अमरावतीचा तरुण करतोय नासाचा स्पेस टॉयलेट प्रोजेक्ट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 07:56 AM2020-12-17T07:56:27+5:302020-12-17T08:00:15+5:30

अमरावतीचा ऋषभ नासाच्या स्पर्धेत सर्वोत्तम ठरला आता तो स्पेस टॉयलेटच्या प्रोजेक्टवर काम करतोय

Amravati's youth is doing NASA's space toilet project | अमरावतीचा तरुण करतोय नासाचा स्पेस टॉयलेट प्रोजेक्ट 

अमरावतीचा तरुण करतोय नासाचा स्पेस टॉयलेट प्रोजेक्ट 

Next

-गणेश देशमुख 

ऋषभ भुतडा : वय वर्षे २३, पेटंट ११, पुस्तकं ६ आणि आता हातात नासाचं निमंत्रण आणि राहणार अमरावती. ही सगळी माहिती वाचून तुम्हाला धाप लागेल; पण अमरावतीच्या ऋषभ भुतडाने वयाच्या २३ व्या वर्षी ही कमाल करून दाखवली आहे.

अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून ग्रामीण भारतात क्रांती आणू इच्छिणारा हा तरुण. २०२४ साली होऊ घातलेल्या नासाच्या चांद्रयान मोहिमेसाठीच्या ‘स्पेस शटल’मध्ये ऋषभ अंतराळानुकूल टॉयलेट निर्माण करतो आहे. नासाने त्यासाठी त्याला प्रोजेक्ट हेड पदासाठी निमंत्रणही दिलं आहे.

अमरावतीच्या नारायणदास लढ्ढा हायस्कूलमध्ये केंद्र शासनाच्या ‘अटल इनोव्हेशन मिशन’मध्ये ऋषभ शिक्षक आहे. नवनवे संशोधन करून त्यातून उद्योजक तरुण निर्माण करणं हा या मिशनचा उद्देश. स्वत: ऋषभही सतत ध्यास घेतल्यासारखा अभ्यास करत असतो आणि त्या अभ्यासाच्या जोरावरच तो जोरदार प्रगती करतो आहे.

ऋषभचे वडील खासगी क्षेत्रात अकाऊंटंट असलेले पवन भुतडा आणि गृहिणी असलेल्या कीर्ती भुतडा यांचा ऋषभ हा एकुलता एक मुलगा. अमरावतीतच त्याचं शिक्षण झालं. पुढे डॉ. राजेंद्र गोडे रिसर्च ॲण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयातून दोन वर्षांत मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा त्याने पूर्ण केला. त्यानंतरचे शिक्षण महाविद्यालयात न जाता त्यानं डिस्टन्स लर्निंग पद्धतीने पूर्ण केले. ‘ईडीएक्स’ या आंतरराष्ट्रीय दूरस्थ शिक्षण व्यवस्थेतून ऋषभने ‘अ‍ॅस्ट्रोबायोलॉजी’ आणि ‘एअरोनॉटिकल इंजिनीअरिंग’ या विषयांत प्रत्येकी दोन वर्षांचे डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण केले.

अमरावतीतील प्रसिद्ध शिवटेकडी येथे अनेक लोक ‘मॉर्निंग वॉक’ला जातात. लोक चालत असताना वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प ऋषभने महापालिकेला दिला होता. शिवटेकडीवर २०१३-१४ साली तो साकारलाही गेला. नागरिकांनी योग्य ती निगा न राखल्याने आता तो नादुरुस्त अवस्थेत आहे, हा भाग अलाहिदा. तथापि, ऋषभच्या संशोधनाची दिशा त्यातून लक्षात यावी. रस्ता दुभाजकांचा कल्पक उपयोग करून हवेतील प्रदूषण शोषून घेणे व हवेच्याच माध्यमातून वीजनिर्मिती करणे हा शहराचे आरोग्य सुधारणारा प्रकल्पही महापालिकेला २०१६ साली सुचविला होता. चालता-चालता मोबाईल चार्ज करणारे जोडे ऋषभने संशोधित केले आहेत. ऋषभशी बोललं तर कुतूूहल वाढवणाऱ्या अशा अनेक गोष्टी तो सांगत असतो.

ऋषभ अवघ्या २३ वर्षांचा असला तरी त्याची कामगिरी ‘लार्जर दॅन लाईफ’ या संज्ञेत समाविष्ट होणारी आहे. ऋषभने आतापर्यंत ११ संशोधनांचे पेटेंट मिळविले आहे. सहा पुस्तके लिहून झाली आहेत. विज्ञानाचा दैनंदिन जीवनात सहजपणे उपयोग करून मानवी आयुष्य आणि जीवनशैली सुखकर करणं हे आपलं ध्येय, असं ऋषभ सांगतो.

‘स्पेस टॉयलेट’ काय आहे?

‘स्पेस टॉयलेट’मध्ये मानवी मूूत्राचे शुद्धीकरण करून त्याचा पिण्याच्या पाण्यासाठी पुनर्वापर केला जातो. मल मात्र ‘रिसायकल’ होत नाही. ‘झीरो ग्रॅव्हिटी’च्या या टॉयलेटमधील मानवी विष्ठा ‘सक्शन कप’मध्ये ओढली जाऊन नंतर अंतराळात ती ‘ब्लास्ट’ केली जाते. त्यातून निर्माण होणारा कचरा ‘स्पेस शटल’चा पाठलाग करत असणारी यंत्रणा एकत्रित करते. यापूर्वीच्या ‘स्पेस शटल’मध्ये ही व्यवस्था रशियाने नासाला पुरविली होती. ती सदोष ठरली. आगामी चांद्रयान मोहिमेसाठी जगभरातील कल्पक वैज्ञानिकांकडून नासाने संकल्पना मागवल्या होत्या. ऋषभने त्यासाठी संकल्पना पाठवली जी सर्वोत्तम म्हणून निवडली गेली. संकल्पना नासाला मी चांद्रयान मोहिमेसाठी निर्दोष ‘स्पेस टॉयलेट मॉडेल’ देऊ शकेन, अशी ऋषभला खात्री आहे. त्यासाठीचे पायाभूत काम त्यानं सुरूही केलं आहे. नासाचे वेळापत्रक आल्यावर ऋषभ अमेरिकेतील नासा मुख्यालयात साधारणत: वर्षभर प्रकल्प प्रमुखपदी कंत्राटी पद्धतीने टॉयलेट निर्मितीसाठी प्रत्यक्ष काम करणार आहे.

(लेखक लोकमतच्या अमरावती कार्यालयात संपादकीय प्रमुख आहेत.)

zoonzar007@gmail.com

Web Title: Amravati's youth is doing NASA's space toilet project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.