सांभाळा रे.

By Admin | Published: August 14, 2014 03:19 PM2014-08-14T15:19:04+5:302014-08-14T15:19:04+5:30

पुणे पोलिसांच्या वतीनं ‘ऑनलाइन तरुणाईशी संवाद’ या विशेष कार्यक्रमाचं आयोजन पुण्यात करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी तरुणांशी साधलेल्या संवादाचा हा संपादित अंश. चालू वर्तमानकाळात देशभक्तीचा एक जबरदस्त डोसच नानानं दिला आणि सांगितलं की, आपल्यातल्या ‘वांड’पणाचं नेमकं करायचं काय?

Be careful | सांभाळा रे.

सांभाळा रे.

googlenewsNext
- नाना पाटेकर
 
तुम्हाला माहिती आहे का, अँटमबॉम्ब आहात तुम्ही एकेक जण! कसली जबरदस्त ऊर्जा आहे तुमच्यात. ती मांडायचं माध्यम शोधलं पाहिजे, नाहीतर तुमची घुसमट निघणार कशी? ती निघत नाही, राग तुंबतो आणि निमित्त मिळालं की, उचलून मारला जातो एक दगड! मग आतमध्ये वाटतं, आहाहा किती छान!! खरंतर तो आपण आपल्या नपुंसकत्वावर, आपल्या षंढत्वावर मारलेला दगड असतो. खरंच सांगतो, आपण सगळेच लेचेपेचे असतो कुठेतरी आतमध्ये. म्हणून गर्दीत सामावत पटकन एक दगड उचलून मारतो. वाटतं निचरा झाला, पण ते खरं नसतं! त्यापेक्षा ‘योग्य’ पद्धतीनं रिअँक्ट व्हायला शिका.
 
