...कोई है? ‘लाइक्स’चं भूत मानेवर बसलेली पोरं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 04:45 PM2018-01-17T16:45:32+5:302018-01-18T07:36:42+5:30
तो बंगळुरूचा. उच्चभ्रू कुटुंबातला अठरा वर्षांचा तरुण. शिमश्या असं त्याचं नाव. त्यानं मुंबई गाठली. मित्रांकडे राहिला. कारण त्याला कळलं होतं की, मुंबईच्या मनोरा आमदार निवासात भूत आहे.
- मनीषा म्हात्रे
‘लाइक्स’चं भूत मानेवर बसलेली पोरं
जेव्हा ‘हॉण्टेड’ जागी धुडगूस घालतात...
आपण डायरेक्ट भुतालाच ‘नडलो’
हे शूट करून दाखवण्यासाठी
तो मुंबईत आला.
हॉण्टेड जागी रात्रीबेरात्री एकट्यानं
जायचं धाडस आणि
शूट करण्याची हौसही दांडगी.
हे सारं कशासाठी?
- तर ते तसले व्हिडीओ व्हायरल करून
‘लाइक्स’ मिळवण्यासाठी!
- पण सावधान, तो एकटाच नाही,
लाइक्सच्या भुतानं झपाटलेले
असे अनेक अवतीभोवती असतात हल्ली!
तो बंगळुरूचा. उच्चभ्रू कुटुंबातला अठरा वर्षांचा तरुण. शिमश्या असं त्याचं नाव. त्यानं मुंबई गाठली. मित्रांकडे राहिला. कारण त्याला कळलं होतं की, मुंबईच्या मनोरा आमदार निवासात भूत आहे. त्यानं ठरवलं की आपण रात्रीच त्या बंगल्यात जाऊ, भुताला आव्हान देऊ, ते दिसलंच तर त्याचा व्हिडीओ शूट करू. मग तो व्हिडीओ व्हायरल करू, मग लोकांना कळेल की आपण थेट भुतालाच भिडलो, नडलोच!
मनात आलं तसं त्यानं केलंही. पुनर्विकासाच्या कामामुळे बंद असलेल्या त्या बंगल्यात तो गेला. किर्र रात्र. मुंबई झोपली, सामसूम झाली असं पाहून त्यानं तो बंगला गाठला. जळमटं, कोळ्यांची जाळी, खकाणा यासाºयांतून वाट काढत त्यानं दरवाजाचं हुक तोडलं. आत शिरला. ‘आओ मुझसे मुकाबला करो’ म्हणत त्यानं मोठ्या धाडसानं भुताला हाका मारायला सुरुवात केली. त्याच्या आवाजानं आसपासच असलेल्या बंगल्याच्या सुरक्षा रक्षकांनी कान टवकारले. दोघं जण धावत आले, बंगल्यात येऊन त्यांनी शिमश्याला पकडलं.
शिमश्याला वाटलं की हेच ते भूत. भूतानंच आपल्याला धरलं. तो सारी शक्ती एकवटून हातपाय झाडू लागला. सुरक्षा रक्षकांना जुमानायलाच तयार नव्हता. शेवटी त्यांनी पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी शिमश्याला ताब्यात घेतलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, आपण शूट करायला गेलो, तिथे भूत नव्हतंच. उलट आपणच आता पोलीस ठाण्यात येऊन पोहचलो आहोत.
***
हे सारं काय आहे?
