अपिरो....फुग्यातून अवकाशात झेपावणारा गोव्याच्या बिट्स पिलानीच्या विद्यार्थ्यांचा एक मायक्रो उपग्रह

By meghana.dhoke | Published: November 30, 2017 05:00 AM2017-11-30T05:00:00+5:302017-11-30T05:00:00+5:30

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला पहिला मायक्रो सॅटेलाइट. जो रेडिएशनचा तर अभ्यास करेलच पण अवकाशात जाईल तोच एका मोठ्या फुग्याचा हात धरून..

Apuro .... A microwave satellite of Pilani students of Goa's bustling balloon | अपिरो....फुग्यातून अवकाशात झेपावणारा गोव्याच्या बिट्स पिलानीच्या विद्यार्थ्यांचा एक मायक्रो उपग्रह

अपिरो....फुग्यातून अवकाशात झेपावणारा गोव्याच्या बिट्स पिलानीच्या विद्यार्थ्यांचा एक मायक्रो उपग्रह

Next

इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असलेली ही मुलं. गोव्याच्या बिट्स पिलानी या संस्थेत शिकणारी. तसं त्यांचंही प्रोजेक्टबिजेक्टवालं इंजिनिअरिंग सुरूच होतं. पण त्यांच्या लक्षात आलं की आपल्या सिनिअर विद्यार्थ्यांनी वातावरणाचा काही अभ्यास केला आहे. आणि तो अभ्यास असं सांगतो की, रेडिएशन अर्थात अंतरिक्ष विकिरणांचा अभ्यास अधिक तपशिलात करणं गरजेचं आहे. सिनिअर्सनी केलेल्या अभ्यासाचं नीट अवलोकन केल्यावर या विद्यार्थ्यांनी ठरवलं की आपण या रेडिएशनच्या विषयात पुढे काम करायचं.
आणि काम सुरू झालं.
संकेत देशपांडे, लकी कपूर, शिवांगी कामत, पंकज टिपले, वैभव जोशी आणि ऐश्वर्या प्रवीण या गॅँगने ठरवलं की आपण वातावरण आणि रेडिएशन पॅटर्नचा अभ्यास करु. तो कसा करायचा याचा विचार करत असतानाच त्यांनी ठरवलं की आपण एक मायक्रो सॅटेलाइटच बनवला तर. काम सुरु झालं. गेली ४ वर्षे ही मुलं हे काम करत आहे. अभ्यासातून आपल्याला मिळणारा रिकामा वेळ, सुटी याचा सदुपयोग हा मायक्रो सॅटेलाइट बनविण्यासाठी ते करू लागले.
आणि आता येत्या डिसेंबरमध्ये हा सॅटेलाइट लॉँच करायच्या ते तयारीत आहेत.
संकेतशी या संदर्भात चर्चा झाली. तो मूळचा मराठवाड्यातला. औरंगाबादचा. त्याला विचारलं कशी सुचली ही आयडिया?
तो सांगतो, ‘इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला सोलर सिस्टीमचा अभ्यास करत होतो. माझ्या सिनिअर्सनी केलेलं काम पाहिलं. सोबत माझे दोस्तही होते. आम्ही हे काम पुढं नेताना टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फण्डामेण्टल रिसर्च आणि भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरच्या अनेक वरिष्ठ शास्त्रज्ञांशी बोललो. त्यांचं मार्गदर्शन घेतलं. आम्ही ठरवत असलेली उपग्रहाची कल्पना, त्याची साधारण रचना त्यांना सांगितली. आणि त्यांना ती आवडल्यानं टीआयएफआरनेच हा सॅटेलाइट लॉँच करायचं ठरवलं. त्यांच्या हैदराबाद येथील नॅशनल बलूनिंग फॅसिलिटीद्वारे लॉँच करायचं ठरवलं. तेही आमच्याकडून कुठलाही मोबदला न घेता. अजून काय हवं होतं, आम्ही कामाला लागलो.’
प्रोजेक्ट अपिरो असं या उपक्रमाचं नाव. अपिरो हेच नाव त्यांनी उपग्रहाला दिलं आहे. कॉस्मिक रेडिएशनचा अभ्यास हा उपग्रह करणार आहे. अशा पद्धतीनं काम करणारा आणि विद्यार्थ्यांनी बनवलेला हा देशातला पहिलाच उपक्रम आहे.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा उपग्रह लॉँच होईल. २२ किलोमीटर अल्टिट्यूड अर्थात समुद्रसपाटीपासूनच्या उंचीवर तो असेल. आणि त्याद्वारे रेडिएशनचा डेटा ट्रॅक केला जाऊ शकेल.
रेडिएशनचा अशाप्रकारे अभ्यास करण्याचा हा प्रयत्न ही या तरुण विद्यार्थ्यांची मोठी झेप मानायला हवी. या उपक्रमाचे यश अन्य विद्यार्थ्यांनाही पथदर्शी ठरेल अशी आशा आहे.

