एरिअल सिल्क

By admin | Published: April 26, 2017 01:49 PM2017-04-26T13:49:12+5:302017-04-26T13:49:12+5:30

येत्या शनिवारी. २९ एप्रिल. जगभर हा दिवस आंतरराष्ट्रीय नृत्य दिन म्हणून साजरा होतो..जगभरातल्या बहुविध नृत्यांचा, नृत्यसंस्कृतीचा प्रसार व्हावा म्हणून हा दिवस साजरा होतो. भारतीय अभिजात नृत्यासह विविध पाश्चिमात्य आधुनिक नृत्यही आता तरुण मुलंमुली शिकतात. त्या जगातली ही एक नवीन आणि तितकीच थरारक आणि आनंददायी एण्ट्री. एरिअल सिल्क. आणि त्याचीच ही एक विशेष चर्चाही..

Ariel Silk | एरिअल सिल्क

एरिअल सिल्क

Next
>- भक्ती सोमण
 
छताला बांधलेले सिल्कचे कापड. त्या कापडी पट्ट्यांवर स्वार होत, हवेत तरंगत, स्वत:चं शरीर लिलया सांभाळत मस्त हवेत झुलायचं असा एक अनोखा नृत्यप्रकार. आणि तो इतरांना शिकवणारी अदिती यांच्या हवाई जगातली एक सफर.. 
 
