तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीतले तज्ज्ञ आहात का?- तपासा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 07:15 AM2019-04-25T07:15:00+5:302019-04-25T07:15:04+5:30

या युनिव्हर्सिटीचं वैशिष्टय़च हे की, इथं कोणालाही सहज प्रवेश मिळतो़ अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल आणि इंटरनेट डाटा एवढंच भांडवल. त्या भांडवलावर कुणीही तज्ज्ञ होतो, मतं मांडतो, भांडतो, चर्चा करतो. आणि बडबडत राहातो.

Are you an expert at What's app University? | तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीतले तज्ज्ञ आहात का?- तपासा.

तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीतले तज्ज्ञ आहात का?- तपासा.

Next
ठळक मुद्देव्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीवर नियंत्रण आणणं पोलिसांपुढेही आव्हान निर्माण झालं आह़े.

- साहेबराव नरसाळे

एका नामांकित हॉस्पिटलमध्ये एक रुग्ण तपासणीसाठी आला़ डॉक्टरांनी त्याची तपासणी केली़ औषधे लिहून दिली आणि काही तपासण्या करण्याचा सल्ला दिला़ त्यावर तो रुग्ण एकदम भडकलाच़ ‘काहीच गरज नाही या औषधांची आणि तपासण्यांची़ मी वाचलं आह़े तुम्ही लोकं रुग्णांना असेच लुटता’, तो डॉक्टरांना एकदम टाकाऊ शब्दांमध्ये झापायला लागला़ तेव्हा डॉक्टरांनी विचारले की, ‘तू हे सर्व कुठे वाचले?’ तर म्हणाला, ‘व्हॉट्सअ‍ॅपवर!’ 
डॉक्टरांनी कपाळावर हात मारून घेतला आणि म्हणाले, ‘जा बाबा तुला काहीच झालेले नाहीये’.
बाकी इतिहासापासून खाण्यापिण्याच्या, नेत्यांच्या, आरत्यांच्या आणि विरोधांच्या अनेक कहाण्याही अशाच आपल्यार्पयत येतात आणि जे व्हॉट्सअ‍ॅपवर वाचलं तेच खरं असं मानणारे अनेकजण. काहीजण तर हरवला आहेच्या त्याच त्या घटना वर्षानुवर्षे फिरवतात. व्हॉट्सअ‍ॅप ढकलगाडीत फिरवत राहातात. 
हे सारं काय सांगतं?
हेच की व्हॉट्सअ‍ॅपवर माहिती वाचून अनेक तज्ज्ञ आपल्या अवतीभोवती तयार झाले आहेत़ या तज्ज्ञांचं एक विद्यापीठ आहे, त्याचं नाव ‘व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटी़’ अनेकांच्या तोंडी रुळलेलं हे नाव़ रोजचा दिवस उगवतो व्हॉट्सअ‍ॅप मेसेजने आणि दिवस ढळला तरी नजर तेथून ढळलेली नसत़े एवढा अभ्यास केल्यानंतर कोण नाही डॉक्टरेट मिळविणार? या युनिव्हर्सिटीचं वैशिष्टय़च हे की, इथे कोणालाही सहज प्रवेश मिळतो़ अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल आणि इंटरनेट डाटा एवढंच भांडवल त्यासाठी आवश्यक़ संदर्भहीन माहितीचा मोठा खजिना येथे उपलब्ध होतो़ या युनिव्हर्सिटीतले तज्ज्ञ पावलापावलावर भेटतात़ इथे डॉक्टरेट मिळविण्यासाठी कोणालाही पाच-पाच र्वष अभ्यास करून प्रबंध वैगेरे सादर करण्याची अट नाही़ माहिती खरी किंवा खोटी हे पडताळून न पाहताही बिनदिक्कत तुम्ही समोरच्यावर लादू शकता़ एखाद्याची वैयक्तिक माहिती मोडतोड करून अधिक भडक स्वरूपात रंगविण्याचं पेटंटही तुम्हाला येथून सहज मिळवता येतं़ वाट्टेल त्या विषयावर मतही ठोकून देता येतं.
यातून डॉक्टरेट मिळविलेल्या तज्ज्ञांचं विशेष हेच की ते कधीही दुसर्‍याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत़ त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर जे वाचलं आहे, त्याच्यावरच त्यांचा गाढा विश्वास असतो़ फेक न्यूज, फेक माहिती व्हॉट्सअ‍ॅपवरून प्रसारित करणारी एक खूप मोठी इंडस्ट्री आपल्याकडे कार्यरत आह़े  फेक माहिती, मिम्स तयार करून सोशल मीडियावर पसरविण्याचं जाळं आता थेट छोटय़ा गावांत पोहोचलंय़ यात तरुणांचा भरणा 80 टक्क्यांर्पयत आह़े उरलेले 20 टक्के मार्गदर्शक मंडळात असतात़ आपला अजेंडा लोकांवर थोपविण्यासाठी विशिष्ट मेसेज तयार करून देणारी वेगळी टीम, हा मेसेज वेगवेगळ्या ग्रुपमध्ये पोहोचवणारी दुसरी टीम असत़े आणि उरलेले भाबडे पाठवत राहातात जे आपल्याकडे येईल ते सर्रास पुढे!
त्यात राजकीय पक्षांच्या दावणीला बांधलेल्या हंगामी वेठबिगारांना आपण चुकीची, दिशाभूल माहिती फॉरवर्ड करतोय याचा यत्किंचितही संकोच वाटत नाही़  ‘आला मेसेज की ढकल पुढे’ एवढेच काम बोटांना ठेवलं आह़े त्यामुळे फेक माहितीचे प्रमाण प्रचंड वाढलं आहे आणि त्यावर विश्वास ठेवणारेही तितकेच वाढत आहेत़ 
व्हॉट्सअ‍ॅपनेच फेक माहितीवर नियंत्रण आणण्यासाठी एक मेसेज एकावेळेस फक्त पाच लोकांना पाठवता येईल, अशी सुधारणा केली़ मात्र तरीही फेक माहितीला प्रतिबंध बसू शकला नाही़ त्यामुळे पुन्हा व्हॉट्सअ‍ॅपने  विश्वसनियता जपण्याचं आणि माहितीचा स्रोत तपासण्याचं आवाहन केलं आहे.
मात्र आपण व्हॉट्सअ‍ॅपवरचे तज्ज्ञ आहोत असं वाटणार्‍या आजारावर तूर्तास तरी उत्तर दिसत नाही. 


(साहेबराव लोकमतच्या अहमदनगर आवृत्तीत उपसंपादक आह़े)
 

Web Title: Are you an expert at What's app University?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.