इंजिनिअरिंग करताय?

By admin | Published: June 9, 2016 05:29 PM2016-06-09T17:29:11+5:302016-06-09T18:02:14+5:30

बारावीनंतर सगळ्यात मोठा प्रश्न ज्यांच्यासमोर उभा असतो, ते इंजिनिअरिंगला जाणारे विद्यार्थी. अनेकांना हेच कळत नाही की, कुठल्या साइडला जायचं?

Are you doing engineering? | इंजिनिअरिंग करताय?

इंजिनिअरिंग करताय?

Next

 -  प्रा. डॉ. संदीप पांडुरंग ताटेवार (अमरावती)

 
इंजिनिअरिंग तर करायचं,
पण साइड कुठली निवडायची?
कॉलेज कसं निवडायचं?
आपल्याला भविष्यात जे काम करायचं,
त्या कामासाठी ही शाखा योग्य असेल का?
या प्रश्नांची माहितीच हवीत
अशी काही उत्तरं..
 
इंजिनिअरिंग करताय?
निर्णय डोळे झाकून घेऊ नका, माहिती घ्या, प्रश्न विचारा!
 
बारावीनंतर सगळ्यात मोठा प्रश्न ज्यांच्यासमोर उभा असतो, ते इंजिनिअरिंगला जाणारे विद्यार्थी.
अनेकांना हेच कळत नाही की, कुठल्या साइडला जायचं?
नुस्तं इंजिनिअरिंग करायचं म्हणून कुठल्या तरी साइडला जाणं अनेकजण पत्करतात. मिळेल ते कॉलेज स्वीकारतात. मात्र पुढे इंजिनिअर झाल्यावर किंवा करतानाच लक्षात येतं की, आपण फसलो, ही आपली दिशा नाही. किंवा जे शिकतोय आणि जिथं शिकतोय त्या पदवीला पुढे फारशी किंमत नाही. बारावीचा निकाल लागल्यावर अनेकजण पालकांसह हमखास मार्गदर्शनासाठी येतात तेव्हा प्रश्न एकच असतो की, आम्ही कुठली साइड, कुठलं कॉलेज कसं निवडू?
त्यावर पहिलं उत्तर एकच की, आजही हुशार अभियांत्रिकी विद्याथ्र्याना अर्थात इंजिनिअर्सना देशात व परदेशात चांगल्या नोकरीची संधी व मागणी आहे. फक्त ही डिग्री मिळवण्यासाठी आपण कॉलेज कसे निवडतो हे महत्त्वाचं असतं. आणि मग पुढचा मुद्दा असतो तो कुठलं इंजिनिअरिंग करणार हे ठरवावं लागतं. मुख्यत: सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग यांसह अन्यही काही शाखा आहेत. 
मात्र ब:याचदा पालकांना संभम्र पडतो नेमकी कुठल्या अभियांत्रिकीची कोणती शाखा निवडायची?
शाखेला जास्त महत्त्व द्यावं की महाविद्यालयाला?
मुलाला आपल्याच गावच्या महाविद्यालयात शिकवावं की इतरत्र मोठय़ा शहरात किंवा पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवावा? 
त्यात होतं असं की, शाखा निवडताना विद्याथ्र्याची इच्छा आणि त्याचा कल कशात आहे हे पाहिलं जात नाही, जे सगळ्यात महत्त्वाचं असतं. ब:याचदा विद्याथ्र्याला माहीत नसतं की कोणत्या शाखेला पुढे जाऊन काय महत्त्व आहे, त्या क्षेत्रत कामाचं स्वरूप काय असतं, मित्रमंडळी ज्या शाखेत, ज्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यास उत्सुक असतात तिथं प्रवेश घेण्यासाठी मुलगा हटून बसतो. पालक म्हणतात आम्ही समजावयाचा खूप प्रयत्न केला हो, पण मुलगा काही ऐकायला तयारच नाही.
अशावेळी योग्य शाखा, योग्य महाविद्यालय हा तिढा कसा सोडवायचा?
तर त्यासाठी काही प्रश्न पालकांनी मुलाला आणि मुलानंही स्वत:ला विचारायला हवेत.
भविष्यात नोकरी करायची आहे की स्वत:चा व्यवसाय? नोकरी शासकीय करायची की खासगी? आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की, शासकीय नोकरीमध्ये सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे नोकरीची सुरक्षितता. दुसरीकडे खासगी नोकरीमध्ये विशषेत: सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सुरुवातीला पगार कमी असला तरी कालांतराने पगारवाढ मोठय़ा प्रमाणात मिळते. परदेशी जाण्याची व त्यानिमित्तानं पैसे कमवण्याची संधी मिळते. शासकीय नोकरीमध्ये बहुधा कार्यालयीन कामकाजाची वेळ ठरावीक असते,  तर खासगी नोकरीमध्ये कामाप्रमाणो कामकाजाची वेळ वाढत जाते. उद्योगधंद्यामध्ये सुरुवातीला जरी संघर्ष असला, तरी एकदा धंद्यात जम बसला की मोठय़ा प्रमाणात विस्तार करता येतो. पैसे भरपूर कमवता येतात. पण धंद्यात चढउतार तर असतातच व ते गृहीत धरावेच लागतात.
या सा:या प्रश्नांची उत्तरं स्वत:पुरती खरीखुरी शोधत अजून एक गोष्ट लक्षात ठेवावी.
शाखा निवडीला प्रथम महत्त्व द्यावं पण त्याचबरोबर महाविद्यालयाबाबत खूप तडजोड करू नये. जसे की, खूप आवडीची शाखा व साधारण महाविद्यालय किंवा न आवडलेली शाखा व एकदम चांगले महाविद्यालय असे टोक गाठू नये. आवडती शाखा, उत्तम महाविद्यालय ही आदर्श अवस्था. मात्र म्हणून कुठल्याही थातुरमातुर महाविद्यालयात केवळ इंजिनिअर व्हायचं म्हणून प्रवेश घेऊ नये.
पण आपल्यासाठी योग्य शाखा कोणती, हे ठरवताना त्या शाखेत नेमक्या काय काय संधी आहेत हे आपल्याला माहिती हवं. म्हणून शाखानिहाय आपण संधी आणि रोजगाराची माहिती पाहू..
 