सगळ्यांना नमस्कार,
माथुर साहेब त्यादिवशी भेटले, म्हणाले  नाना आपण आपल्या तरुण मुलांशी बोलायला हवं. 
खरंच तुम्ही सगळे मला मुलासारखे आहात, माझा मुलगा मल्हार, त्याच्याचसारखे आहात. 
त्यामुळे आज एका बापाच्या भूमिकेतून मला नेमकं काय वाटतंय तुमच्याशी बोलताना, आनंद वाटतोय खरंतर. म्हणून बोलतोय.
माझं लहानपण मुरुड  जंजिर्‍यामध्ये गेलं. पहिली ते सहावी. मुरुड जंजिरा हा सगळा इलाखा मुसलमान आणि हिंदू वस्तीचा आहे. माझ्या ६४ वर्षांच्या आयुष्यात आजवर तिथे हिंदू आणि मुसलमान अशी कुठलीही भेदाभेदाची गोष्ट घडलेली नाही. दोन्ही मिळून एक समाज म्हणून वावरत राहिले. मी रहात होतो ते घर होतं मियांमद अलींचं. मियांमद अलींच्या दोन बायका होत्या. एक अन्वरी आणि एक नजिरा. अन्विरीची एक मुलगी होती दिलशाद म्हणून. मी तिसरीत होतो, लहानपणी आपल्याला एक छान कोणीतरी आवडत असते. आपली लहानपणीची मैत्रीण. तशी ही दिलशाद माझी लहानपणीची मैत्रीण. आजसुद्धा मी त्या दिलशादला विसरू शकत नाही, माझी ती दिलशाद माझ्या डोक्यात अजूनही तशीच आहे. अन्वरीचा दुसरा मुलगा होता सैफुन. नजिराची दुसरी दोन मुल होती; बाबला, छगन. तिच्या पहिल्या नवर्‍याचा मुलगा होता लियाकत. माझं सगळं जे बालपण आहे ते त्यांच्याबरोबर गेलं. त्यांच्या घरी काही शिजलं की एक वाटी वर आमच्या घरी यायची, आमच्याकडे काही शिजलं की एक वाटी तिथे जायची.
 नेमकं माहिती नव्हतं तेव्हा मुसलमान आणि हिंदू याचा अर्थ काय?  
लपंडाव खेळत असताना मी आणि दिलशाद एकत्र लपायला जाणार एवढंच माहिती होतं.
आजसुद्धा सांगतो, दिलशाद लग्न होऊन अमेरिकेमध्ये कुठेतरी आहे. मला आता या दिलशादला बघायला नाही आवडणार. माझी दिलशाद अशी लहान फुलपाखरासारखी होती. माझ्या डोक्यामध्ये ती तशी आणि तशीच रहावी अशी इच्छा आहे. गंमत अशी असते की, या सगळ्या लहानपणीच्या गोष्टी आहेत. त्या तशा तुमच्या आतमध्ये साठलेल्या असतात. त्यासगळ्या साठलेल्या गोष्टी घेऊन मी मुंबईत आलो. १९६१ साली. त्यावेळची  मुंबई वेगळी होती. मला कुठेही असं वाटलं नाही की धर्म वेगवेगळे आहेत. सगळ्यांना एकमेकांचा आधार होता. सगळ्यांचा एकमेकांवर विश्‍वास होता, सगळ्यांना एकमेकांची गरज होती. बेकरी म्हटली की ती मुसलमानाचीच असली पाहिजे. बिस्किटं मग ती मुसलमानानंच केलेली मी खाणार. मग ती खारी बिस्किटं असतील नाहीतर चिकटलेली सहा सहा बिस्किटं. हे सगळं असं सोपं होतं.
तसं नुकतंच स्वातंत्र्य मिळालं आणि आमचा जन्म झाला.
आमच्या वडिलांनी रक्तपात, विषमता  पाहिली होती ती त्यांना नको वाटत होती. त्यामुळे आमच्यावरचे संस्कार एकमेकांसोबत रहा, एकमेकांना सांभाळून घ्या, प्रेम करा या पद्धतीचे होते. 
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण या स्वातंत्र्यासाठी काहीही दिलेलं नाही. हे सगळं फुकटचं मिळालेलं आहे आपल्याला हे मला सांगण्यात आलं. 
खरंय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी माझ्या आईवडिलांनी काहीतरी गमावलंय, तुमच्याही आजी-आजोबांनी काहीतरी गमावलेलं आहे. आपण मात्र काही दिलेलं नाहीये. त्यामुळे ती सहज फुकट मिळालेली गोष्ट आहे; कदाचित त्यामुळे आपल्याला त्याची किंमत नाहीये. 
आपल्या सगळ्या वाडवडिलांनी कशी काढली असतील ती पारतंत्र्यातली १५0 वर्षं?   
एक दिवस आपल्यावर कुठलंतरी बंधन आल्यावर आपल्या लक्षात येतं की, आपण किती घुसमटले जातोय.  
घुसमट होतेच. माझीही होते. माझं असं की माझ्याकडे एक असं माध्यम आहे की त्याद्वारे मी माझी घुसमट काढू शकतो. 
मी एक नट आहे, मला बोलता येतं, सांगता येतं. माझा एक चित्रपट आहे, ‘क्रांतीवीर’. त्यात मग मी वेगवेगळ्या पद्धतीनं संवाद बोलतो. 
