की-बोर्ड वारीअर्स प्रत्यक्षात डरपोक असतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 06:23 PM2019-03-07T18:23:14+5:302019-03-07T18:25:30+5:30

कळ लावून देणारे योद्धे. जे करत काहीच नाहीत, पण बसल्याजागी प्रचंड उपद्रव निर्माण करतात.

are you a Key board warrior? | की-बोर्ड वारीअर्स प्रत्यक्षात डरपोक असतात?

की-बोर्ड वारीअर्स प्रत्यक्षात डरपोक असतात?

ठळक मुद्देआपण "तसे" नाही ना, हे ज्यानं त्यानं ठरवायचं.

- निशांत महाजन

की-बोर्ड वारीअर्स म्हणतात त्यांना.
ते म्हणजे कोण?
ते म्हणजे आपणच.
आपणच मोबाइलवर किंवा कॉम्प्युटरवरच्या की बदडत दणादण काहीबाही लिहितो, अंगठे दाखवतो. फॉरवर्डच्या ढकलगाडीत ढकलून देतो. जे जगभर फिरतं, ते आपणही आपल्याचकडे पहिल्यांदा आलं असं म्हणत पुढं पाठवतो. ते खरं आहे का? त्यानं समाजाचा तोटा होईल का? त्यातली माहिती चुकीच्या गोष्टी, समाजात विखार तर पसरवत नाही ना, हे आपण तपासूनही पाहात नाही.
तसे प्रश्नच पडत नाही. आपण जे दुसर्‍याला सांगतो त्याची आपण खातरजमा केली आहे का, ते खरंच आहे का, हे तपासून पाहण्याचीही काळजी घेत नाही. आपण फक्त ढकलमपंची करतो.
आणि बनतो की-बोर्ड वारीअर्स.
कळ लावून देणारे योद्धे.
जे करत काहीच नाहीत, पण बसल्याजागी प्रचंड उपद्रव निर्माण करतात. सोशल मीडियात अशा कळलाव्यांमुळे सध्या भयंकर वातावरण तयार झालं आहे.
की-बोर्ड वारीअर्स ही नवीनच संकल्पना आता तयार झाली आहे. असे लोक जे सोशल मीडियात तावातावानं भांडतात, भडक बोलतात. चिडतात. चिडवतात. भयंकर उन्मादी पोस्ट लिहितात. विखार पसरवतात. 
प्रत्यक्षात मात्र ते अत्यंत डरपोक, नेभळट असतात. आणि स्वतर्‍ काहीही न करता केवळ बाष्कळ बडबड करून स्वतर्‍ला श्रेष्ठ सिद्ध करत राहातात. त्यांना वेसण कशी घालायची ही समस्या आता जगभर आहे.
नाशिकचा हवाई दलातला कॅप्टन निनाद मांडवगणे शहीद झाला तेव्हा त्याच्या पत्नीनं सर्व माध्यमांत सांगितलं की, सोशल मीडियात जोश दाखवू नका, त्यापेक्षा सैन्यात जा, बोलण्यापेक्षा करून दाखवा, कडवट विखार पसरवू नका.
दोन वर्षाची लेक हातात घेऊन ती तरुण वीरपत्नी जे सांगत होती, ते आपल्याकडच्या तरुण मुला-मुलींना कधी कळेल? कधी समजतील त्यातील धोके.
ते समजून घेतले तर आपण समाज म्हणून सुखनैव राहू नाही तर जे आपण पेरतो तेच विष आपल्या वाटय़ाला आल्याशिवाय राहणार नाही.

सायबर पोलिसांचं 
आवाहन - खोटं पसरवू नका


सोशल मीडिया युद्धाचा धोका वाढतच चालला आहे. तिथल्या उपद्रवखोरांना आवर घालण्याचं आव्हान आता आहे. चुकीचे संदेश, व्हिडीओ पसरवणं चूक आहे. कुठलीही माहिती अथवा व्हिडीओ शेअर करण्यापूर्वी त्याची खातरजमा तरी करायला हवी. कारण या व्हायरल गोष्टींचे समाजावर विघातक परिणाम होऊ शकतात.
आपल्या सीमेवर सध्या तणाव आहे. युद्धाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यात सायबर युद्ध आता तितकंच घातक ठरत आहे. त्यामुळे फेक न्यूज, अफवा आपण पसरवणार नाही असं स्वतर्‍ला बजावलं पाहिजे. अधिकृत संकेतस्थळ, अधिकृत यंत्रणा, यासह अधिकृत सोर्स असलेल्या माहितीवरच विश्वास ठेवायला हवा. तुमच्यार्पयत आलेल्या  व्हिडीओची अधिकृतता पडताळून पाहा. कोणी चुकीची माहिती पसरवत असेन तर त्याबाबत पोलिसांशी संपर्क करा. आणि चुकीच्या फॉरवर्ड साखळीत सहभागी होऊ नका.

बलसिंग राजपूत, 
महाराष्ट्र राज्य सायबर अधीक्षक 

Web Title: are you a Key board warrior?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.