सावधान- अ‍ॅप्स आर Killing!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 06:00 AM2018-11-29T06:00:00+5:302018-11-29T06:00:05+5:30

ना कामाची चिंता, ना अभ्यासाची पर्वा, ना मित्र-मैत्रिणींमध्ये गप्पा, ना कोण काय सांगतंय याकडे लक्ष; सतत डोळ्यांसमोर एक स्क्रीन उघडलेला, त्यावर नव्याकोर्‍या वेबसिरीजचे एपिसोड्स नाहीतर एखादी पोर्न क्लीप!! रात्र असो, दिवस असो, भूक लागलेली असो, परीक्षा आलेली असो; डोळ्यांसमोर तेच ! - नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम, हॉटस्टार नाहीतर त्यातलंच काहीतरी! - हे असं झालंय तुमचं? ही आहे एका नव्या व्यसनाची सुरुवात!

beware- apps are making you addict & its killing! | सावधान- अ‍ॅप्स आर Killing!

सावधान- अ‍ॅप्स आर Killing!

Next
ठळक मुद्देवेबसिरीजच्या व्यसनाचा फास, तरुण मुलांच्या जगात नवीन व्यसन बळावतंय!

मुलाखत-संकलन-शब्दांकन - स्नेहा मोरे

प्रसंग -1: -
23 वर्षाचा तरुण. अचानक कॉलेजला जाण टाळू लागला. पहिल्यांदा रॅगिंगपासून ते थेट प्रेमप्रकरण अशा सर्व शक्यता पडताळल्यानंतर हे प्रकरण भलतंच असल्याचं पालकांच्या लक्षात आलं. सुशिक्षित, उच्च मध्यमवर्गीय कुटुंब असल्यानं अर्थातच घरात त्या तरुणाची वेगळी बेडरूम होती. त्यामुळे रात्रंदिवस आपल्या खोलीत हा तरुण केवळ नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, हॉटस्टार यासारख्या अ‍ॅप्सवर सर्फिग करायचा. 24 तास, बर्‍याचदा रात्री न झोपताही तो केवळ या अ‍ॅप्सवरील सिरीज पाहत बसायचा. दुर्दैवाने हे व्यसन असल्याचं कळायला पालकांना सात महिने लागले, तोर्पयत हा तरुण पुरता त्यात अडकला होता. त्या तरुणावर आता इस्पितळात मानसोपचार विभागात उपचार सुरू आहेत.
****
प्रसंग-2 
15-16 वर्षाच्या मुलीला आईनं दूध तापवायला सांगितलं. त्याप्रमाणे तिनं ते केलंही. मात्र दूध गरम करायला ठेवल्यानंतर हॉटस्टारवर शो पाहत तिथंच उभी असतानाही ती दुधाकडे पाहणं पूर्णपणे विसरून गेली. ते दूध उतू गेलं, भांडं जळालं, धूर पसरला मात्र इतकं होऊनही त्या मुलीला काहीच कळलं नाही. नाकात वासही गेला नाही. कारण ती मोबाइलमध्ये यू टय़ूबवर वेबसिरीज पाहण्यात दंग होती. 
- तिच्याबाबतीत हे असं नेहमी होतं. मोबाइल हातात आला की बाकी सगळं ती विसरून जाते. घरातल्याच काय बाहेरच्याही माणसांशी बोलणं बंद झालं. हे प्रकरण गंभीर होतंय हे पालकांनी ओळखलं आणि आता गेली अडीच र्वष तिच्यावर मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचार सुरू आहेत. 

