चकटफू ! अमेरिकेतलं संग्रहालय घरच्या घरी ऑनलाइन पहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:15 PM2017-09-21T12:15:09+5:302017-09-21T12:16:21+5:30

स्मिथसोनियन हे जगप्रसिद्ध संग्रहालय पहायला आता अमेरिकेत जायची गरज नाही.

Awkward! Visit the museum home in America at home online | चकटफू ! अमेरिकेतलं संग्रहालय घरच्या घरी ऑनलाइन पहा

चकटफू ! अमेरिकेतलं संग्रहालय घरच्या घरी ऑनलाइन पहा

Next
ठळक मुद्दे आपण कोणत्याही वेगळ्या देशात, राज्यात, शहरात गेलो की प्रेक्षणीय स्थळांच्या यादीत संग्रहालय ही गोष्ट असतेच. अनेकांना संग्रहालय बघायला फार कंटाळा येतो. पण अनेक लोकं जिथे जातो आहोत, तिथल्या लोकांबद्दल, तिथल्या इतिहासाबद्दल समजून घेण्यासाठी संग्रहालयांना नक्कीच भेट देतात.ही संग्रहालये म्हणजे निसर्गाच्या, माणसाच्या कर्तृत्वाचं एक प्रदर्शन आहेत असं वाटतं.

- प्रज्ञा शिदोरे    

   आपण कोणत्याही वेगळ्या देशात, राज्यात, शहरात गेलो की प्रेक्षणीय स्थळांच्या यादीत संग्रहालय ही गोष्ट असतेच. अनेकांना संग्रहालय बघायला फार कंटाळा येतो. पण अनेक लोकं जिथे जातो आहोत, तिथल्या लोकांबद्दल, तिथल्या इतिहासाबद्दल समजून घेण्यासाठी संग्रहालयांना नक्कीच भेट देतात. ही संग्रहालये म्हणजे निसर्गाच्या, माणसाच्या कर्तृत्वाचं एक प्रदर्शन आहेत असं वाटतं. ही संग्रहालये म्हणजे तिथल्या लोकांच्या बऱ्या-वाईट वारशाचं एक प्रतीक बनून जातं.
   

   जगभरात अशी अनेक संग्रहालयं आहेत; पण काहींनी स्वत:ला बदलत्या काळानुसार बदललं आहे. स्मिथसोनियन नावाचं जगप्रसिद्ध संग्रहालय बघायचं असेल तर ते पूर्वी प्रत्यक्ष वॉशिंग्टन डीसीमध्ये जाऊनच बघायला लागत असे. आता तसं नाही, स्मिथसोनियन संग्रहालय हे आता ऑनलाइन स्वरूपातदेखील बघता येतंय. अमेरिकेला न जाता आपल्या घरीच बसून हे संग्रहालय तुम्ही पाहू शकता.
   

   हे स्मिथसोनियन म्हणजे प्रत्यक्षात काय आहे? तर हा एक ट्रस्ट आहे. जेम्स स्मिथसन हा ब्रिटिश शास्त्रज्ञ. त्याच्या मृत्यूनंतर त्याने आपली सर्व धन-दौलत आपल्या पुतण्याला देऊ केली. त्याचा पुतण्या म्हणजे हेनरी जेम्स हंगरफोर्ड. १८३५ साली त्याच्या मृत्यूनंतर त्याचा कोणताही वारस नसल्यामुळे ती अमेरिकन राष्ट्राला अर्पण झाली. त्याला वारस नसल्यामुळे ते असे होणार हे त्याला माहीत होते. म्हणून आपली संपत्ती सत्कर्मी लागावी म्हणून ‘ही रक्कम ज्ञानाच्या प्रचारासाठी आणि वृद्धीसाठी’ वापरली जावी असं त्याच्या मृत्युपत्रात त्यानं लिहून ठेवलं. १८३८ साली अमेरिकेलाही पाच लाख डॉलर्सची रक्कम मिळाली. या रकमेबरोबरच, खूप मौल्यवान अशा वस्तूही मिळाल्या.
 

