अनुष्काची वेलवेट साडी, झेपेल का आपल्याला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 02:26 PM2018-01-10T14:26:07+5:302018-01-11T08:46:32+5:30
- श्रुती साठे
विराट-अनुष्काचं लग्न तसं जुनं झालं, लागले दोघं संसाराला. पण त्यांनी लग्नात घातले तसे कपडे आपणही घालावे अशी उचल अनेक जिवांनी खाल्लीच. बाकी डिझायनर लेहेंगा घाला न घाला, अनुष्काची एक स्टाईल मात्र आपणही कॉपी करूच शकतो. आणि ती सहज, कुठंही. अनुष्काची बर्गंडी रंगाची वेलवेट साडी आठवा.
वेलवेट? असं म्हणत डोळे मोठे करू नका. वेलवेट पुन्हा चर्चेत आलं आहे. वेलवेट कापड प्रकारामध्ये काळा, बर्गंडी, लाल, हिरवा, ग्रे या रंगांत टॉप्स, ड्रेसेस, साड्या, कुर्ते आणि शाली असे अनेक प्रकार मिळतात. त्यातही एक मोठा बदल म्हणजे वेलवेट हे नुसते पार्टीवेअर न राहता कॅज्युअल आणि इव्हिनिंग वेअर म्हणूनसुद्धा वापरले जाऊ लागले आहेत. त्यामुळे नवीन काही, खास काही या यादीत अनुष्काकृपेनं वेलवेटला स्थान देऊन टाका.
वेलवेट का? आणि कधी?
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थंडीसाठी योग्य. वेलवेट टॉप्स पार्टी किंवा एखाद्या खास डिनर डेटसाठी एकदम उपयुक्त. हाफ किंवा फुल बाह्यांचे क्रश्ड वेलवेट टॉप्स खूप रिच लूक देऊन जातात. वेलवेट ड्रेसेसमध्ये हाय- लो, मॅक्सी, शॉर्ट- ए लाइन ड्रेस आपल्या आवडीनं करताच येते. वेलवेट टॉप्स आणि ड्रेसेस हे ‘ऑल इन इटसेल्फ’ समजले जातात. म्हणजेच या टॉप्सबरोबर खूप दागिने किंवा मेकअपची गरजच भासत नाही. त्यामुळे कमीत कमी गोष्टीत फॅशनेबल दिसण्याची ही ट्रिक आहे.
वेलवेट जॅकेट
एखाद्या पार्टीसाठी पटकन तयार व्हायचं असेल आणि ट्रेण्डी दिसायचं असेल तर वेलवेट जॅकेट हा उत्तम पर्याय आहे. तरुणींकडे तर एखादं क्रश्ड वेलवेट जॅकेट असलेलं कधीही उत्तम.
वेलवेट साडी आणि शाल
जरदोसी, मरोरी आणि मोत्याची एम्ब्रॉयडरी वेलवेट साडी आणि शाल यावर खास दिसते. गडद रंगांमध्ये मिळणाºया साड्या रात्रीच्या रिसेप्शन किंवा अन्य कार्यक्रमांसाठी वापराव्यात.
वेलवेटचे ब्लाउज
साडी खूप महाग पर्याय. पण प्लेन साडीवर एम्ब्रॉयडरी केलेलं वेलवेट ब्लाउज हा छान व सुटसुटीत पर्याय आहे.
वेलवेट घेताय, पण...
वेलवेट चांगल्या प्रतीचं वापरणं अत्यंत आवश्यक आहे. हलक्या प्रतीच्या वेलवेटची चमक, ड्रेप चांगली दिसत नाही आणि घालून पचकाच होण्याचा धोका जास्त.
(श्रुती फॅशन डिझायनर आणि स्टायलिंग एक्सपर्ट आहे.)