चालता बोलता चहावाल्याचा आश्चर्यकारक प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 07:58 AM2020-12-17T07:58:17+5:302020-12-17T08:00:11+5:30
कोरोनापूर्वी बांधकाम साइटवर वॉचमन ते कोरोनाकाळात चहाचा मोठा विक्रेता हा प्रवास रेवन शिंदेने कसा केला?
-नेहा सराफ
२०२०, वर्ष सुरू झालं तेव्हा कुणाला वाटलं तरी होतं का, कोरोनासारखी महामारी येईल आणि संपूर्ण वर्ष लॉकडाऊन मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्स अशा नियमांनी झाकून जाईल. मात्र या वर्षाने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या. अनेकांनी आपले आप्तही गमावले आणि व्यवसाय, नोकरीसुद्धा. हाताचं काम सुटलं, समोर फक्त अंधार असा कोरोना कहर झाला. त्यातलाच एक होता पुण्यात, पिंपरीचा रेवन शिंदे. पण प्राप्त परिस्थितीत हार न मानता त्यानं नवीन सुरुवात केली आणि इतरांनाही उभं राहण्याचं बळ दिलं. रेवन मूळचा सोलापूरचा. आता तुम्हाला भेटला तर हा सावळा, सडसडीत २८ वर्षांचा साधासा दिसणारा तरुण महिन्याला २ लाख रुपयांची उलाढाल करतोय हे सांगितलं तरी खरं वाटणार नाही. दहा वर्षांपूर्वी तो पुण्यात पोट भरायला आला. वेगवेगळ्या नोकऱ्या त्याने या काळात केल्या. यापूर्वी तो एका बांधकाम साइटवर वॉचमन म्हणून कामाला होता. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं आणि अचानक कोरोनाचा राक्षस उभा राहिला. एका रात्रीत रेवनला काम गमवावं लागलं आणि पुढे उभं राहिलं भलंमोठं प्रश्नचिन्ह.
पुण्यात नोकरी करत असतानाच त्याला हॉटेल कामात रस निर्माण झाला होता. त्याचं शिक्षण जरी बारावीपर्यंतच झालं असलं तरी कॅफे कसे चालवले जातात, तिथे काम कसं केलं जातं हे त्याने एका कॅफेच्या नोकरीत शिकून घेतलं होतं. इतकंच नाही तर एक कॅफे टाकण्याचा अयशस्वी प्रयत्नही करून स्वतःचं मोठं आर्थिक नुकसानही करून घेतलं होतं. पण त्याच्यातली जिद्द त्याला शांत बसू देत नव्हती. लॉकडाऊनमध्ये अशीही नोकरी गेली होती, पुन्हा लगेच नोकरी मिळण्याची शक्यता जवळपास शून्य होती. याच काळात त्याने आणि त्याच्या चार मित्रांनी एकत्र येऊन ठरवलं सुरू करायचा ''चालता-बोलता चहा''.
ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांना चहाची प्रचंड सवय असते. चहा मिळाला नाही तर अनेकांना चुकल्यासारखं वाटतं. लाखो रुपये कमावणारेसुद्धा दिवसातून दोन वेळा तरी ऑफिसखालच्या टपरीवर येऊन चहा पिताना रेवनने बघितले होते. अशावेळी लॉकडाऊनमध्ये हे लोक काय करत असतील हा प्रश्न त्याला पडला आणि त्यांनी अशाच काही ऑफिसमध्ये चहा पुरवायला सुरुवात केली.
त्यासाठी त्यानं एक पध्दत तयार केली. एका बॅगेमध्ये दोन मोठे थर्मास, त्यातल्या एकात तयार चहा तर दुसऱ्यात गरम दूध भरले जाते. बॅगेत साखरेचे पाऊच, कॉफी पावडर ठेवली जाते. सोबत ''युज अँड थ्रो''चे ग्लास असतातच. या बॅगमागे ''चालता-बोलता चहा; एक फोन करा आणि चहा मागवा'' अशी पाटी लावायलासुद्धा तो विसरला नाही. सोबत चार मित्र होतेच. त्यातला एक मित्र एका छोट्याशा दुकानामध्ये चहा बनवतो तर उरलेले चौघेजण शहरांमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी तो चहा पोचवतात. प्रत्येक ऑफिसमध्ये जाताना सॅनिटायझर, मास्कचा वापर केला जातो. फोन केल्यानंतर जास्तीत जास्त पंधरा मिनिटात चालता-बोलता चहाची टीम हजर होते. फक्त अडीच महिन्यांच्या कामाच्या जोरावर त्याने आपल्या साखळीत ६५ कार्यालये समाविष्ट केलेत. अजूनही रस्त्यावरून गाडीवर जात असताना अनेक जण चालता-बोलता चहाचा फोटो काढून घेतात. आता तो दिवसाला ७ हजार रुपयांप्रमाणे, महिन्याला जवळपास २ लाखांचा व्यवसाय करतो.
रेवनला विचारलं हे कसं जमवलं तर तो म्हणतो,'जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा एक संधी असलेला दरवाजा तुमच्या समोर असतो. तो ओळखता यायला हवा इतकंच. बाहेरून चकचकीत दिसणारं आयुष्य जगण्यापेक्षा आवडीचं, समाधान देणारं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिकदृष्ट्या पाठबळ देणारं काम करणाऱ्यासारखा दुसरा आनंद नाही. लोक सगळ्या बाजूने बोलत असतात, तुम्ही काही करू शकणार नाही इथपासून ते तुम्ही आता संपले इथपर्यंत. पण तरीही पुन्हा उभं राहणं हे फक्त आणि फक्त आपल्याच हातात असतं. पहिल्या व्यवसायात प्रचंड अपयश आल्यानंतरही मी याच विचारातून उभा राहिलो आणि चालता-बोलता चहा सुरू केला'.
रेवन आमच्याशी गप्पा मारत असतानाही त्याला चहा मागण्यासाठी सलग फोन येत होते. बोलणं झालं आणि रेवन त्याची चहाची बॅग पाठीला लावून निघूनही गेला, त्याची स्वप्नं मात्र त्याच्या पुढे धावताना दिसत होती, त्याच्या गाडीपेक्षा अधिक वेगाने...
( नेहा पुण्यात लोकमत डॉट कॉमची वार्ताहर आहे.)
neha25saraf@gmail.com