..डरते है बंदुकवाले ! अरुज औरंगजेब या पाकिस्तानी तरुणीची कुणाला भीती वाटतेय?
By Meghana.dhoke | Published: December 19, 2019 08:10 AM2019-12-19T08:10:00+5:302019-12-19T08:10:02+5:30
विदेशी एजण्ट, बर्गर कल्चरवाले लेदर जॅकेट एलिट, बदतमीज अशी किती लेबलं त्यांना लावण्यात आली तरी हे पाकिस्तानी विद्यार्थी मागे हटले नाहीत.
-मेघना ढोके / कलीम अजीम
बर्गर, लेदर जॅकेट एलिट, रॉची एजण्ट, भारताची एजण्ट अशी बरीच लेबलं तिला लावण्यात आली.
ती गात राहते, ‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है.’
तर तिला ‘बदतमीज लडकी’ असं सर्रास म्हटलं जातं.
चांगल्या घरच्या मुली चारचौघात असं आवाज वाढवून बोलतात का? प्रश्न विचारतात का, आझादी पाहिजे म्हणून रस्त्यावर आंदोलन करतात का?
असं बरंच काही तिच्याविषयी बोललं जातं.
तिचं नाव आहे अरुज औरंगजेब. पाकिस्तानातल्या विद्यार्थी आंदोलनाची म्होरकी. नेता. पंजाब युनिव्हर्सिटीत उभ्या राहिल्या विद्यार्थी आंदोलनाचं नेतृत्व तिच्याकडे होतं.
एकेकाळी पाकिस्तानात ज्या ओळी बेनझीर भुत्ताेंसाठी लिहिल्या गेल्या, त्या ओळी आज आरजूसाठी पुन्हा पुन्हा गायल्या जात आहेत.
हबीब जनीब यांची कविता आहे, त्याकाळची, ‘डरते है बंदुकवाले, एक निहथ्थी लडकी से !’
आज आरजूच्या बाबतीतच नाही तर रस्त्यावर आंदोलनासाठी उतरलेल्या अनेक पाकिस्तानी विद्यार्थिनींनी या ओळी सार्थ ठरवल्या आहे. 29 नोव्हेंबर 2019 या दिवशी विद्यार्थी आंदोलनाचा जो भडका उडाला त्यात मुलांपेक्षाही मुलींची संख्या जास्त होती.
त्या रस्त्यावर उतरून जाब विचारत होत्या सरकारला की, शिक्षणावरचा खर्च कमी करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी? सैन्य दलांसाठी पैसे आहेत आणि आमच्या शिक्षणासाठी नाहीत असं का? होस्टेलची फी वाढवता, शिक्षणाची फी वाढवता, शिक्षणाचं खासगीकरण करता हे सारं आम्ही का सहन करायचं? आम्ही शिकायचंच नाही का?’
या अशा सडेतोड प्रश्नांचा राग इमरान खान सरकारला येणं साहजिक होतं. ‘नया पाकिस्तान’ची स्वपA तरुण मुलांना दाखवून त्यांच्या गळ्यातले ताईत बनलेले इमरान खान सत्तेत आल्यावर मात्र जुन्याच वाटेने निघाले. नव्या उमेदीची आणि बदलाचे वायदे फोल ठरले. देशात महागाई प्रचंड वाढली. तरुण मुलांचे रोजगार आणि शिक्षणाचे प्रश्न अतिगंभीर झाले.
या सार्याच्या विरोधात लाहोरमध्ये 29 नोव्हेंबर रोजी एक स्टुडण्ट सॉलिडेटरी मार्च अर्थात मोर्चा काढण्यात आला.
त्याचं नेतृत्व करण्यातही अरुज आघाडीवर होती. एका मध्यमवर्गीय पंजाबी घरातली ही मुलगी. इंग्रजी बोलतेच; पण पंजाबीही उत्तम बोलते. जिथं अनेकांना पंजाबी बोलण्याचीही लाज वाटते त्या वर्गात ती आपलं अस्सल पंजाबीपण आनंदाने मिरवते.
आता तिच्यावर ‘फॉरीन एजण्ट’ अर्थात (अप्रत्यक्षपणे) भारताची एजण्ट असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
तिला मात्र यासार्याची काही पर्वा नाही. ती म्हणजे ‘मला या राजकारणाशी आणि शाब्दिक खेळाशी काही कर्तव्य नाही, आमच्या शिक्षणाच्या प्रश्नात सरकारने लक्ष घालून कार्यवाही करावी हीच आमची मागणी आहे.’
ही तिची एकटीचीच मागणी नाही तर आंदोलनात उतरलेल्या शेकडो विद्याथ्र्याची मागणी होती.
ही मुलं स्पष्ट सांगत होती की, शिक्षणाची, अभ्यासक्रमाची फी कमी करा. कॅम्पसमधल्या हिंसाचाराला, लैंगिक भेदभाव आणि छळाला आळा घाला. शिक्षणाचं खासगीकरण थांबवा. होस्टेलची दरवाढ केली आहे ती मागे घ्या. आणि स्टुडण्ट युनियनवरही जी बंदी घालण्यात आलेली आहे, ती बंदी तातडीनं हटवा.
अशा मागण्या अनेक होत्या.
मात्र सरकार दाद द्यायला तयार नव्हतंच. आर्मीनं हे आंदोलन दडपून टाकलं. शेकडोंना अटक झाली, आंतरराष्ट्रीय दबाव वाढला तसं त्या मुलांना सोडून देण्यात आलं.
आणि बाकी काही नाही तर इमरान खान यांनी ट्विट केलं की, 1984 पासून जी स्टुडण्ट युनियनवर बंदी घालण्यात आली आहे ती बंदी आपण मागे घेत आहोत.
या आंदोलनानं किमान हा एवढा लहानसा का होईना विजय या मुलांना दाखवला.
आंदोलन थंडावलं मात्र तरुण मुलांमधली खदखद अजून संपलेली नाही.