***
प्रसंग-3
27-28 वर्षाची नवविवाहिता. तिला वेबसिरीज, यू टय़ूब, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, नेटफ्लिक्स या सगळ्याची भयंकर आवड होती. मात्र लग्नानंतर रोज रात्री या सगळ्या सर्फिगवर नेटकंटेण्ट पाहिल्याशिवाय तिला झोप लागत नव्हती. त्यामुळे नवर्‍याची चिडचिड व्हायची. याच कारणामुळे त्यांच्यात शारीरिक संबंधही आले नव्हते. त्यामुळे या सगळ्याचा त्यांच्या नात्यावर परिणाम झाला. बर्‍याचदा याची जाणीव करून देऊनही सवय सोडणं तिला जमत नव्हतं. अखेर लग्न मोडण्यार्पयत सर्व गेलं. मात्र अखेरची संधी म्हणून मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्याचं ठरलं. गेले 4-5 महिने तिच्यावर मुंबईतील वांद्रे येथील क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत.
***
गेल्या काही वर्षात मोबाइल व्यसन वाढलं, ही बाब आता थेट इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्राच्या आरंभार्पयत येऊन पोहोचली आहे. अगदी सुरुवातीला केवळ एक-दोन तासच मोबाइल, इंटरनेट वापरणारे कधी त्याच्या आहारी जातात हे त्यांनाच कळत नाही. वर्तनात्मक व्यसनात अडकलेल्यांना विरोध केल्यास त्यांच्यात वेगळ्या प्रकारची लक्षणं दिसून येतात. त्यांना ‘विड्रॉल सिम्प्टम्स’ असं म्हणतात. त्यात मग चिडचिड करणं, दुर्‍खी राहाणं, एकलकोंडे होणं, कशातच मन न रमणं यापासून सुरुवात होते. 
इंटरनेट व्यसनात गुरफटलेली तरुणाई खर्‍या सामाजिक संबंधांपासून,  संवादापासून दुरावलेलीच राहाते. कौटुंबिक नातेसंबंधांवर परिणाम होतो. या सर्व सामाजिक एकलकोंडेपणाचा परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतो. वास्तवाशी नातं तुटल्याने वा कमी झाल्यानं ही मुलं सायकोसिस, स्किझोफ्रेनियाची बळी ठरू शकतात. लैंगिक दुरवर्तनाचे प्रशिक्षण संबंधित इंटरनेट साइट्स प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे देतात, ज्यातून आवेगावर नियंत्रण नसणं, विभिन्न लिंगी व्यक्तींविषयी हवंसं वाटणं वगैरे समस्या उद्भवतात. अशी मानसिकदृष्टय़ा अशक्त झाल्याने पुढे जाऊन आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलतात. इंटरनेट व्यसन हे कुमारवयीन मुलांच्या आत्महत्येला कारण ठरू लागलं आहे.

सातत्याने स्क्रीनसमोर राहिल्याने डोळ्यांवर परिणाम होतो, जेवणाकडे दुर्लक्ष झाल्यानं वजन कमी होते किंवा स्क्रीनकडे पाहात अति खाल्ल्यानं वजन वाढते, पाठीची दुखणी उद्भवतात, तर स्मरणशक्ती कमी होते, एकाग्रता नष्ट होते, हे झालं मानसिक नुकसान. मात्र त्याचबरोबर अशा व्यक्तींचं सामाजिक जीवनही विस्कळीत होतं. वय वाढल्यावर थोडावेळ स्वतंत्रपणे, पण आपण घरात असताना वा शेजारी बसून एकत्रपणे इंटरनेट एन्जॉय करणं सुरू केल्यास मैत्रीच्या नात्यातून नकळत नियंत्रण ठेवता येतं. नियंत्रण ठेवताना त्यांना या इंटरनेटच्या कोलितपणाची म्हणजेच दुष्परिणामांची माहिती करून देणं, तसंच त्या गेम्सविषयी, इतर सोशल साइट्सविषयी चर्चा करणं, त्यातील व्हच्यरुअल संबंध यातील फरक समजावणं ही कामं कौशल्याने पालकांनी करणं जरूरीचं आहे. शाळेतील शिक्षकांनीही विद्याथ्र्याना कॉम्प्युटर शिकवताना वरील गोष्टी कल्पकतेने, कौशल्याने केल्यास फरक पडू शकतो. 
थोडं वय मोठं झाल्यावर शाळेत समुपदेशकांनी व घरात पालकांनी योग्य लैंगिक शिक्षण दिल्यास पोर्नोग्राफीचे दुष्परिणामही  टाळता येतील!
पण सतर्क राहाणं गरजेचं आहे.