 
1) सिव्हिल इंजिनिअरिंग
सिव्हिल इंजिनिअरिंग करणा:यांना शासकीय आणि खासगी दोन्ही क्षेत्रत वाव आहे. स्वत:चा व्यवसायही करायची संधी आहे. इमारती, रस्ते, धरणो, कालवे, पाणी व सांडपाणी व्यवस्था यांसह बांधकाम क्षेत्रत सिव्हिल इंजिनिअरिंगला मोठय़ा प्रमाणात रोजगाराच्या, व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. एमपीएससी व यूपीएससी परीक्षा देऊन वरच्या पदावर जाण्यासाठी सिव्हिल इंजिनिअर्सना उत्तम वाव आहे. 
नोकरीच्या शक्यता
राज्य सरकार- पीडब्ल्यूडी. एमजेपी, इरिगेशन, जिल्हा परिषद, महानगरपालिका, एमआयडीसी, टाऊन प्लॅनिंग, सिडको इत्यादि विभाग.
केंद्र सरकार- पोस्ट, रेल्वे, सीडब्ल्यूसी, निरी, डीआरओ, सीपीडब्ल्यू, डिफेन्स, सिव्हिल सव्र्हिसेस व अन्य विभाग.
निमशासकीय- एनटीपीसी, भेल, ओएनजीसी, इस्त्रो, एचपीसीएल, सेल, भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर, महाजनको, ऑर्डिनन्स फॅक्टरी व अन्य.
खासगी- पायाभूत सुविधा क्षेत्र जसे की रेल्वे, एव्हिगेशन, धरणं, ऊर्जा, मार्केटिंग, सीमेंट कॉँक्रीट, टॉवर कन्स्ट्रक्शन, स्ट्ररल डिझाइन इत्यादि.
व्यवसायाच्या शक्यता
शासकीय व खासगी कॉण्ट्रॅक्टर, कन्सल्टन्सी जसे की स्ट्ररल डिझाइन, जीओ टेक्निकल, पर्यावरणपूरक बांधकाम, प्रोजेक्ट प्लॅनिंग इत्यादि.
 
 
2) मेकॅनिकल इंजिनिअरिंग
मेकॅनिकल इंजिनिअर्सना औद्योगिक क्षेत्रत मोठय़ा प्रमाणात वाव असतो. स्वत:चा व्यवसाय,  शासकीय व खासगी नोक:यांतही ब:याच संधी उपलब्ध आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगला छोटय़ा वर्कशॉपपासून ते मोठय़ा कारखान्यार्पयत मजल मारता येते.
नोकरीच्या शक्यता
राज्य सरकार- पीडब्ल्यूडी, एमजेपी, इरिगेशन, जिल्हा परिषद, महानगरपालिका, एमआयडीसी.
केंद्र सरकार- रेल्वे, डीआरओ, सीपीडब्ल्यू, डिफेन्स सेक्टर, सिव्हिल सव्र्हिसेस.
निमशासकीय- एनटीपीसी, भेल, इस्त्रो, एचपीसीएल, सेल, कोल इंडिया.
खासगी- पॉवर सेक्टर, एव्हिगेशन, पोर्ट्स हार्बर.
 
