला. ऑस्ट्रेलिया बोर्डातील काही लोकांशी संपर्क साधून नेथन लायनची शिफारस केली. ऑस्ट्रेलियाने शेन वॉर्न निवृत्त झाल्यावर काही स्पिनरना संधी देऊन बघितली होती; पण कोणताही भेदक स्पिनर ऑस्ट्रेलियाला मिळाला नव्हता. नेथन लायनकडे संधी चालून आली आणि त्यानंही त्या संधीचं सोनं केलं.
एरव्ही भारतीय उपखंडातल्या बॅट्समनला स्पिन बॉलर म्हणजे सुख वाटतं. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान भेदक माऱ्यासमोर कशीतरी खिंड लढवली आणि स्पिनर बॉलिंगला आला की भारतीय बॅट्समन जरा निवांत श्वास घ्यायचे; पण नेथन लायन आल्यापासून तो ही बॅट्समनचा काळ बनून येतो.
मागच्याच आठवड्यात झालेल्या दिवसरात्र पिंक कसोटीमध्येही लायनने पहिल्या इनिंगमध्ये भेदक बॉलिंग केली. काम असं जबरदस्त केलं दुसऱ्या इनिंगमध्ये त्याला बॉलिंग करण्याचीही गरज पडली नाही. आपल्या ऑफ स्पिनशीच प्रामाणिक राहत एकट्याने सामना जिंकून देण्याची धमक या ऑफ स्पिनरमध्ये आहे. म्हणून तर सारा क्रिकेट इसे लायन के नाम से जानता है, और बॅट्समन सिर्फ जानता नहीं डरता है!
( अभिजित ब्लॉगर आहे.)
abhijeetpanse.flute@gmail.com