विचारा तुमच्या आईबाबांना, अमृताच्या वडिलांसारखं तुम्ही वागाल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 04:58 PM2018-09-28T16:58:30+5:302018-09-28T17:01:14+5:30

अमृताच्या वडिलांनी केवळ जातीच्या आंधळ्या अभिमानातून प्रणयला ठार मारण्याची सुपारी दिली. एकदा सहज, गप्पांच्या ओघात तुमच्याही आई-वडिलांना विचारून पाहा, अमृताच्या वडिलांनी हे जे केले, ते योग्य केले का?

Ask your parents, whats your take on inter cast marriage? | विचारा तुमच्या आईबाबांना, अमृताच्या वडिलांसारखं तुम्ही वागाल का?

विचारा तुमच्या आईबाबांना, अमृताच्या वडिलांसारखं तुम्ही वागाल का?

googlenewsNext
ठळक मुद्देखोटय़ा प्रतिष्ठेचे बळी थांबवायचे असतील, तर तरुण मुला-मुलींनी गप्प बसून कसे चालेल?

-हमीद दाभोलकर

प्रिय मित्र-मैत्रिणींनो, मागच्या आठवडय़ात प्रणय आणि अमृताची बातमी वाचली आणि मनाचा तळ ढवळला गेला असे वाटले. तेलंगणातली ही घटना. प्रणय कुमार हा दलित तरुण आणि अमृता वर्शिणी ही उच्च जातीतली, धनाढय़ घरची मुलगी. दोघांचे प्रेम होते आणि अमृताच्या घरच्यांचा लग्नाला विरोध होता. आपल्या धनाढय़ वडिलांच्या धमक्यांना न घाबरता अमृताने प्रणयशी लग्न केले, ही गेल्या जानेवारीतली घटना. अमृताच्या वडिलांनी हा प्रकार जिव्हारी लावून घेतला आणि प्रणयच्या खुनासाठी एक कोटी रुपयाची सुपारी दिली. गेल्या काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या आणि अमृताच्या देखत प्रणयचा खून झाला. - या घटनेने देशभरात संतापाची आणि विषण्ण हतबलतेची भावना व्यक्त झाली. केवळ जातीच्या बाहेर लग्न केले म्हणून एखादा बाप स्वतर्‍च्या मुलीच्या आयुष्याचे असे धिंडवडे कसे काढू शकतो, हा प्रश्न कुणालाही अस्वस्थ करणाराचा आहे.

काही महिन्यांपूर्वी, जेव्हा महाराष्ट्र शासनाने आंतरजातीय लग्नांना पाठिंबा देणारा सक्षम कायदा करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा आपण आंतरजातीय-धर्मीय लग्नाच्या अनुषंगाने संवाद केला होता. कायद्याचे आणि शासनाचे पाठबळ आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्नांना किती महत्त्वाचे ठरते ते आपण जाणतोच. त्याच बरोबर हेदेखील आपण समजून घेतले पाहिजे की, केवळ कायदा केला म्हणून समाजातील एखादा प्रश्न पूर्णपणे सुटू शकत नाही. त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अनुकूल समाजमन तयार करणे हेदेखील खूप महत्त्वाचे असते. खासकरून जात आणि धर्माशी संबंधित गोष्टी संबंधित बदलण्यासाठी तर खूप सातत्यपूर्ण प्रबोधन आणि संवाद करावा लागतो.