त्यातून माझी भडास काढतो, तुम्ही कशी काढणार? तुम्हाला भडास काढण्यासाठी काहीतरी लागतं. आपली ऊर्जा ही आपली ताकद आहे, ती ताकद कुठेतरी कोंडलेली असते. ती बाहेर काढण्यासाठी मार्ग लागतो. निमित्त लागतं. मग  कुठलीतरी वाईट  गोष्ट घडते,  आपण उसळतो. बसेस जाळतो, दुकानं फोडतो, आतमध्ये कुठेतरी तुंबलेला भाग आहे, तो बाहेर काढतो. तो चुकीचा आहे असा भाग नाही पण जेव्हा मी बस जाळतो तेव्हा मी माझीच बस जाळतो. एखादे दुकान फोडतो तेव्हा माझ्याच भावाचे दुकान फोडतो. 
तसं पहा माझा ज्यावेळी जन्म झाला तेव्हा माझ्या पाठीवर शिक्का कोणताच नव्हता. मी नेमका पाटेकर या घरात जन्मावं याच्यासाठी मी काहीच केलेलं नव्हतं. जन्मलो म्हणून शिक्का बसला मी हिंदू आहे, कदाचित मी शेजारच्या घरात जन्मलो असतो तर मी पेशमाम असतो. तिकडं आणखी कुठे जन्मलो असतो तर गुरिंदर असतो. जन्मानंतर बसलेल्या या शिक्क्यासह जगतो. माझा धर्म ठरवतो मी हिंदू आहे की मुसलमान आहे? ख्रिश्‍चन आहे, की शिख आहे? मग मला समजायला लागल्यानंतर मी माझा धर्म लिहितो,  त्याप्रमाणे  वागायला लागतो. पण खरा माझा धर्म असतो, तो म्हणतो मला प्रेम करायचंय, मला ‘द्यायचयं,’  मी फक्त देऊ शकतो. मला दोन हात आहेत मी खूप कमवू शकतो. हे माझे हात पसरण्यासाठी नाहीत. ‘देण्यासाठी’ आहेत. आणि ते द्यायचं असेल तर मी खूप कमवेन. मला नाही वाटत की माझी ओळख मी काय घालतो, मी कसा दिसतो यावर ठरते. सरतेशेवटी मी काय करतो यावरच माझी ओळख ठरणार, हे उघड आहे.
 आता बोलतोय तर मी तुम्हाला कुणालाही सांगणार नाही की, तुम्ही हे करा करा, हे करू नका. 
तरुणपणात वांडपणा सगळेच करतात, मीही केला. वांडपणा या वयात नाही करणार तर कधी करणार?  खरं सांगतो थोडयाशा कुरापती पाहिजेत, थोडीशी हाणामारी पाहिजे पण दुश्मनी नको. माझी सगळ्यांशी भांडणं आहेत पण खरंच दुश्मनी कोणाशी नाही. 
करा की भांडणं भांडणाला कोण नाही म्हणतंय? पण  आपण धर्माच्या नावाखाली एकमेकांमध्ये तेढ घालायला लागतो, तेव्हा मला असं वाटतं की आपण चुकतोय कुठेतरी. 
माझी मावसबहीण सख्खी बरं का, शशीकला नाव तिचं. तिनं मुसलमान मुलाशी लग्न केलं. तिच्या सख्ख्या भावंडांनी तिला नाकारली. तू मुसलमानाशी लग्न केलंस आमचा तुझा संबंध नाही.
 मी म्हटलं असं का? माझ्या काही लक्षात आलं नाही. शशी माझी आवडती बहीण. मी म्हटलं अरे शशीकला कुठे गेली? आपल्याला अब्बास मिळाला! 
सरतेशेवटी आपण एखाद्या गोष्टीकडे आपण पाहतो कसं हे महत्त्वाचं ना?
आज अब्बास डॉक्टर आहे, शशी डॉक्टर आहे त्यांची मुलं खूप शिकलेली आहेत. त्यांना जे आयुष्य योग्य वाटलं ते आयुष्य ते जगताहेत. 
माझं काय? मी त्यांच्यावर प्रेम करू शकतो का?  तर, हो करू शकतो!
ते माझ्यावर प्रेम करतात का? तर करतात!
 मग अजून काय लागतं जगत असताना ?
 आपण असे किती जगणारोत?
सांगा ना, २५ वर्षाचे झालो, ३0 वर्षाचे झालो अजून किती जगणार? 
उरलेल्या ५0 वर्षांतली २५ वर्षं तर झोपण्यात जाणार! या २५ वर्षांत अजून किती दुश्मनी करणार? अरे प्रेम करायला अपुरी पडणार ही २५ वर्षं!  कशासाठी करायची दुश्मनी? मला असं वाटतं की, मी अशीच शपथ घेईन की मी आयुष्यात एका कोणालातरी वाचवेन, म्हणजे  मारायचा प्रश्नच येत नाही. 
कशासाठी मारायचं? काय गरज आहे? एखादा काहीतरी चुकीचा संदेश येतो फोनवर.
माझ्या शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी लिहिलेलं असतं, ‘माझे’ शिवाजी महाराज इतके नाहीयेत हो लहान की, कुणीतरी काहीतरी लिहिलं म्हणून त्यांची सगळी प्रतिमा डागाळेल. ते तिथे आभाळातच राहणार आहेत, तितकेच मोठे राहणार आहेत. 
कोणाच्यातरी एखाद्या गलिच्छ विकृत डोक्यातून गलिच्छ गोष्ट येते आणि आपण कोणातरी दुसर्‍याच निष्पापाला मारतो, निष्पाप लोकांची घरे जाळतो. 