व्यवसायाची शक्यता...
वर्कशॉप, गॅरेज, ऑटोमोबाइल, प्रॉडक्शन मेंटेनन्स,
कॉण्ट्रॅक्टर, कन्सल्टंट इत्यादि.
 
 
3) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
 जिथे जिथे विजेचा संबंध येतो त्या त्या क्षेत्रत इलेक्ट्रिकल इंजिनिअरला मागणी असते. आजकाल सॉफ्टवेअर कंपनीमध्येसुद्धा सिव्हिल, मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल इंजिनिअर्सची निवड होते. इलेक्ट्रिकल कॉण्ट्रॅक्टर म्हणूनसुद्धा व्यवसायामध्ये बराच वाव आहे.
 
नोकरीच्या शक्यता
राज्य सरकार- पीडब्ल्यूडी, जिल्हा परिषद, महानगरपालिका, इरिगेशन, वॉटर सप्लाय.
केंद्र सरकार- रेल्वे, डीआरओ, सीपीडब्ल्यू, डिफेन्स सेक्टर, सिव्हिल सव्र्हिसेस.
निमशासकीय- एनटीपीसी, भेल, इस्त्रो, महाजनको, एचपीसीएल, सेल, कोल इंडिया. 
खासगी- बिल्डिंग इलेक्ट्रिफिकेशन, डिझाइन सेक्शन, पॉवर सेक्टर, क्वॉलिटी सेक्टर, औद्योगिक क्षेत्र इ. विभाग.
व्यवसायाच्या शक्यता
कॉण्ट्रॅक्टर, प्रोजेक्टर प्लॅनिंग, खासगी कामं.
 
 
 
4) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग 
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्सना सॉफ्टवेअर कंपनी, इलेक्ट्रॉनिक्स कोअर कंपनी, निमशासकीय नोकरीमध्ये चांगला वाव आहे. मोठय़ा शहरात, मोठय़ा कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी असते.  परदेशात चांगल्या नोक:या मिळू शकतात. या तुलनेत स्वत:चा व्यवसाय छोटय़ा गावात सुरू करण्याची संधी कमी असते.
नोकरीच्या शक्यता
सर्व बडय़ा सॉफ्टवेअर कंपन्या, बडय़ा कम्युनिकेशन, कोअर कंपन्यांमध्ये उत्तम नोकरी मिळू शकते.  यासह निमशासकीय क्षेत्रत, संरक्षण क्षेत्रत आणि सिव्हिल सव्र्हिसेस यातही उत्तम नोकरी मिळते.
व्यवसायाची शक्यता
औद्योगिक क्षेत्रशी संलग्न व्यवसाय करता येऊ शकतो.
 
 
5) कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 
कॉम्प्युटर इंजिनिअर्सना सॉफ्टवेअरसह निमशासकीय नोक:यांमध्ये चांगला वाव आहेच, तसेच मोठय़ा शहरात व्यवसाय करण्यासाठी बरेच क्षेत्र उपलब्ध आहे. परदेशात चांगली मागणी, उज्‍जवल करिअरच्या ब:याच संधी आहेत.
नोकरीच्या शक्यता.
सर्व सॉफ्टवेअर कंपन्या, बँक, रेल्वे, बीएसएनएल, इस्त्रो, सेल आणि अन्य.
व्यवसायाच्या शक्यता
बेवसाइट, डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, नेटवर्क, मिनिस्ट्रेटर हार्डवेअर इत्यादि.
 
 
6) इन्स्ट्रमेण्टेशन इंजिनिअरिंग
औद्योगिक क्षेत्रत या इंजिनिअर्सना नव्यानं वाव आहे. औद्योगिक क्षेत्र व निमशासकीय कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेतच, मात्र व्यवसायाच्याही अनेक संधी आहेत. 
नोकरीच्या शक्यता
निमशासकीय- आरसीएफ, ओएनजीसी, आयसीएल, हेल, भेल, एनजीपीसी, एचपी इत्यादि.
पेट्रोकेमिकल इंडस्ट्रिज, फर्टिलायझर प्लेण्ट्स, फॉर्मासिटिकल इंडस्ट्रिज यांसह खासगी क्षेत्रतही वाव आहे.
व्यवसायाच्या शक्यता
 ऑटोमेशन इंडस्ट्रिज, कॅलिब्रेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रमेंट्स इत्यादि.
 
7) इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
 कॉम्प्युटर इंजिनिअरिंग प्रमाणाचे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या विद्याथ्र्याना सॉफ्टवेअर कंपन्या,  निमशासकीय व शासकीय नोकरीमध्ये डाटाबेस मॅनेजमेंटसाठी आयटी अधिकारी म्हणून ब:याच संधी आहेत.
 
इंजिनिअरिंगसाठी महाविद्यालय कोणतं
आणि कसं निवडायचं?
महाविद्यालयाचं नाव मोठं असतं किंवा चांगलं आहे अशी माहिती मिळते, मात्र त्यानुसार न ठरवता आपण काही गोष्टी पडताळून मग महाविद्यालय निवडावं. ब:याच खासगी महाविद्यालयाच्या टोलेजंग इमारती, भव्य परिसर, बगीचे, कोट-टाय घातलेला स्टाफ, भव्य दालनं इत्यादि गोष्टी दिसतात. त्यामुळे पालक भारावून जातात.  माङया एका मित्रनं सांगितलं की, ज्या खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांच्या मुलानं प्रवेश घेतला तिथे पिक्चर व सिरीयलचं शूटिंग होतं. त्याचंच त्यांना कौतुक. पण त्याचा मुलाच्या शिक्षणाला काय फायदा, असा प्रश्न मात्र त्यांना पडत नाही.
 
1) प्राध्यापक- महाविद्यालयात उच्चशिक्षित, अनुभवी आणि आवश्यक तेवढा प्राध्यापक वर्ग उपलब्ध आहे की नाही हे तपासा. जर चांगले प्राध्यापक नसतील तर विद्याथ्र्याना शिकविलेले समजत नाही. आणि विषय समजत नसल्यामुळे खूप कठीण वाटायला लागतो व त्यांचा अभ्यासात रस कमी होतो.
 
2) विद्यार्थी कसेत?- महाविद्यालयात प्रवेश घेणा:या विद्याथ्र्याचे सरासरी मार्क कसे आहेत? विद्यार्थी चांगल्या मार्काचे असल्यास विद्याथ्र्याना अभ्यासाला पोषक वातावरण मिळते. निकोप स्पर्धा निर्माण होते.
 
3) कॅम्पस सिलेक्शन- महाविद्यालयात कॅम्पस सिलेक्शनद्वारे चांगल्या पगाराच्या व नामांकित कंपनीमध्ये नोक:या मिळू शकतात का? संबंधित महाविद्यालयाला किती मिळाल्या? आजकाल काही खासगी महाविद्यालये विद्याथ्र्याना अत्यंत कमी पगाराच्या नोक:या महाविद्यालयामार्फत मिळवून देतात व शंभर टक्के प्लेसमेंट झाल्याचा दावा करतात. त्यामुळे कोणकोणत्या कंपन्या या महाविद्यालयात येतात, त्यांचा सरासरी पगार काय असतो याची माहिती व खात्री करून घ्या.
4) उपलब्ध सोयी- ज्या महाविद्यालयात अद्ययावत प्रयोगशाळा, यंत्रसामग्री, ग्रंथालय, इंटरनेट, संगणक प्रयोगशाळा, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सोयी, नामांकित कंपन्यांसमवेत झालेले सामंजस्य करार, विद्याथ्र्यासाठी नियमित फिल्ड व्हिजिट्स, ट्रेनिंग, तज्ज्ञ लोकांची आमंत्रित व्याख्यानं इत्यादि सोयी उपलब्ध आहेत का?
5) एनबीए मूल्यांकन- महाविद्यालयाचं मूल्यांकन हे नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडेशन यांच्या मार्फत झालेले पाहिजे.  महाविद्यालयाच्या  ज्या शाखेला आपण प्रवेश घेतो त्या शाखेला एनबीएची मान्यता आहे का, हे तपासा.
 
कराल ते उत्तमच!
आपल्याला भविष्यात शासकीय नोकरी करायची की खासगी?
देशात करायची की परदेशात? स्वत:चा व्यवसाय करायचा, आपल्या गावाकडं स्थायिक व्हायचं?  पुढे उच्च शिक्षण घेऊन शिक्षण व संशोधन क्षेत्रत पुढे काम करायचं का? - या प्रश्नांची उत्तरं जितकी महत्त्वाची तितकीच अभ्यासाची जिद्द, मेहनत, पुढे जाण्याची प्रबळ इच्छाशक्ती, चिकाटी, धैर्य, सहनशक्ती हे सारं हवंच, तरच उत्तम इंजिनिअर होता येऊ शकेल!
 
(लेखक तीस वर्षापासून प्राध्यापक आणि सध्या अमरावतीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख आहेत.)
sandiptatewar@yahoo.co.in
 
 

Web Title: Are you doing engineering?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.