अरित्रो

By अोंकार करंबेळकर | Published: May 24, 2018 08:49 AM2018-05-24T08:49:42+5:302018-05-24T11:43:48+5:30

पश्चिम बंगालमध्ये हत्ती आणि माणूस यांच्यात संवादपूल बांधायचं काम करणारा एक दोस्त..

aritra kshetry youth who is working as mediator between human being and elephants | अरित्रो

अरित्रो

Next

- ओंकार करंबेळकर (onkark2@gmail.com)

गेल्या दशकभरात साधारण प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये दहावीला थोडेसे मार्क चांगले पडले की मुलानं इंजिनिअरिंग आणि मेडिकल या दोनच शाखांची तयारी करावी असं मत असायचं. दहावी संपली की मुलांना वेगवेगळ्या सीईटीच्या वर्गांना जुंपायचं आणि सर्व मार्गांचा वापर करून इंजिनिअरिंग अगदीच नाही तर एमबीएसाठी प्रवेश मिळवायची धडपड चालायची. शिकणारी मुलंही हे असंच करायचं असतं असा विचार करून स्वत:च्या आवडीकडे दुर्लक्ष करायची. कोर्स संपण्याच्या आधी किंवा संपल्यावर लगेच नोकरी सुरू केली की त्या आवडी- छंदांना कायमचं विसरावं लागायचं.
कोलकात्यामध्ये राहणाऱ्या अरित्रा (बंगाली उच्चार अरित्रो) खेत्रीचं कुटुंब असंच होतं. आपल्या मुलानेही सावध पावले टाकत इतरांसारखं करिअर निवडावं असं शहरात राहणाºया त्याच्या आई-बाबांना वाटायचं. पण अरित्रोची पावलं जरा वेगळ्या दिशेनं म्हणजे जंगलाच्या दिशेने पडत होती. त्यावेळेस शाळांमध्ये पर्यावरण, वनं याबाबत फारसं काही गांभीर्यानं शिकवलं जात नसे. १९९८ सालीच अरित्रोच्या हातामध्ये कॅमेरा आला आणि त्याच वर्षी गीरच्या जंगलामध्ये त्यानं सात छाव्यांबरोबर एका सिहिंणीला कॅमेºयात टिपलं. जंगलातली ही त्याची पहिली आठवण आजही त्याला लख्ख आठवते. त्यावेळेपासूनच त्याची निसर्गभ्रमंती आणि वन्यप्राण्यांच्या निरीक्षणाची आवड सुरू झाली. दहावीची परीक्षा संपण्यापूर्वी केवळ दोन महिने आधी त्यानं जंगल कॅम्पला जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच्या आई-बाबांनी त्याची आवड ओळखून त्याला परवानगीही दिली. त्यानंतर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र हे विषय घेऊन तो बारावी चांगल्या मार्कांनी पास झाला. प्राणिशास्त्रामध्ये पदवी मिळवत असताना त्याचा जंगलअभ्यास आणखी वाढला. तेव्हाच त्यानं ठरवलं आपल्याकडून काही सकाळी ९ ते ५ अशी नोकरी होणं शक्य नाही. आपण ते आठवड्याचे पाच-सहा दिवस ट्रेडमिलवर पळाल्यासारखं कामामागे पळायचं आणि एक रविवार संपला की पुढच्या रविवारची वाट पाहत बसायचं असं काही करु शकणार नाही. त्यामुळे त्यानं वाइल्डलाइफ बायोलॉजी या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली आणि आाता तो सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस, सेंटर फॉर वाइल्डलाइफ स्टडिज, आयआयएससी आणि केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग यांची एकत्रित मदत घेऊन पी.एचडी. करत आहे.
