कुलूप-किल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 03:16 PM2018-01-24T15:16:02+5:302018-01-25T10:04:38+5:30
हार्मोन्स पोस्टमनचं काम करतात, योग्य पत्त्यावर मेसेज पोहचला तर उत्तम. नाही तर सगळाच घोळ !
-डॉ. यशपाल गोगटे
आपल्या शरीरातील सर्व अवयव स्वतंत्रपणे आपापलं काम करत असतात. पण त्यांचं हे काम एकमेकांवरही बरंच अवलंबून असतं. माझं मी पाहून घेईन, तुझा काय संंबंध असा त्यांचा तोरा नसतो. आपलं कम्युनिकेशन कसंही असो त्यांचं कम्युनिकेशन, संदेशांची देवाणघेणात अर्थात परस्पर मेसेजिंग उत्तम असावं लागतं. हे मेसेजिंगचं, विविध अवयवांमध्ये संवाद साधायचं अर्थात संदेश वाहकाचं काम म्हणजे हार्मोन्स. एकप्रकारे हार्मोन्स ‘पोस्टमनचं’ काम करत असतात. थोडक्यात, हार्मोन्सवाला डाकिया डाक लाता है...
आपलं शरीर सूक्ष्म पेशींनी तयार झालेलं आहे हे तर आपण शाळेत विज्ञानातही शिकलोय. प्रत्येक पेशीला दोन मुख्य भाग असतात बाह्य आवरण आणि केंद्रभागी असलेले न्यूक्लियस. हे पोस्टमन अर्थात हार्मोन्स पेशींवर बाह्य आवरणावर आणि न्यूक्लियसवर संदेश पोचवतात.
त्यांचेही रासायनिक दृष्ट्या तीन मुख्य प्रकार असतात. अमिन्स, प्रथिनं आणि चरबी. यात अमिन्स आणि प्रथिनं जास्तकरून बाह्य आवरणावर संदेश वहनाचे काम करत असतात. चरबीयुक्त मुख्यत: स्टिरॉइड हार्मोन्स हे केंद्रभागी असलेल्या न्यूक्लियसवर कार्य करत असतात. आणि हे हार्मोन्स जिथे संदेश पोचवतात त्या भागाला ‘रिसेप्टर ’असे म्हणतात. पिनकोडच्या मदतीने पत्र जसं अचूक पत्त्यावर पोचतं तसे हे रिसेप्टरही हार्मोन्ससाठी पिनकोडचंच काम करतात.
कुलूप किल्ली मॉडेल
विशिष्ट हार्मोन्स पोचला की क्षणी पेशींच्या बाहेरील किंवा आतील विशिष्ट रिसेप्टर प्रतिसाद देतात. योग्य प्रतिसाद मिळाला की योग्य काम सुरु होतं. त्यामुळे त्या विशिष्ट अवयवाचंही काम अचूक सुरु राहतं. म्हणजे काय हे रिसेप्टर म्हणजे कुलुप, तिथं हार्मोन्सची चावी चपखल बसते.
जसे चाव्यांचे प्रकार असतात. तसे या कुलुप रिसेप्टरचेही. कुठल्याही कुलुपाला कुठलीही चावी लागत नाही. तर या रिसेप्टरचे मुख्य दोन प्रकार म्हणजे अगोनीस्ट व अँटॅगॉनिस्ट. अगोनीस्ट रिसेप्टर हे हार्मोनच्या संपर्कात आल्यावर उद्युक्त होतात तर अँटॅगॉनिस्ट रिसेप्टर हार्मोनच्या संपर्कात आल्यानंतर निष्क्रि य होतात. शरीरातील चयापचयासाठी या दोन्हीही क्रि या आवश्यक असतात. कोणतं हार्मोन कोणतं काम करतं, हे चौकटीत दिलं आहेच.
आता हे कुलूपच बिघडलं किंवा चावीच बिघडली तर आपल्या शरीरात घोटाळे सुरु होतात. ते नेमके कसे होतात, याविषयी पुढच्या भागात..