बाप्पा लवकर बुद्धी द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 06:30 AM2019-09-12T06:30:00+5:302019-09-12T06:30:07+5:30
जी मंडळं लोकांच्या मदतीला धावतात, त्यांचं कौतुक; पण जे केवळ गर्दी खेचतात त्यांचं काय?
अक्षय सिनकर
नवसाला पावतो, हाकेला धावतो असा हा अमुक-अमुक राजा.
अशी चर्चा आता सर्वत्र दिसते. लोकही रांगा लावून दर्शनाला तासन्तास उभे राहतात. मंडळाची स्पर्धा ठीक आहे हो, पण त्या स्पर्धेत बाप्पाला का घेता, असा प्रश्न मनात येतोच.
लोकमान्य टिळकांनी सर्वाना एकत्रित आणण्यासाठी, सार्वजनिक सलोखा आणि बंधुभाव निर्माण व्हावा म्हणून सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला. लोक एकत्र येतील, उत्सवाचा आनंद घेतील व आपल्या समोरील समस्यांवर तोडगा निघेल असंही असेल त्यांच्या मनात; पण आता तसं काही उरलंय का?
मंडळाकडूनच ‘आमचा गणपती नवसाला पावतो हं..’ अशी वाक्यं हमखास कानी पडू लागतात. एखाद्या गणपतीला चोवीस-चोवीस तास रांग लावून नंतर त्याच साधं दर्शनसुद्धा होऊ नये असं का होत असेल?
अमुकच एक गणपती नवसाला पावतो मग आपला घरचा गणपती आपणच का आणतो? आपण मागितलेलं घरातला गणपती देणार नाही का? मुळात ज्याची मनोभावे पूजा करायची त्याच्याकडेच आपण का मागत राहातो काही ना काही सतत?
देव श्रद्धेचा, भक्तीचा भुकेला आहे. त्याला आपण पैसे आणि सोनं अर्पण करून काय मिळवतो?
अकरा दिवसात मोठं मोठय़ा मंडळांकडे खूप रक्कम जमा होते. सामाजिक भान ठेवून काही मंडळं त्या जमलेल्या रकमेतून सामाजिक उपक्रम राबवले जातात. जसे की रक्तदान शिबिर असो, विद्याथ्र्यासाठी करिअर मार्गदर्शन असो, विविध प्रकारचे व्याख्यान असो अशी असंख्य कामे मंडळांकडून केली जातात. म्हणजे न सांगतादेखील गणपती आपल्यामागे उभा राहतोच की. आता बघाच की, पश्चिम महाराष्ट्रात उद्भवलेल्या पूरस्थितीत जी मदत मंडळांनी व काही सामाजिक संस्थांसह गणपती मंडळांनी केली ते याचेच तर उदाहरण आहेत. जे चांगलं काम करतात, त्यांचा आदर्श घ्यावा. त्या मंडळांचं कौतुक करावं. मात्र केवळ डीजे. आरडाओरडा, नृत्य, दंगा या मंडळांना आपण तरी का वर्गणी द्यावी?
आपणच विचार करायला हवा.