मला खरंच सांगा हे सगळं करून काय मिळालं?
मला खरंच वाईट वाटतं. कोणाच्यातरी बेकर्‍या जाळून काय मिळालं? माझ्या बसेस आहेत, त्यासाठी मी टॅक्स भरतो. आपण ते जाळून काय करतो?
स्वत:चा धर्म तुमचा तुम्ही ठरवायचा आहे. माझा धर्म कलावंत आहे. मग मी दलित आहे, की ब्राह्मण आहे यानं काय फरक पडतो?
वडील गेल्यावर दुसर्‍या दिवशी मला तीन नाटकाचे प्रयोग करावे लागले.
 करावेच लागले. माझे देणे आहे. तिसर्‍या प्रयोगानंतर मला रडायला वेळ होता. रडलो मी! नाईलाज आहे. काय करणार?
 हे माझं देणं जसं कलावंत म्हणून आहे तसं तुमचं नाही का? 
सभोवताल तुमचा आहे तो तुम्ही सांभाळायचा. मी नाही सांभाळणार.
आजवर मला कुठल्याही बॉडीगार्डची गरज भासली नाही. माझे बॉडीगार्ड तुम्ही असता. मी तुमच्या मध्ये येतो, हजारोंचा मॉब असतो. मला कोणी कधी नाही त्रास दिला. अगदीच दिला तर दिली मुस्काडीत ठेवेन मी. पण सरतेशेवटी सगळे प्रेम करणारेच असतात, एखादाच विचित्र निघतो. म्हणून आपण सगळ्या समाजाला वेठीला धरणं योग्य आहे का? काही मूठभर माणसं असतात राजकारणी, ती तुम्हाला कुठल्यातरी कारणावरून भडकवत असतील तर त्यांची गचांडी धरा की. निष्पाप  लोकांना कशाला त्रास देताय?  आपण एक जाणून घेतलं पाहिजे की इतकी लोकसंख्या आहे आपली. ती लोकसंख्या म्हणजे आपला समाज. अमक्या समाजाची संख्या इतकी, त्या समाजाची तितकी. हे झाले आकडे. पण आपण काय एकमेकांना मारून जगणार आहोत का? शक्य आहे का आपल्याला? एवढुसं रक्त पाहिल्यावर आपल्याला शिसारी येते. मग माणसांचा संहार करून, रक्तपात करून आपण जगू शकणार आहोत का?  स्वत:ला विचारा हा प्रश्न. खरे तर एकमेकांचा आधार वाटायला पाहिजे, विश्‍वास वाटायला पाहिजे आपल्याला. माध्यमं बदलली आहेत, तंत्रज्ञान  आलंय त्यातून तुम्ही खूप जवळ येताय.  तुमची ताकद वाढतेय, हे लक्षात घ्या.
 एक राजकारणी निवडणुकीला उभा राहतो, निवडून येतो, आणि पुढच्या वेळी त्याची प्रॉपर्टी हजारो करोडो रुपयांनी वाढलेली असते. तुम्हाला माहिती नाहीत असे राजकारणी? मी देऊ लिस्ट? मग त्यांना का प्रश्न विचारत नाही? त्यावेळी का गप्प बसता तुम्ही? का नाही त्यांच्या बंगल्यावर जाऊन प्रश्न विचारत की हे एवढं सारं कुठून आणलंत तुम्ही? त्यावेळी काही बोलत नाही आणि हिंसाचाराच्यावेळी कसे रिअँक्ट होता? आपण बोललं पाहिजे, रिअँक्ट झालं पाहिजे पण योग्य ठिकाणी! नेमक्या ठिकाणी बोललात तर त्याचा खूप छान उपयोग होऊ शकतो. 
तुम्ही मत देता रे, तुम्ही निवडून देता ना त्यांना. मग दाखवा ना तुमची ताकद, प्रश्न विचारा, ती खरी तुमची ताकद आहे!
तुम्हाला माहिती आहे का केवढे अँटमबॉम्ब आहात तुम्ही एकेक जण?
 मग तुम्ही कधी बोलणार? हे प्रश्न कधी विचारणार राजकारण्यांना? त्यांना कधी उत्तर द्यायला भाग पाडणार?
 मी एखादा गलिच्छ चित्रपट केला तर तुम्ही पाडता की नाही? तसं या मंडळींना पाडा की! मी जे काही करेल ते चांगलंच केलं पाहिजे, हे ‘चांगलं’ करण्याची जबाबदारी माझ्यावर कुणी टाकली? तुम्ही टाकलीत!  का मला चांगलं, कालच्या पेक्षा आज काही बरं करावं वाटतं, कारण मला जबाबदारी वाटते ते करण्याची!
 मला इथे टिकून राहण्याची इच्छा नाहीये. पण गेली ४२ वर्षं तुम्ही खूप प्रेम केलंत माझ्यावर. त्यात अजून काय पाहिजे मला? पण वाटतंच ना की, ही माझी मुलं माझ्याकरता इतक्या संख्येनं आलेली आहेत. बसायला जागा नाही तर उभं राहून ऐकताहेत!
अजून काय पाहिजे रे? कुठला कोण श्रीमंत आहे माझ्याइतका सांगा ना? याच्यापेक्षा मोठी श्रीमंती काय असते?
 मी असा कुठला विद्वान लागून गेलो. कुठले बोधामृत तुम्हाला पाजणार होतो. पण मी जे काही मोडकंतोडकं बोलेन ते ऐकायला आलात ना तुम्ही?
