अंकुशची उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 03:45 PM2018-01-10T15:45:09+5:302018-01-11T08:47:56+5:30
नाशिकचा अंकुश मागजी. त्याच्याकडे ना डिग्री ना शिक्षण. पण त्यानं सौर ऊर्जेवर चालणारी रिक्षाच तयार केलीय...
- संजय पाठक
शिक्षण हवंच, पण पुस्तकी शिक्षण नाही, डिग्री नाही म्हणून जे करायचं ते केलंच नाही असं सांगत बसलं तर संपलंच सारं. आपण जे करु शकलो नाही त्याचं खापर फोडायला अशी कारणं बरी असतात.
पण ज्यांना एखादी गोष्ट करायचीच असते, त्यांना कुणी अडवू शकत नाही. ते काहीतरी जुगाड करतात, डोकं आपटतात, हातपाय मारतात पण जमवतातच.
ते कसं जमतं हे विचारा नाशिकच्या अंकुश मागजी या तरुणाला. आधी स्कूटर, मग मोटरसायकल आणि नंतर थेट थेट सौर ऊर्जेवर चालणाºया आॅटो रिक्षा तयार करण्याचे यशस्वी प्रयोग त्यानं केले आहेत. आणि आजवर एक दोन नव्हे तर सौर ऊर्जेवर चालणाºया तब्बल १९ रिक्षा त्यानं विकल्या आहेत. पण हे सारं करायचं तर त्याच्याकडे ‘फॉर्मल’ असं शिक्षण नव्हतं.
दहावी उत्तीर्ण झाला तेव्हा त्याला फोटोग्राफीची आवड निर्माण झाली होती. तो विविध कार्यक्रमांचे फोटो काढू लागला, त्यातून पैसेही मिळत. अकरावीला कॉमर्स शाखेत प्रवेश घेतला पण शिक्षणात त्याचे मन रमेना. मला जे पाहिजे ते ज्ञान पाहिजे तेव्हा मिळवील असं तो म्हणायचा, पण निदान डिग्री तरी पूर्ण कर म्हणून आईवडील, नातेवाईक , मित्र आग्रह करत. परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. अंकुश म्हणतो, ‘माझा शिक्षणाला विरोध नव्हता, त्याचं महत्व मला कळतं. पण चौकटीतच शिक हे मला कळत नव्हतं. मला वाटेल तेव्हा मी लॉची पुस्तकं वाचेन, वाटेल तेव्हा मेडिकलची पुस्तकं वाचेन..मला कुणी सक्ती का करावी?- असं मनात यायचं.’
असा मनमौजी असल्यानं त्यानं शिक्षण अर्धवट सोडलं. फोटोग्राफी करताना आवडली ती पुस्तकं वाचली. दरम्यान, त्याचं एलइडी लाइटसारख्या अनेक व्यवसायांकडे लक्ष वेधलं गेलं. याचवेळी नाशिकच्या डोंगरे मैदानावर एका प्रदर्शनात सौर ऊर्जेवर चालणारे लाइट्स आणि अन्य अनेक प्रकारची उपकरणं त्यानं बघितली. त्यामुळे सौर ऊर्जेवर काहीतरी वेगळं आणि उपयुक्त करण्याचं त्यानं मनोमन ठरवलं. सौर ऊर्जेकडे जाण्याचं एक वेगळं कारणही होतं. शहरातील रिक्षांचा धूर, त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास आणि प्रदूषण यामुळे पारंपरिक पेट्रोल-डिझेलला पर्याय असायला हवा असं म्हणत काहीतरी शोधण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता.
सौर ऊर्जेविषयी माहिती घेतल्यानंतर सुरुवातीला एका दुचाकीमध्ये बदल करून सोलर पॅनलच्या माध्यमातून ती चालविण्याचा प्रयत्न केला. हा प्रयोग यशस्वी झाला. त्याचा अॅव्हरेज काढला तर पाच रुपयांत साठ किलो मीटर असा अफलातून निघाला. अर्थात हा प्रयोग होता. आता या विषयात पुढं जाण्याचं त्यानं ठरवलं. बराच खटाटोप केल्यानंतर मग अॅटो रिक्षावर प्रयोग केला. हा प्रयोग यशस्वी होत असताना व्यवसाय म्हणून याचा विचार करायला हवा असं त्यानं ठरवलं. पण त्यासाठी शासकीय परवानग्या आणि परवाने लागणारच.
२०१४ मध्ये अंकुशनं केंद्र सरकारकडे उद्योग सुरू करण्यासाठी अर्ज केला. ९ ऑक्टोबर २०१५ रोजी सरकारने उद्योग परवाना दिला आणि १ मार्च २०१६ रोजी त्यानं पहिली रिक्षा रस्त्यावर आणली. तिला आरटीओकडून मान्यता मिळाली. या रिक्षाला कोणत्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन लागणार नाही. फक्त इन्शुरन्स करण्याची अट घालण्यात आली. व्यावसायिक गरजा लक्षात घेऊन बॅटरीच्या क्षमतेनुसार सोलर चेतक आणि सोलर मित्र अशा दोन प्रकारच्या रिक्षा तयार केल्या.
अर्थात स्थानिक रिक्षाचालकांकडून या रिक्षेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. महाराष्ट्रात कोणी नसेल इच्छुक परंतु ऑनलाइन प्रचार झाला तर देशात कुणी ना कोणी तरी ही रिक्षा घेईल, असा विचार करून अंकुशने प्रयत्न सुरु केले होते. विशाखापट्टणमच्या एकानं एक रिक्षा खरेदी केली. त्यानंतर कोलकाता, अहमदाबाद, विशाखापट्टणम येथे ग्राहक मिळाले आणि आत्तापर्यंत १९ रिक्षांची विक्री झाली. शासनाकडून वित्तीय सहाय्य मिळाल्यास हा व्यवसाय अधिक चांगल्या पद्धतीने करण्याची अंकुशची इच्छा आहे.
आपल्या फोटोग्राफीतून मिळणाºया उत्पन्नातून तो सध्या अधिक अभ्यास करतो आहे. तो सांगतो, ‘पारंपरिक शिक्षण न घेता मी खुल्या जगातून माझ्या गरजेनुसार हवं ते शिकतो आहे. त्यातून मस्त नवीन काहीतरी घडवतोय याचा आनंद आहे!’
अंकुशची ही सोलर रिक्षा वेग घेईल तेव्हा घेईल पण त्याच्या जुगाडू आणि जिद्दी मेहनतीनं वेग घेतला आहे..
( लेखक लोकमतच्या नाशिक आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)