आॅटो इम्युनिटी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 02:47 PM2018-03-22T14:47:00+5:302018-03-22T14:47:00+5:30

काही वेळा थायरॉईडच्या अँटिबॉडीज देशद्रोही होतात. आपल्याच शरीरातल्या थायरॉईडवर हल्ला चढवून त्या थायरॉईडचा कारखाना बंद पाडतात.

Auto Immunity | आॅटो इम्युनिटी

आॅटो इम्युनिटी

Next

- डॉ. यशपाल गोगटे
हायपोथायरॉईडीझममध्ये शरीरात थायरॉईडच्या हार्मोन्सची कमतरता होते, त्याची लक्षणं दिसू लागतात हे आपण मागील लेखात बघितले; पण ती नक्की का होते? कशी होते? हे या लेखात जाणून घेऊया...  जेव्हा कारखानाच बंद पडतो...थायरॉईड ग्रंथीमधून ट्राय-आयोडो-थायरॉनीन (टी ३) व थायरॉक्सिन (टी ४) नावाची हार्मोन्स तयार होत असतात. एखाद्या अविरत चालणाऱ्या कारखान्याप्रमाणे उत्पादनाचं हे कार्य अव्याहत चालू असतं. या कारखान्याचं व्यवस्थापन पूर्णत: पिट्युटरी ग्रंथीतून निघणा-या टीएसएच या हार्मोन्सचं असतं. काही कारणास्तव रक्तात टी ३ व टी ४ या हार्मोन्सची कमतरता निर्माण झाली की, त्याला हायपोथायरॉईडीझम असं म्हणतात. बºयाच वेळेला ही कमतरता थायरॉईडच्या हार्मोन्सचं उत्पादन कमी झाल्यामुळे होते.

थायरॉईड ग्रंथी अकार्यक्षम होण्यास शरीरातील काही प्रणालींमधील बिघाड कारणीभूत ठरतात. आपल्या शरीरातील पेशींमध्ये रोगप्रतिकारक तत्त्व म्हणजे अँटिबॉडीज असतात. त्या आपल्या शरीराचा रोगांपासून, आजारांपासून, जंतांपासून बचाव करीत असतात. काहीवेळा या अँटिबॉडीज देशद्रोही होतात. देशद्रोही म्हणजे काय, तर तो ज्या देशाचा नागरिक असतो त्याच देशावर हल्ला चढवतो. तसंच थायरॉईडच्याही या देशद्रोही अँटिबॉडीज आपल्याच थायरॉईडवर हल्ला चढवून त्याला पूर्णत: निकामी करतात. थोडक्यात, थायरॉईडचा कारखाना बंद पाडतात. या प्रकाराला आॅटो- इम्युनिटी असं म्हटलं जातं.

रक्तामध्ये या अँटिबॉडीज अ‍ॅँटिटीपीओ नावाच्या तपासणीद्वारे ओळखल्या जाऊ शकतात. काहीवेळेस काही लोकांमध्ये थायरॉईडच्या आजारात सुरुवातीच्या काळात कधी टी ३ व टी ४ ची तपासणी नॉर्मल येते, तर कधी गडबडलेली येते. अशावेळेस अँटिबॉडीच्या तपासणीनं आजाराचे खात्रीपूर्वक निदान करता येते व संभ्रम टाळता येतो. आॅटो इम्युनिटीव्यतिरिक्त काही लोकांमध्ये हायपोथायरॉईडीझमचा आजार थायरॉईड ग्रंथींमधील असलेल्या एन्झाईम्सच्या बिघाडामुळे जन्मत: देखील असू शकतो. म्हणूनच सर्व नवजात बालकांमध्ये पहिल्या आठवड्यातच थायरॉईडची चाचणी करणं आवश्यक आहे. वेळीच केलेलं निदान या बालकांमध्ये पुढे होणारे मतिमंदत्व टाळू शकते.
पूर्वीच्या काळी हायपोथायरॉईडीझमचा आजार आहारात आयोडीनच्या कमतरतेमुळे होत असे. आयोडीनयुक्त मीठ वापरात आल्यापासून हा आजार जवळ जवळ नाहीसा झाला आहे. युरोपमध्ये काही भागात सेलेनियमच्या कमतरतेमुळेही हा आजार झालेला आढळतो.
सास, बहू और साजिश टी ३ व टी ४ अन् टीएसएच यांचं एकमेकांशी असलेलं नातं हे सास-बहू प्रमाणे असते. थायरॉईडमधून निघणारे टी ३, टी ४ व पिट्युटरीमधील टीएसएच या हार्मोन्सचे प्रमाण व्यस्त असते. म्हणजेच ज्यावेळेस टी ३, टी ४ कमी असते त्यावेळेस टीएसएच वाढलेलं असतं. याच स्थितीला हायपोथायरॉईडीझम असं म्हणतात.

पण काही वेळेस काही लोकांमध्ये टी ३, टी ४ नॉर्मल असूनही टीएसएचमध्ये अनपेक्षितरीत्या गुणात्मक वाढ आढळून येते, याला सबक्लिनिकल हायपोथायरॉईडीझम असं म्हणतात. सोप्या शब्दात याला पुढं होऊ घातलेल्या आजाराची सुरुवात असे म्हणता येईल. फिल्मी सास सुनेवर वर्चस्व गाजवते तसेच टीसीएचदेखील कायम टी ३, टी ४ ला आपल्या नियंत्रणाखाली ठेवते. यामुळे फक्त टीएसएच या एकाच तपासणीनेदेखील बहुतेकवेळा हायपोथायरॉईडीझमचे निदान होऊ शकते. हायपोथायरॉईडीझमवर वेळीच केलेल्या उपचारांमुळे पुढे होणारे गंभीर आजार टाळता येतात. हायपोथायरॉईडीझमच्या उपाययोजनेबद्दल माहिती पुढील लेखात...


(लेखक एंडोक्रिनॉलॉजिस्ट अर्थात हार्मोन्सतज्ज्ञ आहेत. dryashpal@findrightdoctor.com)

 

Web Title: Auto Immunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.