माझा हा काही नटाचा चेहरा नाही. ४२ वर्षं मी हा चेहरा घेऊन वावरलो. तुम्हीच मान्य केलात हा चेहरा. माझ्यापेक्षा इतकी देखणी मुलं इथे बसलीयेत. मी काय दिसतो त्यांच्यापुढे पण तरी तुम्ही माझं ऐकताय का, तर सरतेशेवटी तुम्ही दिसता कसे हा महत्त्वाचा मुद्दा नाही.
 म्हणताय काय, करताय काय, काय हवंय तुम्हाला हे महत्त्वाचं! 
एक किस्सा सांगतो, माझे वडील माझ्या थोरल्या भावंडांवर जास्त प्रेम करतात असं मला नेहमी वाटायचं. मी चौथीमध्ये असताना नाटकात काम केलं होतं. ते पहायला वडील मुंबईहून मुरुडला आले होते. मी म्हटलं वडिलांचं लक्ष माझ्याकडे वेधण्यासाठी नाटक ही चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून मी नाटक सुरू केलं ते आजतागायत सुरू आहे. माझ्यातली ऊर्जा या माध्यमातून बाहेर आली.  
तसं तुम्हीही तुमचं एक माध्यम शोधलं पाहिजे. तुमच्यातली ऊर्जा तुम्ही मांडली पाहिजे ! नाहीतर तुमची घुसमट निघणार कशी?
 आणि मग तो तुंबलेला राग एकदम बाहेर येतो. निमित्त मिळालं की उचलून मारला जातो एक दगड. मग आतमध्ये वाटतं, आहाहा किती छान. एक काच फुटल्याचा आवाज येतो. खरंतर तो आपण आपल्या नपुसंकत्वावर मारलेला दगड असतो. आपल्या षंढत्वावर मारलेला दगड असतो.
खरंच सांगतो, आपण सगळेच लेचेपेचे असतो कुठेतरी आतमध्ये. म्हणून मी मघाशी म्हणालो ना की, हिंमत करून मंत्र्यांना नाही आपण प्रश्न विचारायला जात, ती हिंमत नाही दाखवत.
पण  गर्दीत सामावत पटकन एक दगड उचलून मारतो. वाटतं निचरा झाला आपल्या रागाचा, पण तो निचरा नसतो, ते षंढत्व असतं.
खरंतर आपण कितीतरी मोठे आहोत. खूप काही कमावणार आहोत.
देश माझ्यासाठी काय करतो हे महत्त्वाचं नाही. मी देशासाठी काय करतो हेही महत्त्वाचं आहे!
 तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवायचा. रस्त्यावर बाहेर पडल्यावर आपण केवळ भारतीय आहोत. कुठलाही धर्म रस्त्यावर येता कामा नये. शिवाजी महाराजांचा जयजयकार मी घरामध्येही करू शकतो. पण शिवाजी महाराजांमधील ऊर्जा घेऊन मी रस्त्यावर यायला पाहिजे. आणि ती ऊर्जा जर माझ्यामध्ये असेल तर अजून काय पाहिजे? त्याच्यासाठी मग नुसतेच झेंडे मिरवण्याची मग काही गरज नाहीये. 
आपल्या सगळ्यामध्ये देव आहे. आपल्यामध्ये तो अंश आहे. त्यामुळे आपली सगळी जबाबदारी टाळून चालणार नाही.  समाजाचं देणं द्यायलाच पाहिजे. उपकार नाही करत आपण. समाजाकडून खूप काहीतरी घेतलेलं आहे आपण. मी जे करेन तेच तुम्ही करा असं नाही, पण  म्मी म्हणतोय त्याकडे लक्ष द्या. मी अमुक करा तमुक करू नका सांगतच नाहीये. कारण काय करायचंय ते तुमचं तुम्हाला माहितीये. 
काय करायचं नाही तेवढं लक्षात ठेवा. बाकी काही नाही. आमच्यापरीनं आमच्या पिढीनं जेवढं करता येईल तेवढं केलं. आता सांभाळणं तुमच्या हातामध्ये आहे. माती टाकणार आहात का त्यात? नाही टाकणार मला माहिती आहे, खात्री आहे! 
या टोनमध्ये मी कधी बोलत नाही. हा वरचा टोन, पण आज का कोण जाणे हा टोन लागलाय. 
 मला खरं तर तुम्ही तसं करणार आहात का? तसं होणार आहे का? असं मला बोलायला आवडतं. पण मघाशी म्हटल्याप्रमाणे हा आकड्यांचा गुणाकार जो आहे ना तो इतका मोठा झालेला आहे की पुण्यासारख्या शहरातही काही अनुचित प्रकार घडू लागलेत. इथंच नाही सगळीकडेच हे थांबायला हवं, थांबवायला हवं.
 आपण सांभाळायला पाहिजे रे एकमेकांना. पैशानं आपण मोठे होत नाही. इथे कुठेतरी तुम्ही उरला पाहिजेत, रुजला पाहिजेत. 
ते रुजणं जे आहे तेच महत्त्वाचं. तुम्ही तसेच रुजाल. खूप मातीतली मुलं आहात तुम्ही. माझ्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्या तुम्ही पूर्ण करणारच आहात, मला खात्री आहे.
सांभाळाल तुम्ही सगळं!
 