    एवढी मोठी रक्कम मिळाल्यावर अमेरिकन काँग्रेसला त्याचं नक्की काय करायचे, त्याचा उपयोग नक्की कसा करायचा हे कळलं नाही. ‘ही रक्कम ज्ञानाच्या प्रचारासाठी आणि वृद्धीसाठी वापरली जावी’ याचा नेमका अर्थ काय हे अमेरिकन काँग्रेसला ठरवायला पुढची आठ वर्षे लागली. म्हणतात ना, लोकशाहीमध्ये निर्णय घ्यायला जरी उशीर झाला तरीही जो निर्णय घेतला जातो तो जास्तीत जास्त लोकांच्या भल्याचा असतो. आताही तसंच झालं. जवळजवळ ८ वर्षांनी या रकमेतून एक संग्रहालय उभारावं असं काँग्रेसने ठरवलं.
 

    १८४९ साली सुरू झालेल्या या ट्रस्टच्या संग्रहालयाला आता १६८ वर्षं झाली आहेत. या वर्षांमध्ये या संग्रहालयाच्या अनेक शाखा निर्माण झाल्या. तब्बल २००हून अधिक आणि जवळजवळ अमेरिकेच्या प्रत्येक राज्यामध्ये. विषयानुरूप अनेक संग्रहालयं, उद्यानं बांधली गेली. पण आजच्या काळाला अनुसरून घडलेलं सर्वात मोठे काम म्हणजे वेबसाइट आणि यू-ट्यूब चॅनलचे. या यू-ट्यूब चॅनलवर आपण कायम बघतो त्याप्रमाणे मोठमोठ्या डॉक्युमेंटरीज नाहीत. इथे आपल्याला पहायला मिळतील २ किंवा ३ मिनिटांच्या छोट्या छोट्या फिल्म्स. याचे विषयही भन्नाट आहेत. इथे तुम्हाला राणी व्हिक्टोरियाने आपल्या कॅमेराने काढलेली छायाचित्रे बघायला मिळतील. तसेच राणीने केलेले रेडिओवरचे पहिले भाषण ऐकायला मिळेल. त्यांनी नुकताच पोस्ट केलेला व्हिडीओपण कमाल आहे. त्याचा विषय आहे की पूर आला तर गटारांना तुंबण्यापासून कसं वाचवायचं. त्यांनी हा व्हिडीओ अमेरिकेतील टेक्सासमध्ये आलेल्या पुराच्या संबंधी टाकला आहे. याबरोबरच आवडत्या विषयानुसार आपण या फिल्म बघू शकता.

   या वेबसाइटवर कसली माहिती नाही, ते सांगा ! एखाद्या बॉटनीस्टला जगभरातल्या फुलांची यादी हवी असेल तर ती आहे. त्याच बरोबर त्याचे स्पेसीमन कुठे पहायला मिळेल ही माहितीदेखील काही क्लिक्सवर उपलब्ध आहे. अश्म युगातील मानवाच्या हाडांबद्दल, तेव्हाच्या प्राण्यांबद्दल इत्थंभूत माहिती तुम्हाला मिळेल. ‘हाडाच्या’ शास्त्रज्ञांना ही वेबसाइट म्हणजे पर्वणीच आहे ! पण इथे गोष्टी कशा शोधायचा हे मात्र कळलं पाहिजे!

   या स्मिथसोनियनबद्दल वाचलं ना की वेडं व्हायला होतं. तुम्हीही ही वेबसाइट आणि हे यू-ट्यूब चॅनल पाहून वेडे व्हा!
पहा-वाचा
यू-ट्यूब चॅनल- स्मिथसोनीयन चॅनल- https://www.youtube.com/user/smithsonianchannel/featured
 स्मिथसोनियन इन्स्टिट्यूटची वेबसाइट- https://www.si.edu/

Web Title: Awkward! Visit the museum home in America at home online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.