प्रोजेक्ट अपिरो काय आहे?
वातावरणात विकिरण किती होतं आहे याचा अभ्यास करणं अर्थात रेडिएशनचा अभ्यास करणं हे या उपग्रहाचं काम. अत्यंत कमी खर्चात या मुलांनी हा उपग्रह तयार केला आहे. आजच्या घडीला स्पेस रेडिएशनचा काही डेटा आपल्याकडे उपलब्ध नाही. मात्र ज्यांचा सतत या रेडिएशनशी संपर्क येतो, ज्यांच्या त्वचेवर, आरोग्यावर त्याचा परिणाम होतो त्यांच्यासाठी रेडिएशनची योग्य माहिती असणं, दिवसाच्या कोणत्या काळात ते जास्त असेल हे माहिती असणं जास्त उपयुक्त ठरू शकेल. विशेषत: हवाई दळणवळणाच्या संदर्भात. आपल्याकडे विमानउड्डाण उद्योग वाढतो आहे. फ्लाइट्सची संख्या मोठी. त्यांच्या पायलट्सना या माहितीचा फायदा होऊ शकेल.
रेडिएशनचा डेटा उपलब्ध झाला तर अंदाज वर्तवणारं एक मॉडेलही तयार करता येऊ शकेल. की अमुक शहरात रेडिएशनची लेव्हल दिवसा कुठल्या वेळेत कशी असेल. त्यादृष्टीनं या उपग्रहाची बांधणी आणि त्यातून मिळणारी माहिती महत्त्वाची आहे.
सध्य नासाही अशाच एका मॉडेलवर काम करत असून, ते ही त्यातून डेटा मिळवण्याचं काम करत आहे.
त्यादृष्टीनं विचार करता भारतातील विद्यार्थ्यांनी तयार केलेला हा स्पेस बलूनिंग प्रयोग अत्यंत महत्त्वाचा आहे.

बलूनिंग पद्धत म्हणजे काय?
आपल्याला उपग्रह, त्यांचं लॉँचिंग यासंदर्भात इस्रोनं अंतराळात पाठवलेले उपग्रहच माहिती असतात. पण हे स्पेस बलूनिंग ही तितकंच रंजक आणि अत्यंत उपयुक्त आहे. कमी खर्चिक आहे. त्याला म्हणतात हाय अल्टिट्यूड बलून्स. त्यात इंधन म्हणून हेलिअम, हायड्रोजन आणि क्वचित कधी मिथेनही भरलेलं असतं. व्हेदर बलून्सही त्याला म्हणतात. या मोठाल्या फुग्यांसोबत ट्रान्समीटर, कॅमेरा, छोटे सॅटेलाइट, जीपीएस रिसिव्हर पेलोड्सद्वारे अवकाशात पाठवले जातात. भारतात असाच उपक्रम हैदराबाद येथे टीआयएफआरद्वारे राबविला जातो.

(लेखिका लोकमत वृत्तसमूहात मुख्य उपसंपादक आहेत.)

Web Title: Apuro .... A microwave satellite of Pilani students of Goa's bustling balloon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.