 मी उगाच डायलॉग म्हणत नाही, कळलं की नाही? माधुरी समोर आली की मी खरंच हळवा होतो. आणि मग म्हणतो की, ‘कैसे बताए तुम मेरे लिए क्या हो.?’ तुम्ही नसाल एवढे हळवे पण माझ्या वयाची मंडळी होतात हळवी. 
तर असा माधुरीचा चेहरा आठवला की मला हे आपोआप म्हणता येतं, पाठबिठ करावं लागत नाही. ‘कैसे बताए तुम्हे तुम मेरे लिए क्या हो, तुम धडकनों का गीत हो, तुम जीवन का संगीत हो, तुम जिंदगी, तुम बंदगी, तुम रोशनी, ताजगी, हर खुशी, प्यार -प्रित हो, मनमीत हो, आँखो मे तुम, दिल मे तुम..’ तुमच्याही आयुष्यात कुणाचा तरी ‘असा’ चेहरा हवाच. तो चेहरा पाहिल्यानंतर असं संगळं छान, ओघवत आलं पाहिजे. तुम्हीही कोणासाठी तरी ‘असा’ चेहरा बना. आणि तो  
तुम्ही बनाल याची मला 
खात्री आहे !
 
मला जे मिळालंय,
 ते ठेवण्याचा मला अधिकार नाहीये. ते परत समाजाला द्यायला पाहिजे. मी अडाणी,  एक साधा सरळ माणूस आहे. तुमच्यातलाच आहे. मलाही तुमच्या इतकाच राग येतो. मलाही असं वाटतं धरावी गचांडी आणि द्याव्या दोन  मुस्काडीत ठेवून. पण असं करून आपल्या जबाबदार्‍या नाही नाकारता येत. समाजात आपली काही जबाबदारी असते. पोलीस आहेत म्हणून यांच्यावर तुम्ही किती जबाबदारी टाकणार? आणि या खाकी वर्दीच्या आतमध्येही एक माणूसच आहे. त्यांची संख्या किती आहे 
लोकसंख्येच्या तुलनेत? म्हणून मग तुम्हाला सगळ्यांना जबाबदार्‍या उचलायला 
पाहिजेत!
 