त्या अनुषंगाने आपण आज बोलूयात असे मला वाटते. खरे तर ह्या संवादाची सर्वात जास्त गरज कुणाला असेल? तर, ती आपल्या पालक आणि नातेवाइकाना ! बरोबर ना? जेव्हा जेव्हा मी तरु ण मुलामुलींशी, जोडीदाराची निवड, प्रेम आणिआकर्षण ह्या अनुषंगाने बोलतो तेव्हा सगळ्यांचे एकाच म्हणणे असते की, आम्हाला हे सगळे मान्य आहे. ह्या गोष्टी तुम्ही आमच्या पालकांना सांगा. खरे आहे! खोटय़ा सामाजिक प्रतिष्ठेच्या संदर्भात, मुलांचे पालक काय भूमिका घेतात यावरून त्या लग्नाचे पुढे काय होणार ते ठरते. आपण थोडा विचार केला तर आपल्या सहज लक्षात येईल की, अशा प्रकरणाच्या मध्ये बहुतांश वेळा मुलीचे वडील, चुलते किंवा भाऊ हे हिंसा करणारे किंवा घडवून आणणारे असतात. प्रणय आणि अमृताच्या प्रकरणातहीदेखील प्रणयच्या खुनाची सुपारी अमृताच्या वडिलांनीच दिली. सिनेमा हा समाजमनाचा आरसा असतो असे आपण मानतो. त्या न्यायाने ‘सैराट’मधील खून करणारादेखील आर्चीचा भाऊच होता. हे पालक असे का वागत असावेत?

अमृताचे पालक - खासकरून वडील हे प्रणयचा खून करण्यार्पयत अचानक पोहचत नसतात. आपल्या मुलीला जणू स्वतर्‍ची संपत्ती मानणे, जातीचा आणि स्वतर्‍च्या प्रतिष्ठेचा खोटा दंभ, मुलांच्या वरती आपली मते लादणे अशा अनेक विचार प्रक्रि या आणि प्रवृत्ती मधून हे आकाराला येत असते. अशावेळी कुटुंबातील इतर व्यक्तींची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. अमृताच्या वडिलांनी केलेले प्रणयच्या खुनाची सुपारी देण्याचे नियोजन, अमृताच्या घरातील कोणालाच माहीत नसेल, अशी शक्यता जवळ जवळ नाही. तिची आई आणि इतर नातेवाईक यांनी थोडे डोळे उघडे ठेवून भान राखले असते तर तिच्या वडिलांच्या मनात काय चालू आहे याचा अंदाज त्यांना नक्कीच येऊ शकला असता. त्या भीषण कृत्यापासून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करता आला असता. जवळचे नातेवाईक, शेजारी, मित्र-मैत्रिणी यामध्ये महत्त्वाची मध्यस्थाची भूमिका पार पडू शकतात. अशा प्रसंगी समुपदेशकासारखी भूमिका पार पडणारे हे नातेवाईक आणि मित्र मंडळी अशा प्रसंगी खूप महत्त्वाची असतात. वातावरणातील तणाव हलका करणे, दोन्ही बाजूंशी संवादाची शक्यता निर्माण करणे, टोकाच्या निर्णयापासून कुटुंबीयांना परावृत्त करणे, अशा अनेक गोष्टी हे लोक करू शकतात. प्रणवच्या पालकांच्या सारखी भूमिका घेणार्‍यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे. त्यांनी स्वतर्‍च्या मुलाला त्याची जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य तर दिलेच; पण त्याच्या निर्णयाच्या पाठीशी ते ठामपणाने उभे राहिले. प्रणयच्या निर्घृण खुनाच्या नंतरदेखील अमृताने आपल्या सासरच्या घरीच राहाण्याचा निर्णय जाहीर केला आहे ह्या मधेच आपण सारे काही समजून घ्यावे.

