मांडवा गावात वीटभट्टीवर काम करणार्या आईवडिलांचा मुलगा, ऑलिम्पिकचं स्वप्न पाहतो तेव्हा.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 03:59 PM2019-10-10T15:59:56+5:302019-10-10T16:00:24+5:30
अविनाशशी त्याच्या गावातूनच फोनवर संपर्क केला तर तो खूश होता. म्हणाला, ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा फडकवण्यासाठी मी खूप मेहनत घेईन. प्रयत्नांत कसूर करणार नाही. भारताला पदक मिळवून देणार ही माझी मनात बांधलेली पक्की गाठ आहे.
- अविनाश कदम
अविनाश ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला, बातमी आली.
आणि त्याच्या गावात, त्याच्या घरीच पोहचलो.
बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील मांडवा हे गाव. घरी त्याचेवडील मुकुंद साबळे, आई वैशाली साबळे भेटल्या. वीटभट्टीवर काम करणारे हे मायबाप, त्यांच्या लेकानं ऑलिम्पिकर्पयत मजल मारली आहे. हातावर पोट असणार्या या कुटुंबासाठीच नाही तर गावासाठी ही केवढी मोठी गोष्ट.
आष्टीपासून आठ किलोमीटर अंतरावर मांडवा हे छोटंसं गाव आहे. या गावातील धनगर वस्तीत हे कुटुंब राहतं. आईवडील, भाऊ योगेश, विवाहित बहीण रोहिणी असं हे कुटुंब. वीटभट्टीवर मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत या जोडप्यानं आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून जिवाचं रान केलं. अविनाश गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीर्पयत शिकला. त्यानंतर पुढील माध्यमिक शिक्षण धानोरा येथे त्यानं घेतलं. तिथं शिकत असताना त्यांला क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश मिळाला. बालेवाडी पुणे येथे प्रवेश झाल्यानंतर त्याला प्रशिक्षण चांगलं मिळालं. बारावीनंतर तो भारतीय सेना दलात भरती झाला. त्याला लहानपणापासून रनिंगची आवड होती. तो कडा येथे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी गावातून कधी कधी रनिंग करत कॉलेजला जात होता. पुढे आपण मॅरेथॉन स्पर्धेत काही तरी नावलौकिक करून दाखवायचे अशी जिद्द मनात बाळगून त्यानं अनेक स्पर्धात पदकं जिंकली.
गावच्या सरपंच मनीषा मुटकुळे सांगतात, आमच्या गावातील अविनाशने जबरदस्त कामगिरी केली याचा गावाला अभिमान आहे. गावचा मुलगा देशाचं प्रतिनिधित्व करणार याचा आनंद आहे.
अविनाशशी त्याच्या गावातूनच फोनवर संपर्क केला तर तो खूश होता. म्हणाला, ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा फडकवण्यासाठी मी खूप मेहनत घेईन. प्रयत्नांत कसूर करणार नाही. भारताला पदक मिळवून देणार ही माझी मनात बांधलेली पक्की गाठ आहे.
त्याचं हे कौतुक, त्याचं यश त्याचे आजोबा साहेबराव शांतपणे पाहत असतात. सांगतात, नातावानं आज नाव काढलं. माझा नातू खरंच इतक्या लांब जाईल असं मला वाटत नव्हतं; परंतु खरच पोराने आज गावात नव्हे तर देशात नाव कमावलं.
तोच अभिमान त्याच्या आईवडिलांच्या नजरेत चमकतो. ते सांगतात, आमच्या मुलानं असंच जिंकत राहावं. माझा मुलगा टीव्हीवर दिसावा ही आमची खूप दिवसाची इच्छा आज पूण झाली.
त्याच्या शिक्षकांनाही आज हा यशाचा दिवस उजाडला याचा आनंद आहे. वस्ती शाळेवर शिक्षण घेत असताना त्याला मार्गदर्शन करणारे हनुमंत मुटकुळे शिक्षक सांगतात, अत्यंत गरीब परिस्थितीतून अविनाशने हे यश मिळवलं आहे. त्यानं शाळेत असताना आपल्या वहीवर लिहून ठेवलं होतं, मी जिंकणारच !’
त्या जिंकण्याच्या प्रवासाची ही त्याच्यासाठीही सुरुवात आहे!