मला जे मिळालंय,
 ते ठेवण्याचा मला अधिकार नाहीये. ते परत समाजाला द्यायला पाहिजे. मी अडाणी,  एक साधा सरळ माणूस आहे. तुमच्यातलाच आहे. मलाही तुमच्या इतकाच राग येतो. मलाही असं वाटतं धरावी गचांडी आणि द्याव्या दोन  मुस्काडीत ठेवून. पण असं करून आपल्या जबाबदार्‍या नाही नाकारता येत. समाजात आपली काही जबाबदारी असते. पोलीस आहेत म्हणून यांच्यावर तुम्ही किती जबाबदारी टाकणार? आणि या खाकी वर्दीच्या आतमध्येही एक माणूसच आहे. त्यांची संख्या किती आहे 
लोकसंख्येच्या तुलनेत? म्हणून मग तुम्हाला सगळ्यांना जबाबदार्‍या उचलायला 
पाहिजेत!
 
तुम्ही म्हणता, 
किती छानपैकी नाना पाटेकर डायलॉग म्हणतात नाही रे बाबा डायलॉग नाही. घुसमट असते सगळी. इथे पोटाच्या बेंबीपासून येतं सगळं. रडायचं असतं, तेव्हा मी नाही खोटं रडत. मला नाही ग्लिसरीन घालावं लागत डोळ्यात. कारण आतमध्ये खूप काही तुंबलेलं असतं, घुसमटलेलं असतं. बाहेर येताना ते डोळ्यावाटे येतं. 
काय करणार सांगा, इतकं सगळं अवतीभोवती चाललेलं असताना, शांत राहता येईल का? 
ज्यांचे डोळे खरंच कोरडे राहतात 
ती कमाल माणसं!
 
साला
 एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है’. 
काय करणार? सुबह घर से निकलो, 
भिड का हिस्सा बनो. रात को घर जाओ, दारु पिओ, बच्चे पैदा करो. 
सुबह तलाख, फिर मर जाओ. 
क्या करे साला 
एक मच्छर आदमी को’ 
 
 
(शब्दांकन : 
लक्ष्मण मोरे)
 

 

Web Title: Be careful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.