मुंबईत लोअर परेल भागातला एक स्टुडिओ. 
त्या स्टुडिओत एरिअल सिल्क नावाचा डान्स प्रकार करणाऱ्या अदिती देशपांडेला भेटायचं ठरलं. 
स्टुडिओत प्रवेश केला पण स्टुडिओत आत नेमकं काय सुरू असेल याचा काही अंदाजच येत नव्हता. 
अदितीचा क्लास सुरू होता, त्या रूमचा दरवाजा ढकलून आत गेलो. समोरचं दृश्य पाहून कळेना की आपण नक्की काय पाहतोय?
एक मोठ्ठा आश्चर्याचा आ फक्त आपोआप झाला आणि डोळे विस्तारले ते विस्तारलेच..
त्या खोलीत छताला लावलेल्या बारवर थोड्या थोड्या अंतरानं रंगीत सिल्कचं कापड घट्ट बांधून खाली सोडलं होतं. एक गोल स्टिलची रिंगही होती. सिल्कच्या कापडावर लटकलेली एक मुलगी एका पायाचा आधार घेत दुसरा पाय त्या कापडात घालून दुसऱ्या दिशेनं बाहेर काढत होती. एक लहान चणीची मुलगी तिला पाय कोणत्या दिशेने टाक म्हणजे जमेल याची सूचना देत होती. तेवढ्यात दुसरी एक मुलगी सिल्क कापड हातात घेत त्यावर पटकन चढली, पायाला कापड गुंडाळून खाली-वर गेली. हात मोकळेच होते तिचे..
असे एकेक प्रकार सुरू होतेच. तेवढ्यात एका रिंगवर एक मुलगी गेली आणि त्या रिंगवर हात पाय ठेवून खाली वाकली. मग पुन्हा वर येत पाय फाकवले आणि वळली.
या कसरती म्हणाव्यात की कौशल्य काही कळेना. कारण त्या मुली त्या एका सिल्कच्या कापडावर संगीताच्या तालावर भराभर काय काय लिलया करत होत्या.. 
कान संगीताकडे आणि नजर त्या कापडावर झुलणाऱ्या मुलींकडे अशी आपली पळापळ होतेच. 
त्या नृत्यानंतर नीट पाहिलं तर लक्षात आलं की या मुली फार तरुण नव्हत्या. काहींनी तर पस्तिशी ओलांडली होती..
आणि त्या साऱ्यांना आत्मविश्वास देत, हवेवर स्वार होत सिल्कवर उडण्याचं कौशल्य शिकवत होती त्यांची गुरू म्हणजे अदिती देशपांडे. 
क्लास संपला तशा अदितीशी गप्पा रंगल्या.
आपल्याकडे नृत्यकला ही एक तपस्या, आराधना मानली जाते. अभिजात नृत्याला तर केवढी तरी महान परंपरा आहेच. 
आणि आता आधुनिक काळात तरुण जगण्यात अनेक नवीन पाश्चात्त्य नृत्यप्रकारही आले. मग या साऱ्यात या एरिअल नृत्याचं वैशिष्ट्य ते काय?
अदितीला हे सारं विचारायचं होतं. गप्पांत कळलं की, अदितीचे वडील म्हणजे उदय देशपांडे. मुंबईच्या शिवाजी पार्क येथील श्री समर्थ व्यायाम मंदिरातील मल्लखांब प्रशिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. तिकडेच अदितीने मल्लखांबात प्रावीण्य मिळवले. मल्लखांबाचं प्रशिक्षणही तिनं दिलं. मात्र या मल्लखांब प्रशिक्षणाचा फायदा वेगळ्या पद्धतीने करण्याची संधी तिला पाच वर्षांपूर्वी अचानकच मिळाली. तिचा भाऊ ओंकार अमेरिकेत असतो. आईसोबत अदिती भावाकडे अमेरिकेत गेली आणि तिथं तिची या नव्या जगाशी ओळख झाली. 
एरिअल सिल्क असं या पूर्ण नव्या जगाचं नाव होतं.
अमेरिकेत सेण्ट फ्रान्सिस्को या शहरात मग अदितीनं एरिअल सिल्कचं परिपूर्ण प्रशिक्षण घेतलं. मल्लखांब, रोप मल्लखांब येत असल्यानं तिला एरिअल सिल्क शिकणं तुलनेनं सोपं गेलं. पण नुस्तं ते शिकून अदिती थांबली नाही, तर हे तंत्र इतरांना शिकवण्याचं पहिलं इंटरनॅशनल सर्टिफिकेट मिळवणारी पहिली भारतीय ठरण्याचा मानही अदितीकडे आला. 
आता गेल्या पाच वर्षांपासून ‘फ्लाय हाय एरिअल आर्ट’ या तिच्या संस्थेद्वारे मुंबईतल्या १० स्टुडिओत ती एरिअल सिल्कचे क्लासेस घेतेय. हा एक वेगळ्याच प्रकारचा नृत्याविष्कार आहे. कुणालाही कसा जमावा असा प्रश्न ते कापड, त्यावर नृत्य पाहून पडतोच.
मात्र अदिती सांगते, ‘पहिल्यांदा प्रत्येकालाच असं वाटतं की हे आपल्याला जमणार नाही. पण चार वर्षे वयाच्या मुलांपासून ते ८५ वर्षांच्या व्यक्तीपर्यंत कोणत्याही वयोगटातली व्यक्ती अगदी कधीही हा नृत्यप्रकार शिकू शकेल. हे नवं तंत्र शिकताना सिल्क कापडाचं तंत्र मात्र समजून घ्यावं लागतं. त्यावर कसं चढायचं यासारख्या बेसिक गोष्टी कळायला लागल्या की मग आपल्याला वाटतं तितकं हे अवघड नसतं. उलट मग अजून नव्या पोझिशन शिकण्याची इच्छा व्हायला लागते. सुरुवातीला वाटणारी भीती मग आनंदात बदलते. ते चॅलेंज आपलंसं वाटू लागतं. मन आणि शरीराचा समन्वय साधता येऊ लागतो. एखादा प्रकार करताना चेहऱ्यावर दिसणारी अनामिक भीती लुप्त होऊन त्याजागी आनंद दिसायला लागतो. हे सारं अनुभवणं हा एक वेगळा आनंदाचा झुलाच आहे.
पण नुस्तं डान्स शिकायचा म्हणून कुणी हे शिकत नाही. काहींना फिटनेससाठीही शिकायचं असतं. त्याबद्दल विचारलं तर अदिती सांगते, 
‘एरिअल सिल्क शिकल्यानंतर तीन महिन्यात तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम दिसायला सुरुवात होते. वजन तर कमी होतंच पण पोटांच्या स्नायूची ताकद वाढते. तुमचं संपूर्ण शरीर तुम्ही हाताच्या साहाय्याने हवेत वळवता. त्यामुळे शरीराची लवचिकता वाढते. अपर बॉडीची स्ट्रेन्थ वाढायलाही मदत होते. उत्साह आणि आत्मविश्वास वाढीस लावण्यासही एरिअल सिल्क मदत करते.’
त्या उत्साहाची आणि एनर्जीची कल्पनाच केलेली बरी. कारण अदितीकडे एरिअल सिल्कचं तंत्र शिकायला कोण कोण येतं याची एक झलक यादीच पुरेशी आहे. सुश्मिता सेन, पूजा हेगडे, ऊर्मिला कानिटकर, सोनाली कुलकर्णी, फुलवा खामकर, अमृता खानविलकर या साऱ्याजणी अदितीच्या स्टुडिओतल्या सिल्कवर झुललेल्या आहेत.
मात्र त्या अभिनेत्री बाकीच्यांनी हा नृत्यप्रकार घरी कसा करावा असं अदितीला विचारलं तर ती म्हणते, ‘एकदा का ही अदाकारी जमली की तुम्ही गॅदरिंगमध्ये, लग्नापासून कुठल्याही समारंभात एरिअल सिल्क करू शकता. अगदी कुठल्याही कार्यक्रमात हे करता येऊ शकतं. मात्र हे सारं करताना एक लक्षात ठेवायला हवं की आपल्या शरीराविषयी आपण जागरूक राहायलं हवं. ते जमलं तर हा नृत्यप्रकार शिकणं सोपं होतं.’
अदिती सांगते तेव्हा ते सोपंच वाटतं; पण आकाशात झुले बांधावेत तसं उंच बांधलेलं सिल्क आणि त्यावर नृत्य सोपं कसं असेल? पण ते सोपं व्हावं इतरांसाठी म्हणून अदिती उत्साहानं तो नृत्यप्रकार अनेकांना शिकवते. तिचा नवरा प्रकाश गिलाटर याकामी तिला पूर्ण सहकार्य करतो. आणि मग तिच्या स्टुडिओत त्या सिल्कवर डोळ्याचं पारणं फेडणारं पदलालित्य दिसू लागतं..
ते पाहताना नजरेला सुख वाटतं आणि अपार आश्चर्यही, की कसं जमतं हे हवेवर स्वार होणं..
जमिनीवरून एक पाऊल पुढं टाकत हवेत नृत्य करण्याचं हे एरिअल जग म्हणूनच अनेकांना पुन्हा पुन्हा हाक मारत असावं..
 
