अमेरिकन प्रेमाचा ‘के’ व्हिसा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 06:55 PM2019-03-09T18:55:16+5:302019-03-09T19:02:36+5:30
भारतातून अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या तरुणांची संख्या अलीकडे वाढतेच आहे. अमेरिकेतील वास्तव्यासाठी एचवन-बी व्हिसापासून ते स्टुडंट व्हिसा, वर्क व्हिसा.. असे अनेक प्रकारचे व्हिसा सामान्यपणे वापरले जात असले तरी भारतीय आणि अमेरिकन नागरिकांचे ‘प्रेमाचे’ संबंध बघता अलीकडच्या काळात ‘के’ व्हिसाच्या मागणीचे प्रमाणही लक्षणीय वाढते आहे.
- सोहम गायकवाड
तरुणांना अमेरिकेचं आकर्षण फार मोठं असतं. कुठल्याही मार्गानं अमेरिकेत जावं आणि तिथेच सेटल व्हावं असंही अनेकांना वाटत असतं. शिक्षणासाठी आणि अमेरिकेत नोकरीसाठी जाणाऱ्या भारतीय तरुणांची संख्या तर खूपच मोठी आहे. त्यासाठी लागणाऱ्या एचवन-बी व्हिसासंदर्भातल्या बातम्या तर कायमच चर्चेत असतात.
मात्र याशिवायही अमेरिकेत प्रवेश करण्यासाठीचे अनेक ‘कॉमन’ व्हिसा आहेत. उदाहरणार्थ.. टूरिस्ट व्हिसा, बिझिनेस व्हिसा, वर्क व्हिसा, स्टुडंट व्हिसा, एक्स्चेंज व्हिजिटर व्हिसा, ट्रान्झिट व्हिसा, रिलिजस वर्कर व्हिसा, डोमेस्टिक वर्कर व्हिसा, मिडिया आणि जर्नालिस्ट व्हिसा..
अमेरिकेत प्रवेशासाठी इतरही अनेक व्हिसा असले तरी सामान्यपणे हे व्हिसा भारतीय नागरिकांकडून सामान्यपणे जास्त प्रमाणात वापरले जातात.
मात्र याशिवाय आणखीही एक प्रकारचा व्हिसा अलीकडे जास्त प्रमाणात वापरला जाऊ लागलाय.
बऱ्याच जणांना त्याची माहिती नसली तरी त्याची चौकशी मात्र मोठ्या प्रमाणात व्हायला लागलीय.
या व्हिसाचं नाव आहे ‘के’ व्हिसा..
अमेरिकेत गेल्यानंतर, तिथे रुळल्यानंतर, अमेरिकन कल्चर त्या त्या व्यक्तीच्या अंगवळणी पडतंच. त्यामुळे अशा व्यक्ती बऱ्याचदा तिथल्या तरुण किंवा तरुणीच्या प्रेमात पडतात आणि तिच्याशीच विवाह करतात.
भारतीय नागरिकांनी अमेरिकन नागरिकाशी विवाह करण्याच्या घटना अलीकडे बऱ्याच प्रमाणात वाढलेल्या दिसतात. भारत आणि अमेरिकेचे राजकीय संबंध कसेही असले तरी अमेरिकन नागरिकांनाही भारतीय जोडीदार हवाहवासा वाटू लागलाय. त्यामुळे अमेरिकन आणि भारतीय नागरिकांचे विवाह अलीकडे वाढताहेत.
त्यामुळेच ‘के’ व्हिसाची मागणीही अलीकडे वाढलीय.
काय आहे हा ‘के’ व्हिसा?
अमेरिकन तरुण किंवा तरुणीशी एंगेजमेण्ट झालेली असल्यास ‘के’ व्हिसाद्वारे त्या व्यक्तीला अमेरिकेत प्रवेश मिळू शकतो. मात्र या व्हिसाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या व्यक्तीनं अमेरिकेत प्रवेश केल्यावर ९० दिवसांच्या आत त्याला अमेरिकन व्यक्तीशी विवाह करणं बंधनकारक आहे. अन्यथा ही व्हिसा रद्दबातल ठरतो आणि त्या व्यक्तीला पुन्हा आपल्या मायदेशी परतावं लागतं.
अमेरिकन नागरिकाशी विवाह केल्यानंतर त्या परदेशी व्यक्तीला कायमस्वरुपी नागरिकत्वासाठी अर्ज करता येतो. ‘के-वन’ व्हिसा हा तांत्रिकदृष्ट्या नॉन इमिग्रण्ट व्हिसा आहे. या व्हिसामुळे परदेशी व्यक्तीला अमेरिकेत वास्तव्य करण्याची परवानगी मिळते, मात्र इमिग्रण्ट व्हिसासाठी आवश्यक असलेले निकष तिनं पूर्ण केलेले हवेत. विवाहानंतर ‘के-वन’ व्हिसाधारक व्यक्तीला अपत्य झाल्यास त्या अल्पवयीन अपत्यासाठी ‘के-टू’ व्हिसासाठी ती अर्ज करू शकते.
‘के-1’ व्हिसासाठी अटी
‘के-वन’ व्हिसावर अमेरिकेत येऊ इच्छिणाऱ्या व्यक्तिंसाठी काही अत्यावश्यक बाबींचीही पूर्तता करावी लागते.
१- या व्हिसावर अमेरिकेत येऊ इच्छिणाऱ्या व्यक्तिसाठी अर्ज करणारी व्यक्ती अमेरिकन असावी.
२- या दोन्ही व्यक्तींचे अमेरिकेत होणारे लग्न कायदेशीरदृष्ट्या वैध असावे. त्यात कोणतीही अडचण नसावी.
३- या दोन्ही व्यक्ती एकमेकांच्या चांगल्या परिचित आणि गेल्या दोन वर्षांत एकमेकांची त्यांनी प्रत्यक्ष भेटही घेतलेली असावी.
४- एंगेजमेण्ट झालेली आणि अमेरिकेत येऊ इच्छिणाऱ्या या व्यक्तीचं पोलीस रेकॉर्ड स्वच्छ असावं. त्याचं आरोग्यही सुदृढ असावं. त्यासंदर्भातली कागदपत्रं त्याला अमेरिकन प्रशासनाला सादर करणं अनिवार्य आहे.
५- विवाहेच्छुक दोन्ही उमेदवारांनी अमेरिकन काऊन्सिलरसमोर मुलाखतीसाठी प्रत्यक्ष हजर राहणं आणि आम्ही दोघं अमेरिकेत राहू इच्छित असल्याचं त्यांना सांगणंही बंधनकारक आहे.
या साऱ्या अटींची पूर्तता झाल्यानंतरच ‘के-वन’ व्हिसा मिळू शकतो.