- डॉ. शुभांगी पारकर 
(केईएम रुग्णालयाच्या मानसोपचार विभागाच्या प्रमुख)

*****


 

नेटफ्लिक्स व्यसनाचा पहिला रुग्ण ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात आढळला. देशातील नेटफ्लिक्सच्या व्यसनाला बळी गेलेला पहिला रुग्णही बंगळुरू येथे सापडला होता, त्याच्यावरही उपचार सुरू आहेत. त्यामुळे भविष्यात स्मार्टफोन्सवरील या स्ट्रीमिंग अ‍ॅपच्या व्यसनाचा धोका अधिक संभावण्याची चिन्हं आहेत.

आयएमआरबी सव्र्हे 2011 नुसार मोबाइल वापरणार्‍या दर 5 भारतीयांपैकी एकाला आपल्या फोनवर अ‍ॅडल्ट कंटेण्ट हवा असतो. दिल्लीच्या एका रुग्णालयाने केलेल्या सर्वेक्षणानुसार दर दिवशी 47 टक्के विद्यार्थी पोर्नबद्दल बोलतात. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्यूरोच्या अहवालानुसार सायबर गुन्ह्यांमध्ये पोर्नचा क्रमांक पहिला आहे.

नव्या स्ट्रीमिंग व्हिडीओ अ‍ॅपच्या व्यसनामध्ये तरुणाई गुंतत जाण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यात अत्यंत कमी पैशात चांगला कंटेण्ट बसल्या जागी पाहता येतो, शिवाय त्याही पुढे जाऊन आता एकच सबस्क्रिप्शन चार मित्र-मैत्रिणींमध्ये शेअर करून हे अ‍ॅप्स वापरता येतात. तरुणाईच्या मनातील नेमके विषय हेरून या अ‍ॅप्सवर लक्षवेधी कंटेण्ट तयार केला जातो. त्यामुळे रोटी कपडा मकान आणि इंटरनेट या चार जीवनावश्यक गरजा बनत चालल्या आहेत.


नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, वूट, हॉटस्टार, सोनी अ‍ॅप अशा पद्धतीने व्हिडीओ पाहणार्‍या सर्वानाच हे व्यसन जडतं असं होत नाही. या पद्धतीचे व्यसन असल्यास त्या व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व, विचारसरणी आणि कौटुंबिक पाश्र्वभूमी लक्षात घेतली पाहिजे. शिवाय नेमकं कोणतं कारण व्यसन जडण्यास कारणीभूत ठरलं आहे, हे शोधलं पाहिजे. एखाद्या घटनेमुळे अशा पद्धतीचे व्यसन लागलं आहे की नाही याची तपासणी करायला लागते. शिवाय या व्यसनापूर्वी बेरोजगारी, ब्रेकअप, कौटुंबिक समस्या, नैराश्य अशी कोणती स्थिती आहे का याची पडताळणी करावी लागते. यानंतर औषधोपचार, समुपदेशन वा अ‍ॅप वापरावर मर्यादा अशी उपचारपद्धती असते. या सगळ्या प्रक्रियेत अ‍ॅप पाहण्याच्या वापरावर मर्यादा घातल्यास ती व्यक्ती कशा पद्धतीने रिअ‍ॅक्ट करते हेदेखील लक्षात घेतले पाहिजे.

- डॉ. सागर मुंदडा 
मानसोपचारतज्ज्ञ

 

Web Title: beware- apps are making you addict & its killing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.