अॅण्टी कोरोना मार्च ! - जर्मनीसह युरोपात आणि अमेरिकेतही तरुण मुलं रस्त्यावर..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 02:09 PM2020-09-03T14:09:33+5:302020-09-03T14:11:26+5:30
लॉकडाऊन हटवा, कोरोनासाठीचे र्निबध हटवा म्हणत त्यांनी व्यवस्थेसमोर प्रश्न उभे केलेत; पण व्यवस्था उत्तर न देता या तरुणांना चोप देऊ लागल्या आहेत. कारण.
कलीम अजीम
शनिवारी एकाच दिवशी जर्मनी, ब्रिटेन आणि अमेरिकेत ‘अॅण्टी कोरोना प्रोटेस्ट’ मार्च झाले. हजारोंच्या संख्येने तरुणांनी एकत्र येऊन लॉकडाऊन आणि इतर नियमांच्या सक्तीविरोधात प्रदर्शने केली.
तीनही ठिकाणी आंदोलक फेस मास्क न वापरता, फिजिकल डिस्टन्सिंग न पाळता घोषणाबाजी करत होते.
नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलं शिवाय दंडाची रक्कमही वसूल केली.
जर्मनीमध्ये दोन गटांचे सुमारे 38,000 जण एकत्र आल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
राजधानी बर्लिनमध्ये झालेल्या या निदर्शनाला ‘अॅण्टी कोरोना प्रोटेस्ट मार्च’ असं नाव देण्यात आलं होतं. लॉकडाऊनची सक्ती, निर्बंध व उपचाराच्या नावाने होणारी लूट थांबवावी, अशी मागणी आंदोलक करत होते.
‘सक्तीच्या सुटय़ा आता नको’, ‘वॅक्सिनच्या सक्तीची गरज नाही’, ‘सत्यता जाणा, जागे व्हा’, ‘घोटाळा संपवा’ असे अनेक बोर्ड हातात घेऊन हजारो तरुण-तरुणी, महिला, वृद्ध आणि लहान मुलंही आंदोलनात सामील झाली होती.
नियोजित मोर्चा दुपारी सुरू झाला. निदर्शकांनी ब्रॅण्डनबर्ग गेट आणि व्हिक्टरी कॉलमच्या दिशेने शांततेत वाटचाल केली.
ब्रॅण्डनबर्ग गेटजवळ झालेल्या निदर्शनात 30 हजार आंदोलक सहभागी होते. पोलिसांच्या मते मोर्चात सामील एकाही आंदोलकांनी फेस मास्क लावला नव्हता. शिवाय शारीरिक अंतरही राखलं नव्हतं. कोरोना रोगराई रोखण्यासाठी लावण्यात आलेले प्रतिबंध काढावे, उपचारातली अनियमितता दूर करावी, नियमांत शिथिलता आणावी, शाळा, कॉलेज पूर्ववत व्हावीत, सक्ती कमी करावी, शिवाय लॉकडाऊन हटवावं, अशी मागणी आंदोलक करत होते.
सरकारी निर्बंध म्हणजे स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांचं उल्लंघन आहे, असा निदर्शकांचा आरोप आहे. सर्वांना स्वातंत्र्याचा अधिकार आहे; पण सरकार तो हिरावून घेत आहे, स्वातंत्र्याला धक्का लावणारे हे नियम आम्हाला मान्य नाहीत, असा पवित्रा निदर्शकांनी घेतला. इथला निषेध मार्च शांततापूर्वक होता. मात्र संसद भवनजवळ झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले.
फिजिकल अंतर न राखता मोठा जनसमुदाय जमा झाल्याने पोलिसांनी आंदोलकांना परत जाण्यास सांगितलं. परंतु निदर्शकांनी ठिय्या मांडला. बर्लिन पोलिसांनी या विरोध प्रदर्शनाला बळाचा वापर करत आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. संतप्त निदर्शकांनी पोलिसांवर बाटल्या आणि दगडफेक केली. यात अनेकजण किरकोळ जखमी झाले. पोलिसांच्या मते आंदोलक हिंसक झाल्याने नाइलाजाने बळाचा वापर करावा लागला.
उन्माद माजवणार्या सुमारे 300 आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. संतप्त जमावाला नियंत्रित करण्यासाठी 3,000 पोलिसांची कुमक लावण्यात आली होती. पोलीस महिला व वृद्ध आंदोलकांना फरफटत घेऊन जातानाचे फोटो दि गार्डियन व वॉल स्ट्रिट जर्नलच्या वेबसाइटला होते. स्थानिक मीडिया हाउस डायच्च वेलेनदेखील पोलीस बळाचा वापर करत असल्याचे बरेच फोटो-फिचर प्रकाशित केले.
