बबई
By admin | Published: August 7, 2014 09:26 PM2014-08-07T21:26:00+5:302014-08-07T21:26:00+5:30
का चौकातला नेहमीचाच आणि सरावाचा ट्रॅफिक ज्ॉम आम्हाला एका लघुपटाच्या निर्मितीपर्यंत घेऊन जाईल असं खरंतर कधी वाटलंही नव्हतं
Next
>का चौकातला नेहमीचाच आणि सरावाचा ट्रॅफिक ज्ॉम आम्हाला एका लघुपटाच्या निर्मितीपर्यंत घेऊन जाईल असं खरंतर कधी वाटलंही नव्हतं. चारही बाजूंना साचून राहिलेल्या ट्रॅफिकमधून कशीबशी वाट काढत पुढे जाणारा एका गरीब, काडकुडा हमाल दिसला, त्याच्या हातगाडीवर किमान ३00 किलोचा बोजा होता. वय असेल ७५ पेक्षाही जास्त.
कसं आणि काय असेल या माणसाचं आयुष्य? त्याचं जगणं सांगेल अशी एखादी शॉर्टफिल्म करू, असा विचार मी माझ्या नवर्याला, अमितला सांगितला. त्यालाही वाटलं की शोधून पाहू खरंच असं एखादं आयुष्य. म्हणून मग हातगाडी ओढणार्या ७0 वर्षांच्या म्हातार्या हमालाचा आम्ही शोध घेऊ लागलो.
भेटलं मात्र भलतंच कुणीतरी. जीर्ण नऊवारी साडी. त्यावर मळकट सनकोट. सनकोटच्या खिशात एक साधा मोबाइल फोन. डोक्यावर नॅपकिन. अशा वेषातल्या ‘त्या’ भेटल्या. बबूताई त्यांचं नाव. हातगाडीवरचं २५0 ते ३00 किलोचं ओझं ओढत त्या समोर आल्या. आमच्या द्वारका मामी बबूताईंना म्हणाल्या ‘‘ही माझी सून. हिला तुमच्यावर ‘फिल्म’ बनवायचीए.’’ बबूताई हसल्या द्वारकाबाईची सून म्हटल्यावर नाही तर म्हणता येणार नाही म्हणून बबूताई ‘हो’ म्हणाल्या.
त्यातून आमची शॉटफिल्म बनली. ‘बबई’ तिचं नाव. १४ मिनिटं कालावधी असणार्या या माहितीपटासाठी आम्ही ३ दिवस शूट केलं. बबूताईच्या मागोमाग १0 ते १२ किमी पायी तीन दिवस हिंडलो. त्या काय करतात हे शूट केलं. आम्ही नुस्तं उन्हातान्हात कॅमेरा घेऊन जात होतो तरी आमची दमछाक झाली आणि बबूताई तर हातगाडी ओढत इकडचं सामान तिकडे पोहचवत होत्या. त्यांच्याशी फावल्या वेळात गप्पा मारत त्यांची मुलाखतही आम्ही शूट केली. तीन दिवसाचं काम १४ मिन्टात दाखवायचं म्हणून ३0 दिवस एडिट करणं चाललं होतं. अमितनं ते सारं निगुतीनं एडिट केलं. त्यातून ‘बबई’ नावाची शॉर्टफिल्म साकार झाली. अलीकडेच ‘इंटरनॅशनल डॉक्युमेंटरी अँड शार्ट फिल्म फेस्टिव्हल ऑफ केरळ’ या अत्यंत नावाजलेल्या फेस्टिव्हलसाठी ‘बबई’ची निवड झाली. मी आणि अमित केरळमध्ये दाखल झालो. हा फेस्टिव्हल तुलनेनं खूपच मोठा होता. पाच दिवस सलग चाललेल्या या फेस्टिव्हलमध्ये संपूर्ण देशभरातून अनेक अनुभवी दिग्दर्शकांच्या फिल्म्स् आलेल्या होत्या. पुरुषप्रधान संस्कृतीला आवाहन देणारी, प्रचंड अंगमेहनत करणारी, आत एकटी एकटी असूनसुद्धा खचून न जाता पहाडी जिद्दीनं वाटचाल करणारी ‘बबई’ तिथंही सर्व प्रेक्षकांच्या काळजाला जाऊन भिडली, तेही भाषेचं अंतर न जुमानता. याही महोत्सवामध्ये ‘बबई’ला पहिला पुरस्कार मिळाला. ‘बबईचे कष्ट आम्ही सर्वांपर्यंत पोहचवल्याचं समाधान लाभलं.
- कविता दातीर