आमीर
By admin | Published: March 14, 2017 04:26 PM2017-03-14T16:26:40+5:302017-03-14T16:26:40+5:30
पापा कहते है ते खतरनाक बापूपर्यंतचा महत्वाकांक्षी परफेक्शनिस्ट प्रवास
‘पापा कहते है बडा नाम करेगा’ असं गात आपल्या भेटीला आलेला एक चॉकलेट बॉय. तेव्हा तो किती क्यूट वाटला होता. जंगलात हरवलो आणि एकत्र रहायला मिळतंय म्हणून आनंदानं गाणारी, गजब का है दिन देखो जरा म्हणत नाचणारी राजची मैत्रीण. पण तो मात्र तेव्हाही प्रॅक्टिकल. तिला सांगणारा, ‘ क्या कहूं मेरा जो हाल है, रात दिन तुम्हारा खयाल है, फिर भी जाने जां, मै कहां और तूम कहां..’
-हे त्याचं असं फोकस्ड असणं त्या सिनेमापासूनच सुरु झालं असेल का? की असेलच त्याच्यात ते जंगलात हरवलेल्या वाटांतून आपला रस्ता अचूक शोधून काढणं... पण तसं असतं तर त्याला आपली वाट चटकन सापडली असती. यशाचं सूत्रही पहिल्या फटक्यात हातात आलं असतं. पण तसं झालं नाही पहिला सिनेमा सुपरडूपर हिट ठरला पण त्याचक्षणी अपयशानं त्याची पाठ धरलीच. पुढचे त्याचे अनेक चित्रपट, त्यात त्या फॉर्म्युल्याचे चित्रपट बेदम मार खावून आपटले. वन फिल्म वंडर तो ठरेल की काय अशी शक्यता होतीच.
असंख्य चूका केल्या त्यानं सिनेमे निवडताना पण त्यातून तो हेच शिकला की चूका होवूच शकतात. पण त्या वेळीच सुधारायला हव्यात.. त्यानं त्या सुधारल्या.. दिल ते दंगल हा त्याचा प्रवास फक्त त्याच्या सिनेमाच्या नावांतून फक्त डोळ्यासमोर आणा.
अंदाज अपना अपनाअपनावाला टाईमपास टपोरी, ते रंगीलातला टपोरी मून्ना! ज्याला काही स्वप्नबिप्न नाहीत, अपून पब्लिक है पब्लिक म्हणून मस्त जगणारा. जो जिता वहीं सिंकदरमधला बदमाश पण रेस जिंकणारा संजयलाल, तापट राजा हिंदुस्थानी, लगानमधला महत्वाकांक्षेनं झपाटलेला अत्यंत मानी आणि धाडसी भूवन, थ्री इडियट्समधला रॅँचो, आणि दिल चाहता है, रंग दे बसंती, सरफरोश, तारें जमीं पर, ते दंगल..
किती नावं, किती रुपं..
पण प्रत्येकात तो एकच गोष्ट पुन्हा पुन्हा दाखवतो, परफेक्शन.
जे करायचं ते झोकून देवून करायचं.
मागे हटायचं नाही. लोक काही का काम करेनात, कसं का करेनात,
त्यानं जे सिनेमे केले ते त्याच्या स्टाईलनं केले. वर्षाला एक सिनेमा हा जुगारच होता,पण त्यानं तो खेळला आणि त्या धोक्यातून त्यानं जे स्वत:ला घडवलं ती त्याची आजची ओळख आहे.
कुणाशी स्पर्धाबिर्धा करण्याच्या भानगडीतच तो पडत नाही, पडला नाही. ना पुरस्कारांची त्यानं फिकीर केली. त्यानं लक्ष दिलं ते फक्त त्याच्या कामावर..
त्याच्या कामातलं हे परफेक्शन आपल्यात आलं तर?
न येण्यासारखं काही नाही, पण आपण तेवढं आपल्या कामावर फोकस करू शकलो तर..
-चिन्मय लेले