पश्चिम बंगालमध्ये हत्ती आणि मानव यांच्यामध्ये होणाºया संघर्षावर त्याचा अभ्यास सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये हत्तींची संख्या उत्तर आणि दक्षिण अशा दोन भागांमध्ये पसरलेली आहे. त्यातील ५०० हत्ती त्या राज्याच्या उत्तरेस आहेत. हा सगळा परिसर चहाच्या बागांचा आणि लहान-लहान खेड्यांचा आहे. अरित्रो या सगळ्या परिसरामध्ये शास्त्रज्ञ, चहाच्या मळ्यांचे मालक, वनखात्याचे अधिकारी, कामगार संघटनांचे प्रतिनिधी, स्थानिक ग्रामस्थ यांच्यामध्ये काम करतो. हत्ती व बिबटे यांचा माणसाशी येणारा संपर्क टळून अपघात कमी व्हावेत यासाठी जागृती करणं, लोकांचे प्रश्न जाणून घेणं, त्यांच्या समस्या योग्य माणसांपर्यंत पोहोचवणं, लोकांमध्ये मिसळून त्यांच्या जंगलाबद्दल, हत्तीबद्दलच्या भावना जाणून घेणं हे तो काम आवडीने करतो. वयाच्या केवळ २७ व्या वर्षी अरित्रो करत असलेलं हे काम चारचौघांच्या कामापेक्षा नक्कीच वेगळं आहे.
अरित्रो म्हणतो, हत्तींची कुटुंबव्यवस्था साधारणपणे आपल्यासारखीच असते. त्यांच्यामध्ये कौटुंबिक-भावनिक बंध निर्माण झालेले असतात. राग-प्रेम या भावनाही त्यांच्यामध्ये आहेत. दु:ख होणं, वेदना होणं, राग येणं हे अगदी आपल्याप्रमाणेच हत्तींमध्ये असतं. हत्तींचा आहार त्यांच्या महाकाय आकारानुसारच भरपूर असतो. त्यामुळे आजकाल झपाट्याने आकुंचित पावत चाललेल्या संरक्षित जंगलांमध्ये त्यांची भूक भागणं शक्य होत नाही. त्यांच्या जुन्या भ्रमंतीमार्गांचे नुकसान शेतीसाठी नव्यानं जंगलतोड केल्यामुळे होत आहे. त्यामुळे हत्ती जंगल सोडून मानवी वस्तीत आले, चहाच्या मळ्यांमध्ये आले अशी परिस्थिती निर्माण होते. मनुष्य आणि हत्ती यांच्यामध्ये तणाव निर्माण झाल्यानं मग त्यांना हाकलणंं, त्यांच्यावर प्रतिहल्ला करणं, अपघात असे नवे प्रश्न वाढीला लागतात. हे सगळं टाळण्यासाठी अरित्रो गावकºयांबरोबर काम करतो. त्यांना संभाव्य चुका टाळण्यासाठी मदत करतो.
एखाद्या मुलाला पर्यावरण किंवा वन्यजिवांसंदर्भात करिअर करायचं असेल तर प्रत्येकानं उठून जंगलचा रस्ता पकडायला हवा असं नाही व ते शक्यही नाही, असं अरित्रो म्हणतो. तो सांगतो, आपण आहोत त्या ठिकाणी बसूनही आपल़्या सवयी बदलून निसर्गरक्षणाचं काम करू शकतो. प्लॅस्टिकचा वापर कमी करणं, पाणी जपून वापरणं, आजूबाजूला कचरा न फेकता त्याची योग्य विल्हेवाट लावणं या साध्या वाटणाºया गोष्टीही चांगल्या भविष्यासाठी आपल्या उपयोगी पडू शकतात असं त्याचं मत आहे. फक्त आपलं करिअर निवडताना सर्वांनी अगदी काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. त्यामध्ये कोणत्याही शॉर्टकटचा विचार केल्यास कधीच यश मिळत नाही. त्यामुळे एखाद्या विषयात करिअर करणं हे केवळ निर्णयापुरतं मर्यादित नाही, तर त्यासाठी आपण घेत असलेल्या कष्टांवरही यश अवलंबून असतं, असं अरित्रो सांगतो.


 

 

Web Title: aritra kshetry youth who is working as mediator between human being and elephants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.