बॅक ऑन ट्रॅक

By admin | Published: October 9, 2014 06:47 PM2014-10-09T18:47:08+5:302014-10-09T18:47:08+5:30

सेटलबिटल झालो, लग्नबिग्नं झाली, मग पुढे? त्याचंही उत्तर सापडलं आणि आम्ही मित्र कॉलेजातल्याच उत्साहानं नव्यानं कामाला भिडलोय.

Back-on-track | बॅक ऑन ट्रॅक

बॅक ऑन ट्रॅक

Next
‘संवेदना ’ ग्रुप स्थापन करुन जेव्हा मित्र कामाला लागले.
 
 
 
कॉलेज संपलं. जो तो आपापल्या आयुष्यात बर्‍यापैकी सेटल झाला. नोकरीबिकरी, लग्नबिग्नं झाली. सगळे मित्र आता फक्त बारसे, वाढदिवसांना भेटू लागले. एनएसएसमध्ये शिकलेली सामाजिक कामांची जाणीव कॉलेजातच राहून गेली. कुठंतरी.  
आमचा मित्र समीरच्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रंगलेल्या मैफलीनं मात्र अचानक टर्न घेतला आणि आम्ही थेट कॉलेज कट्टय़ावर पोहोचलो. एनएसएसच्या माध्यमातून मिळविलेला सामाजिक बांधिलकीचा ‘टच’ रिन्यू झाला. प्रत्येकाला  वाटू लागलं, कॉलेज काळात खूप उपक्रम यशस्वी केलेत. तेव्हा खिशात पैसा नव्हता, अनुभव नव्हता, कुणी मदत करण्यास तयार नव्हतं, पण केवळ इच्छेच्या बळावर बरेच उद्योग केले. कॉलेज सुटल्यापासून ते मागे पडलं.  मात्र बोलता बोलता आम्ही जुन्या ट्रॅकवर आलो हे महत्त्वाचं. संवेदना क्रिएटिव्ह क्लब असं आमच्या ग्रुपचं नामकरण झालं.
सुरूवातीला मनपाच्या ‘ग्रीन अकोला; क्लिन अकोला’ या हाकेला प्रतिसाद देत शहरातल्या मुबलक पाणी असलेल्या भागात वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित केले. दोन वर्षात वाढलेली झाडं आवश्यक सुरक्षा कवच देऊन परिसरातील नागरिकांना दत्तक दिली. ठरावीक कालावधीच्या अंतराने २५-२५ झाडं लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी शेजार्‍यांवर सोपवत, स्वत:ही झाडं जगवण्याच्या योजना करत कामाला लागलो. 
आता आम्ही एक महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी दुर्गम भागात वसलेलं ‘जनुना’ हे गाव दत्तक घेतलं. या गावात मूलभूत सेवा पुरविण्याची योजना आखल. सध्या २५0हून अधिक सक्रिय स्वयंसेवक या उपक्रमात सहभागी आहेत.
गावाचा परिचय व्हावा, गावकर्‍यांशी ओळख व्हावी म्हणून संवेदनानं कपडे वाटपाचा पहिला कार्यक्रम ठेवला. या उपक्रमात आपल्याकडील व आपल्या मित्रांकडे वापरात नसलेले कपडे एकत्र केले. ते स्वच्छ धुवून, इस्त्री करून घेतले आणि जनुन्यात त्याचे वाटप केले. कपडे देताना सांगितलं की, आम्ही काही फार श्रीमंत नाही, जे जमेल ते देतोय. आणि देतोय म्हणजे उपकार नाही, फक्त आमच्या भावना समजून घ्या, आम्ही फक्त मदत करतोय. 
अशा कामांचा फार उपयोग नाही हे आम्हालाही पटलं; पण निदान ओळख तरी झाली गावकर्‍यांशी. पण पुढच्या आठच दिवसात कानावर बातमी आली आमच्या कार्यक्रमाची पुनरावृत्ती झाल्याची. कपडे वाटपाची बातमी जेव्हा वृत्तपत्रामधून छापून आली तेव्हा हिवरखेड नावाच्या गावच्या शाळेनं एक उपक्रम राबविला. शिक्षकांनी पेपरात छापून आलेली बातमी विद्यार्थ्यांना दाखवून विचारलं, आपण असं काय करू शकतो? तर विद्यार्थ्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या अतिरिक्त शालेय वस्तू देण्याची तयारी दर्शविली. या उपक्रमात विद्यार्थी इतके सरसावले की, पेनाच्या दोन पैकी एकेक रिफिलीसुद्धा त्यांनी डोनेट बॉक्समध्ये टाकल्या. अर्धवट लिहून सोडलेल्या नोटबुक, स्केल, पेन्सिली, पाठय़पुस्तके, जुनी दफ्तरं अशा वस्तूंनी अनेक गरजू विद्यार्थ्यांची  ‘निकड’  भागविली.
दिवाळीत आता आम्ही एक तीन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन केलं आहे. शिबिराच्या माध्यमातून ग्रामस्थांची पहिली गरज म्हणून आरोग्य तपासणी,  औषधोपचार शिबिर तसेच आधुनिक शेतीबाबत मार्गदर्शन असे काही उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 
नोकरी-व्यवसायातून आलेल्या शहाणपणाचा उपयोग करून आम्ही कॉलेजच्या काळातल्याच उत्साहानं कामाला लागलोय. अजून काय पाहिजे?
 
- नंदकिशोर चिपडे आपातापा, ता. जि. अकोला.

 

Web Title: Back-on-track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.