मराठवाडय़ातल्या अविनाशची ऑलिम्पिकर्पयत धडक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 03:53 PM2019-10-10T15:53:54+5:302019-10-10T15:54:00+5:30
मराठवाडय़ातला तरुण. नोकरी हवी म्हणून वयाच्या 18व्या वर्षी सैन्यात भरती होतो. सियाचिनच्या गोठवणार्या थंडीत पहारा देतो आणि तिथं त्याला सापडतो त्याच्या पायातला वेग आणि धावत तो थेट टोक्यो ऑलिम्पिकचंच तिकीट मिळवतो. त्याची गोष्ट.
- स्वदेश घाणेकर
खेळाडू आणि संघर्ष हे तसं अतुट नातं..
महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. झगडून, घाम गाळून खेळाडू खेळाच्या प्रेमापोटी सारं काही सोसत राहतात. संघर्ष हा त्यांच्या खेळाची प्रेरणा ठरतो इतपत ते त्याला आपलंसं करतात. संघर्षाच्या भट्टीतून तावून सुलाखून बाहेर पडणारे मग इतिहास रचतात..
त्यातलंच एक नाव म्हणजे अविनाश साबळे..
25 वर्षाच्या मराठमोळ्या अविनाशने अशीच एक ऐतिहासिक कामगिरी केली. दोहा येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेच्या 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात त्यानं गेल्या शुक्र वारी इतिहास रचला. अंतिम फेरीत राष्ट्रीय विक्र मासह 2020च्या टोकियो ऑलिम्पिकचं तिकीटही त्यानं कमावलं. ऑलिम्पिकर्पयत धडक मारण्याची ही कामगिरी करत त्यानं 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात 8 मिनिटे 21.37 सेकंदाची वेळ नोंदवली. या कामगिरीसह त्याने ऑलिम्पिक पात्रतेचे 8 मिनिटे 22 सेकंदाचे निकष पूर्ण केले. काही दिवसांपूर्वी अविनाशने 8 मिनिटे 25.23 सेकंदाची वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्र म नोंदवला होता.
या स्पर्धेच्या हिट 3 मध्ये अविनाश आठव्या स्थानी होता. त्यामुळे त्याला अंतिम फेरीत प्रवेश नाकारला गेला. पण, या हिटमध्ये त्याच्या मार्गात दोनवेळा प्रतिस्पर्धीनी अडथळा निर्माण केला. तरीही त्यानं कमबॅक करत आठवे स्थान पटकावले. संघटनेनं आयोजकांकडे दाद मागितली आणि अविनाशचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित झाला.
आणि त्यानं संधीचं सोनं करत थेट ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची कामगिरी करून दाखवली.
हे अडथळे आणि त्याचंच संधीत रूपांतर करणं तसं अविनाशसाठी काही नवीन नाही. वयाच्या सहाव्या वर्षांपासून तो अशा प्रसंगांना सामोरा जात आहे.
मराठवाडय़ातल्या बीड जिल्ह्यातील मांडव गावचा हा मुलगा. गाव छोटंसंच. ना चांगला रस्ता, ना जवळपास शाळा. दुष्काळानं पोळलेलं हे गाव. शेतकरी कुटुंबात जन्मलेला अविनाशला लहानपणापासूनच जगण्याचा संघर्ष अटळ होता. शिकायचं ते नोकरी मिळण्यासाठीच एवढंच एक लक्ष होतं. बारावीनंतरच त्यानं सैन्यात जायचं ठरवलं आणि तो भारतीय सैन्यातील पाच महार रेजिमेंटमध्ये रुजूही झाला. वयाच्या 18 व्या वर्षी त्याची पोस्टिंग सियाचिनच्या हाडं गोठवणार्या थंडीत झाली होती.
मात्र जाऊ तिथं टिकू, झगडू हे सूत्रच अंगवळणी पडलेलं असल्यानं त्यानं सैन्यातल्या नोकरीचंही चीज केलं. तीन वर्षे सैन्यात सेवा केली.
सियाचीनमधील पोस्टिंगपासून वाचण्यासाठी तो खेळाकडे वळला. 18व्या वर्षी सियाचीन येथे पोस्टिंगला जाणारा तो महार रेजिमेंटमधला युवा सैनिक होता. त्यावेळी तेथे तो खूप भांबावला होता. काय करावे, कुणाशी बोलावं हे त्याला काहीच कळत नव्हतं. त्यावेळी तेथील काही सहकार्यांनी त्याला खेळाची निवड कर असा सल्ला दिला. अविनाश सरावात धावण्यात पटाईत होता आणि म्हणून त्यानं धावपटू बनावं असं अनेकांनी सांगितलं. त्यानंतर त्याचा धावपटू बनण्याचा प्रवास सुरू झाला.
2015मध्ये त्यानं आंतरसैन्य क्र ॉस कंट्री स्पर्धेत सहभाग घेतला आणि 2017मध्ये त्यानं राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेत अव्वल स्थान पटकावलं. त्यानंतर त्यानं स्टीपलचेस खेळाकडे वळण्याचा निर्णय घेतला. अमरीश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानं स्टीपलचेसचा सराव सुरू केला. त्यासाठी त्यानं तीन महिन्यांत 20 किलो वजन कमी केलं. राष्ट्रीय शिबिरात त्याला निकोलाई स्नेसारेव्ह यांचं मार्गदर्शन मिळालं. पण, स्नेसारेव्ह यांची शिकवण्याची शैली अविनाशला पटली नाही आणि तो पुन्हा कुमार यांच्याकडे शिकवणीला गेला.
**************
37 वर्षापूर्वीचा विक्र म मोडला
दुखापतीमुळे त्याला 2018च्या आशियाई स्पर्धेची पात्रता मिळवण्यात अपयश आले. पण, त्यानं त्याच वर्षी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत 8 मिनिटे 29.80 सेकंदाची वेळ नोंदवून 37 वर्षापूर्वीचा गोपाळ सैनी (8 मिनिटे 30.88 सेकंद) यांचा राष्ट्रीय विक्र म मोडला. त्यानंतर 2018च्या फेडरेशन चषक स्पर्धेत त्यानं वेळेत सुधारणा केली आणि नवा राष्ट्रीय (8 मिनिटे 28.94 सेकंद) विक्र म नोंदवला. आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद व जागतिक स्पर्धेची पात्नता निश्चित केली. जागतिक स्पर्धेत 3000 मीटर स्टीपलचेस प्रकाराची पात्रता निश्चित करणारा तो दीना राम (1991) यांच्यानंतरचा पहिलाच भारतीय पुरुष धावपटू ठरला. दोहा येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत त्यानं रौप्यपदक जिंकले. त्यानंतर त्याची यशस्वी घोडदौड सुरूच आहे.