सिल्कवरची अदा
एरिअल सिल्क करताना विशिष्ट प्रकारची धार असलेलं सिल्कचं कापड वापरतात. त्या दोन कापडांचा योग्य मिलाफ साधत हा नृत्याविष्कार केला जातो. तो करताना हातापायाचा अचूक ताळमेळ, सिल्क कापडावर चढणं, स्वत:ला लयबद्ध पद्धतीनं लपेटून घेणं आणि आवश्यक तिथं स्थिरावणं, विविध नृत्यमुद्रा करणं, हवेत स्प्लिट करणं अशी अनेक तंत्र एरिअल सिल्क म्हणून शिकवली जातात. 
 
एरिअल अ‍ॅक्रोबेटिक्स 
छताला लावलेल्या बारवर गाठ बांधून सोडलेल्या कापडावर घट्ट रिंग बांधली जाते. त्याला हूप असंही म्हणतात. ती जर वजनानं हलकी असेल तर त्यातून कलाकृती अधिक सफाईदार केल्या जातात. मुख्य म्हणजे त्यातून माणूस सहज आत-बाहेर करू शकतो. या रिंगचा योग्य वापर करत, हातापायाचा ताळमेळ साधत रिंगच्या आत-बाहेर करणं, दोन्ही पाय स्ट्रेच क रणं असे कितीतरी आविष्कार करता येतात. त्याला एरिअल अ‍ॅक्रोबेटिक्स असंही म्हणतात.
 
एरिअल योगा 
सध्या एरिअल योगाचीही चांगलीच क्रेझ आहे. अदिती सांगते, एरिअल थीमनुसार केल्या जाणाऱ्या योगाची पद्धत एरिअल सिल्कपेक्षा पूर्ण वेगळी आहे. त्यासाठी सिल्कचंच कापड वापरतात. मात्र यासाठी पारंपरिक योगपद्धतींचा अवलंब केला जातो. सध्या अशा पद्धतीने योगा करण्याचं प्रमाण आपल्याकडे वाढते आहे. पण, एरिअल सिल्क आणि एरिअल योगा हे भिन्न प्रकार आहेत, हे नक्की.
 
(भक्ती लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहे.)
 
 

Web Title: Ariel Silk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.