अंजूची किक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 08:05 PM2018-04-27T20:05:52+5:302018-04-27T20:05:52+5:30

मुलींनी फुटबॉल खेळणं, त्यात करिअर करणं शक्य नाही असं कोण म्हणतं?

Anju kicks | अंजूची किक

अंजूची किक

Next

- संदीप आडनाईक
कोल्हापूरच्या अंजूनं फुटबॉल प्रशिक्षक म्हणून नामांकित ए श्रेणीचा परवाना मिळवला, त्याची गोष्ट. फुटबॉल वेड्या कोल्हापुरात घराघरात फुटबॉलपटू आहेत. मुलांचेच नाहीत तर सध्या मुलींचेही अकरा फुटबॉल संघ खेळत आहेत. मात्र यासाऱ्यांत अजून एक पुढचं पाऊल गडहिंग्लजच्या अंजू तुरुंबेकरने टाकलं आहे. अलीकडेच ती एशियन फुटबॉल कॉन्फेडरेशनची ‘ए’ लायसन्स परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. देशात तिच्यासह केवळ पाच महिलांनाच या परीक्षेत आतापर्यंत उत्तीर्ण होता आलंय, अंजू महाराष्ट्रात पहिलीच.
बेकनाळ येथील (ता. गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर) इथली ही मुलगी. तिचा फुटबॉलचा प्रवास तसा रंजकच म्हणावा लागेल. मुळात तिला शाळेत असताना नृत्याची आवड होती. मात्र घरच्यांचा नृत्य करण्याला विरोध होता. मग खेळ म्हणून ती धावण्याचा सराव करू लागली. नववीत गेली तसं धावणंही बंद झालं. दहावीत असताना मात्र गडहिंग्लज हायस्कूलमध्ये नोटीस बोर्डवर मुलींच्या फुटबॉल संघात निवडीसाठीची नोटीस लागली. अंजूला फुटबॉलमध्येही रस होता. तिनं ठरवलं फुटबॉल खेळायचं. गडहिंग्लजच्या नामांकित समजल्या जाणा-या मास्टर्स स्पोर्ट्स क्लबमध्ये दुपारनंतर शाळा चुकवून तिनं सरावास सुरुवात केली. त्यातून राज्याच्या मुलींच्या संघात तिची निवड झाली. ही बाब घरात वडिलांना कळल्यानंतर त्यांनी फुटबॉल खेळण्यास प्रथम विरोध केला. पण पुढं त्याची धार बोथट झाली.
अंजू सांगते, ‘घरच्यांना वाटत होतं की, मी पोलीस भरती व्हावं. माझ्याकडे राष्ट्रीय पातळीवरील खेळाची प्रमाणपत्रं असल्यानं ते सोपं झालं असतं. पण मला त्यात रस नव्हता.’ त्यातच तिची महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील संघात निवड झाली. निवडीसाठी मुंबईला गेल्यानंतर तेथे तिची संतोष कश्यप यांच्याशी ओळख झाली. त्यांनीही तिला प्रोत्साहन दिलं. अंजूनेही या खेळातच करिअर करण्याचा निर्णय घेतला.
तिला दीड एक वर्षे पुण्यात एका क्लबसाठी खेळण्याची संधी मिळाली. दरम्यान, तिने पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातून पदवीचं शिक्षण घेतलं. मुंबईतील मॅजिक बस इंडिया फाउण्डेशनने कोचिंगसाठी संधी दिली. खेळता येणार होतं त्याच बरोबर शिक्षणासाठी पैसेही मिळणार असल्यानं ही संधी तिनं स्वीकारली. पुढे अखिल भारतीय फुटबॉल महासंघामध्ये मला ग्रासरुट लीडर म्हणून नोकरी मिळाली. त्यातून तिला देशभरात सहा ते बारा वयोगटातील मुलामुलींकरिता ग्रासरुटवर अर्थात फुटबॉलचं तंत्रशुद्ध धडे देण्याचे काम मिळालं. याच वयोगटातल्या मुलींना प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही फुटबॉल महासंघाने तिच्यावर सोपवली. आणि आता तर प्रशिक्षक म्हणून मान्यता मिळवत तिला ‘ए’ श्रेणीचा परवाना मिळाला आहे. आता तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांसह पुरुष संघाचंही प्रशिक्षक म्हणून काम करता येणार आहे.
--------
मी जेव्हा फुटबॉल खेळायला सुरुवात केली. तेव्हा देशात फुटबॉलमध्ये मुली नव्हत्या. आता मुलींसाठी अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. आॅल इंडिया फुटबॉलतर्फे विविध उपक्रम राबविले जात असतात. मीही फुटबॉलच्या वाढीसाठी आणि त्याच्या प्रसारासाठी काम करत राहणार आहे.
- अंजू तुरुंबेकर

Web Title: Anju kicks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.