आता तुम्ही म्हणाल, ाचा आमच्याशी काय संबंध? माझ्या मते खूप जवळचा संबंध आहे. प्रणयचे पालक आणि अमृताचे पालक ही दोन टोके धरली तर आपल्या सर्वाचे पालक ह्या दोन्ही टोकांच्या मध्ये कुठेतरी असणार आहेत हे आपण समजून घ्यायला हवे. या पाश्र्वभूमीवर जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य जर तुम्हाला हवे असेल, तर सध्याच्या समाजव्यवस्थेमध्ये आपल्यातील बहुतांश जणांना ते सहजासहजी मिळणार नाही! हे आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. ते स्वतंत्र मिळवण्याचा प्रयत्न म्हणून आपल्या पालकांशी, नातेवाइकाच्या बरोबर, मित्रमंडळीमध्ये संवाद आणि चर्चा सुरू केली पाहिजे. अमृता आणि प्रणयची माहिती तुमच्या पालकांना नसेल तर ती गप्पागोष्टीमध्ये सांगून त्यांना हे आपण विचारायला हवे की त्यांना कोणाचे पालक योग्य वाटतात? आणि त्याची कारणे काय? त्यांना हेदेखील विचारायला पाहिजे की, ‘समजा; अमृताचे कुटुंब आपले कौटुंबिक स्नेही असते तर आपण तिच्या पालकांना काय सुचवले असते?’ आपल्या आजूबाजूलादेखील अनेक ‘प्रणय’ आणि ‘अमृता’ आहेत. त्यांना आपण पाठबळ देणार, त्यांचे पाय मागे ओढणार की कुंपणावर बसून केवळ बघत राहणार ह्या प्रश्नांची उत्तर आपल्यातील बहुतांश लोक काय देतात यावरून आपल्या समाजात, अमृता आणि प्रणयसारख्या शोकांतिका होतच राहणार की आपण त्या थांबवणार हे ठरणार आहे. तुमचे आई-बाबा हे जर हे सगळे समजून घेऊन तुम्हाला स्वातंत्र्य देण्याच्या बाजूचे असतील तर त्यांना ह्या गोष्टी दुसर्‍यांशी मोकळे पणाने बोलायला सांगा. त्यांच्या मित्र-मैत्रिणींशी, इतर पालकांशी, अगदी जर ते फेसबुक वापरत असतील तर त्यांना जाहीर सांगायला सांगा की, ‘माझ्या मुलाचा किंवा मुलीच्या जोडीदार निवडीच्या स्वातंत्र्याला मी शक्य तेव्हडी मदत करीन आणि त्या विषयी माझे मत त्यांच्यावर लादणार नाही आणि अन्य जातीतील किंवा धर्मातील जोडीदार कुणी निवडला तर त्याच्या प्रति हिंसेचा वापर करणार नाही.’

तुम्हाला जर हे अवघड वाटत असेल तर मी एक ‘टीप’ देतो. जेव्हा तुम्हाला आई बाबांच्याकडून नवा मोबाइल विकत घेऊन हवा असतो आणि ते द्यायला तयार नसतात तेव्हा तुम्ही काय काय आयडिया करता ते आठवून पहा ! त्या लाडीगोडी करण्याच्या एक-दोन ट्रिक इथेदेखील वापरून बघायला काय हरकत आहे? कदाचित आईबाबा रागावतील किंवा तुमचाच असा काही विचार आहे का असादेखील त्यांना संशय येईल! पण हे लक्षात ठेवा की जोर्पयत घराघरांच्या मध्ये हा संवाद होत नाही आणि अमृताच्या वडिलांनी केले ते योग्यच केले, असे मनातल्या मनात आणि खासगीत बोलणारे आवाज कमी होत नाहीत तोर्पयत केवळ कडक कायदा हे खोटय़ा प्रतिष्ठेचे बळी थांबवू शकणार नाही. तुमच्या कडून थोडी जास्त मागणी करतो आहे; पण तुमच्या आमच्यातील अमृता आणि प्रणयच्या साठी आपण एवढे तरी करायला नको का? तुमचा पालकांशी संवाद कसा झाला ते आम्हाला जरूर कळवा! जे पालक आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्नांना पाठबळ देऊ इच्छितात किंवा ज्यांनी पूर्वी असे पाठबळ दिले आहे अशा लोकांचे अनुभवदेखील आम्हाला समजून घ्यायला आवडतील.

महाराष्ट्र अंनिस

जोडीदाराची विवेकी निवड

व्हॉट्सअ‍ॅप क्र मांक

8424041159

9594094785

Web Title: Ask your parents, whats your take on inter cast marriage?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.