बार्शी ते रिओ
By admin | Published: June 23, 2016 04:44 PM2016-06-23T16:44:43+5:302016-06-23T16:44:43+5:30
टेनिस कोर्टवरच नाही, कोर्टबाहेरचीही आव्हानं हिमतीनं परतवणाऱ्या आणि आता आॅलिम्पिक गाजवायला निघालेल्या एका मुलीची जिद्दी गोष्ट..
बार्शीसारख्या छोट्या गावातली मुलगी, आणि आॅलिम्पिक खेळणार.. तेही ग्लॅमरस, चॅम्पियन सानिया मिर्झाची पार्टनर म्हणून...
- अनेकांचा या बातमीवरच विश्वास बसेना !
लॉन टेनिससारखा महागडा, उंची खेळ आणि त्या खेळात अशी धडक मारणारी मुलगी मुंबई-पुण्यासारख्या मेट्रो सिटीतली नाही, तर बार्शीची आहे. कसं जमलं हे तिला? तिच्या पालकांना?
- असे कुतूहलाचे आणि कौतुकाचे प्रश्न अनेकांना पडले !
आणि म्हणून मग प्रार्थनाच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी, त्यांच्याचकडून तिची गोष्ट समजून घेण्यासाठी थेट बार्शी गाठलं.
तिच्या आईशी, बहिणीशी गप्पा झाल्याच, पण सध्या पॅरिसमध्ये असलेली प्रार्थना त्या गप्पांत आॅनलाइन, तर हैदराबादला असलेले तिचे वडील गुलाबराव ठोंबरे तिकडून लाइव्ह गप्पांत सहभागी झाले !
आणि उलगडत गेली प्रार्थनाच्याच नाही, तर तिच्या आईबाबांच्याही जिद्दीची एक गोष्ट !
बार्शीत पहिल्यांदा टेनिस कोर्टवर उतरलेली प्रार्थना आता रिओत खेळेल तो प्रवास तर या गप्पांनी उलगडलाच, पण तिच्या मेहनतीची आणि चिकाटीची काही उदाहरणंही समोर आली.
ती १६ वर्षांची असताना तिच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती. तब्बल सात महिने दुखापतीमुळे ती टेनिस कोर्टबाहेर होती. महाराष्ट्रातील नंबर १ हे तिचं रँॅकिंग गेलं. या दुखापतीमुळे तिचे पालक चिंतित झाले. पण चिंताबिंता करत न बसता अत्यंत जिद्दीनं या दुखापतीवर मात करत प्रार्थना पुन्हा कोर्टवर उतरली, आणि जी जिंकू लागली ती आता थेट रिओत आॅलिम्पिक गाजवायला सज्ज होईपर्यंत..
पण सोपा नव्हताच हा प्रवास तिच्यासाठीही..
अगदी प्रार्थना राष्ट्रीय पातळीवर खेळत असताना तिनं पुण्या-मुंबईच्या खेळाडूंचा धसकाच घेतला होता. त्यांच्याबरोबर सामना असला की तिच्या पोटात तरी दुखायचं अथवा निराश तरी व्हायची. तो धसका आई-वडिलांसोबतच्या युरोप सहलीने पिटाळून लावला. लंडनमधील एका हॉटेलमधील टेनिस कोर्टवर आईनं तिला तिथल्या ब्रिटिश खेळाडूंबरोबर खेळायला लावलं. त्या सर्वांनाच तिनं हरवलं. तिची आई तिला म्हणाली, ‘तू परदेशातल्या खेळाडूंना हरवतेस, मग पुण्या-मुंबईची काय बात !’
तिथून पुढं तिनं कुणाचाच धसका घेतला नाही.
अशा किती गोष्टी, किती कहाण्या
त्या गप्पांच्ची एक मैफल
पान ३ वर..
प्रार्थना
- राजा माने