तर हा आहे, हॉण्टेड अर्थात भुतानं झपाटलेल्या ऐकीव जागी जाण्याचा काही तरुण मुलांचा भलताच धाडसी नाद. अमुक जागी भूत आहे, तमुक ठिकाणी रात्री आवाज येतात, ढमुक जागी भूत दिसतं अशा ऐकीव कहाण्या पूर्वीही होत्या. आजही आहेत. पण पूर्वी फक्त गप्पांपुरते हे विषय होते, आता हातात मोबाइल आहे. आपण अशा जागी गेलो होतो, आपण निडर आहोत, भुताला घाबरत नाही याचा पुरावा म्हणून किंवा भूतबित काही नसतंच हे सिद्ध करणारे व्हिडीओ काहीजण तयार करतात. ते मित्रांना पाठवता येतात. धाडस दाखवण्याची ही चटक अनेकांना लागते. त्यात त्यांना थ्रिल वाटतं. थ्रिलच्या शोधात मग शिमश्यासारखे अनेकजण अशा ‘हॉण्टेड’ जागी फिरतात. काहीजण तसे व्हिडीओ पाहतात किंवा तयारही करतात.
त्यातला हा एक असा पोलिसांना सापडला.
बंगळुरूतला मुलगा. हुशार. बारावी पास. काही तरी नवीन, वेगळं करून पाहण्याची त्याला भारी हौस. कॉलेज मित्रांच्या गप्पांमधून त्याला मुंबईतील आमदार निवासाबाबतची माहिती मिळाली होती. म्हणून मग तिथं जाऊन भुताला भेटायचा प्रयत्न तरी केला असा व्हिडीओ त्याला बनवायचा होता. तो आपल्या मित्रांना दाखवायचा होता. व्हायरल करायचा होता. लाइक्स मिळवायचे होते, कुछ भी करके ‘छा’ जानेका... हीच एकमेव गोष्ट त्याच्या डोक्यात. त्यानं भूतबंगला म्हणवणाºया जागेत जाऊन स्वत:चा व्हिडीओ तयार करायचं ठरवलं. पोलिसांनी खुलासेवार विचारल्यावर त्यानं स्वत:च ही माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी डोक्याला हात लावला. त्याची समजूत घातली, अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून पोलिसांनी त्याला त्याच्या घरी रवाना केलं.
या मुलाचं हे एक उदाहरण समोर आलं असलं तरी सध्या सोशल मीडियात लाइक्स आणि कमेण्टच्या या व्हायरल भुतानं अनेक तरुण मुलांना गाठलेलं दिसतं आहे. काहीजण तर घरबसल्या असे हॉण्टेड म्हणवणारे व्हिडीओ पाहतात. एका क्लिकवर आता राज्यातल्याच काय; पण देश-विदेशातील हॉण्टेड, झपाटलेल्या जागांची माहिती मिळते. सोशल मीडियात तर आपण कसं आणि कुठं भूत पाहिलं याचे रंजक वर्णन करणारे काही ग्रुप्स आहेत. आणि हे कमीच म्हणून की काय काही सेलिब्रिटी म्हणवणाºया मंडळींनीही आपण भूत पाहिल्याचे व्हिडीओ सोशल मीडियात टाकलेले दिसतात. मुंबईच्या आरे कॉलनीत भूत पाहिल्याचा एक व्हिडीओ अभिनेत्री बिपाशा बासूने व्हायरल केला होता. सोहा अली खान, वरुण धवन, इमरान हाश्मी, गोविंदा यांनीही आपल्या भुताचे किस्से सोशल मीडियात शेअर केले. अशा विषयात थरार वाटणारी तरुण मुलं हे सारंही मोठ्या चवीनं वाचतात. त्यावर चर्चा करतात. रात्रीबेरात्री आपल्या परिसरातल्या अशा ऐकीव जागी जाण्याचं ‘धाडस’ करू पाहतात.
काहीजण हे सहज करतात. काहींना मित्रमैत्रिणीच भरीस घालतात. अनेकदा कॉलेजात किंवा आता तर सोशल मीडियातही अशा जागी जाण्याविषयी पैज लावली जाते. आणि ती पैज जिंकायची, आपण धाडसीच आहोत हे इतरांना दाखवायचं या वेडगळ हट्टापायी अनेक तरुण अशा जागी जातात अशी माहिती पोलीस देतात.