पोलिसी अत्याचाराचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर आल्याने देशभरातून संतप्त प्रतिक्रि या आल्या. हफिंग्टन पोस्टच्या मते जर्मनीच्या अॅण्टी कोरोना आंदोलनाचे लोट संपूर्ण यूरोपमध्ये परसले. ठिकठिकाणी तरुणांनी एकत्र येत लॉकडाऊनच्या सक्तीचा विरोध केला.
यापूर्वी अशा प्रकाराचे विरोध प्रदर्शन पॅरिस व अन्य ठिकाणीदेखील झाले होते.
एकाच दिवशी यूरोपमध्ये अनेक निदर्शने झाली. सोशल मीडियातून लॉकडाऊनविरोधात एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. जर्मनीचे गृहराज्यमंत्री अॅण्ड्रियास गिझेल यांचं म्हणणं होतं की, रशियन वकिलातीसमोर आंदोलन करणार्यांमध्ये उजव्या विचारांची लोक सामील होती, त्यामुळे त्या आंदोलनाला हिंसक वळण लागले.
डायच्च वेले म्हणतात, ‘गेल्या काही दिवसांपासून उजवे गट सरकारविरोधात प्रचंड टीका करत आहेत. अनेक आंदोलकांच्या शर्टावर उजव्या विचाराचे स्लोगन होते.’
गृहराज्यमंत्री म्हणतात, ‘त्यांना असा प्रयत्न पुन्हा करु देणार नाही.
वल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जर्मनीत दोन लाख 42 हजार बाधित रुग्ण आहेत. त्यातील दोन लाख 13 हजार बरे झाले आहेत. मृताचा आकडा 9,360 पेक्षा अधिक आहेत. मृत्युदर व रिकव्हरी रेट कमी असल्याने लॉकडाऊन शिथिल करावे, अशी मागणी जर्मनीमध्ये जोर धरत आहे.
ब्रिटनमध्येदेखील नियमात शिथिलतेच्या मागणीसाठी निदर्शने झाली.
शेकडो लोकांनी लॉकडाऊन, प्रतिबंध आणि फेस मास्क घालण्याच्या विरोधात राजधानीच्या ट्राफलगर चौकात गर्दी केली होती. आंदोलकांनी संतप्त होत आपल्या मागण्या रेटून धरल्या. परिणामी पोलिसांनी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.
लॉकडाऊनचे नवे नियम काढून टाकावेत, लसीची सामूहिक सक्ती बंद करा, आरोग्य सुईच्या टोकापासून मिळत नाही, उपचाराच्या नावाने होणारी फसवणूक बंद करावी, कोरोनाचा घोटाळा बंद करावा, अशा मागण्याचे फलक हातात घेऊन निदर्शक घोषणाबाजी करत होते.
निदर्शक ‘कोविड अॅक्ट’च्या नूतनीकरण करण्यास मनाई करत आहेत. तरीही त्यांनी त्यास मान्यता दिली तर आम्ही त्यांना पदावरून काढून टाकण्याची मोहीम राबवू, असा पवित्रा त्यांनी घेतला. इथल्या बहुसंख्य नागरिकांना वाटते की, कोरोना उपचाराच्या नावाने आपण फसवले जात आहोत.
अमेरिकेत गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाऊनचा सतत विरोध केला जात आहे. शनिवारीदेखील विविध ठिकाणी याच मुद्दय़ावरून निदर्शने झाली. शिवाय सार्वत्रिक निवडणुकीच्या धामधुमीत कृष्णवर्णीयांची हत्या हा ज्वलंत मुद्दा बनला. शनिवारी व रविवारी देशभरात ठिकठिकाणी ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ आंदोलनाला गती मिळाली.
ब्लॅक पँथर सिनेमाच्या मुख्य नायकाच्या मृत्यूसह या बातमीला प्रमुख स्थान प्राप्त झाले होते.
अमेरिकेत सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत उभय पक्षाकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.
लॉकडाऊन, कोराना व्हायरस, बेरोजगारी व कृष्णवर्णीयांच्या बाबतीत होणारा सततचा वांशिक भेदभाव ज्वलंत मुद्दे म्हणून पुढे आले आहेत.
जगभरात आता लॉकडाऊनला विरोध होत आहे. रोगराईला आळा बसवण्यासाठी अस्तित्वात आलेली ही उपाययोजना आता जुनी झाली असून, इतर प्रयोग राबवायला हवेत, अशी मागणीही तरुण आंदोलक करत आहेत.
येत्या काळात हे अॅण्टी कोरोना प्रोटेस्ट मार्चचं हे लोण पसरत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
( कलीम मुक्त पत्रकार आहे.)