हे प्रकार गंभीर आहेत. भुताखेतांच्या आचरट कल्पनांवर विश्वास ठेवताना रात्रीबेरात्री निर्जन जागी जाण्याचा धोका ही मुलं पत्करतात. आपण काहीतरी भन्नाट, शूरवीर करायला निघालो आहोत या खेळात त्यांना थ्रिल वाटत असलं तरी हे झपाटलेपण त्यांचं नॉर्मल आयुष्यच बिघडवून टाकतं हे त्यांच्या लक्षातही येत नाही.
धाडस करणं वाईट नाही; पण असं नको त्या गोष्टीत अडकून आपण केवळ लाइक्स मिळवणं आणि सोशल मीडियात शूरवीर ठरणं यासाठी वाट्टेल ते करणार असू तर जिवाला धोका होऊच शकतो, याचं मात्र भान अनेकांना उरत नाही.
(मनीषा लोकमतच्या मुंबई आवृत्तीत गुन्हे वार्ताहर आहे.)
लाइक्स महत्त्वाचे की जीव?
पडीक जागा, अर्धवट बांधकामं अशा निर्जनस्थळी रात्रीबेरात्री एकटं जाणं धोक्याचंच आहे. भुतापेक्षा त्या जागांत दबा धरून बसलेले गर्दुल्ले, चोरटे यांचाच धोका जास्त. असं साहस जिवावर बेतू शकतं. त्यामुळे कुणी कितीही आव्हान दिलं तरी असे प्रकार तरुणांनी करू नयेत. लाइक्स मिळवणं आणि थरार अनुभवणं यापेक्षा स्वत:चा जीव महत्त्वाचा आहे. भूत शोधमोहीम म्हणून आपण तयार केलेला व्हिडीओ अनेकांनी पहावा हा अट्टाहास करताना तो व्हिडीओ पहायला आपण असू का जिवंत याचाही विचार केलेला बरा!
मनोज कुमार शर्मा,
पोलीस उपायुक्त, मुंबई परिमंडळ-१
हॉण्टेड नाइट पार्टी
हे झपाटलेपण अनेकांना इतकं धरून ठेवतं. की आताश तरुण मुलांमध्ये हॉण्टेड नाइट पार्ट्या रंगतात. भुतांच्या चित्रांप्रमाणे मेकअप, नखं रंगवणं, टॅटू काढणं असे सारे उद्योग करत तसा माहौल तयार करून पार्ट्या केल्या जातात.
...मानसोपचार घ्या!
भुतांच्या गोष्टी, रहस्यमय कथा हे सारं सांगणं, ऐकणं टाळायला हवं. भुताच्या मालिका, चित्रपटांचाही प्रभाव पडतो. याच प्रभावातून कोणी तरी आसपास असल्याचा भास निर्माण होतो. फार पूर्वीपासून असे प्रकार सुरू आहेत. काही तरी वेगळं आणि थरारक अनुभवण्याची अनेकांची धडपड असते. भूत दिसलं किंवा बोलतं असं कुणी समजत असेल, तर हा मानसिक आजार आहे. यासाठी वेळीच मानसोपचार घेणं गरजेचं आहे.
- डॉ. हरिष शेट्टी,
मानसोपचार तज्ज्ञ
..ही अंधश्रद्धाच!
भूत आहे असा समज हीच एक अंधश्रद्धा आहे. उच्चशिक्षित तरुणही त्याचा शोध घेतात ही दुर्दैवी बाब आहे. मुळात तरुणांनी अशा ठिकाणांचा शोध घेण्यापेक्षा तेथील खरी परिस्थिती मांडण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे. धाडसच करायचं तर या अनिष्ट प्रथा, समज मोडून काढण्याचं धाडस करा. थ्रिल अनुभवण्याच्या नादात, लाइक्स मिळविण्यासाठी नको त्या गोष्टींचा प्रचार प्रसार करू नका.
- नंदकिशोर तळाशीलकर,
सरचिटणीस, अंधश्रद्धा निर्मूलन समिती,
महाराष्ट्र राज्य