इफ्फीत भर दुपारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 05:20 PM2018-11-15T17:20:11+5:302018-11-15T17:20:46+5:30

जळगाव जिल्ह्यातील पारोळ्याचा स्वप्निल. नाटक-सिनेमाचं वेड जबरदस्त. मग त्यानं फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये शिकायचं ठरवलं. आणि एका फिल्मनं त्याला राष्ट्रीय पुरस्कारार्पयत पोहचवलं.

bhar dupari short film selected for IFFI | इफ्फीत भर दुपारी

इफ्फीत भर दुपारी

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ अर्थात  ‘इफ्फी’च्या  नॉन फिचर सेक्शनमध्ये ‘भर दुपारी’ची निवड करण्यात आली आहे.

 - माधुरी पेठकर

पेपरमध्ये रोज दिसणार्‍या, व्हॉट्सअ‍ॅपवरून फिरणार्‍या रोजच्या हिंसक बातम्यांनी स्वप्निल कापुरे हा तरुण अस्वस्थ व्हायचा. स्वप्निलला वाटायचं की, अशा हिंसक घटना घडल्यानंतर त्या कुटुंबाचं काय होत असेल?  त्या कुटुंबासाठी तो आघात किती भयंकर असेल. या अस्वस्थतेला वाट करून देण्यासाठी स्वप्निलने ‘भर दुपारी’ ही शॉर्ट फिल्म तयार केली. एका मध्यमवर्गीय जोडप्याच्या सरळ साध्या आयुष्यावर एक घटना कशी परिणाम करते याचं चित्रण करणारी ही फिल्म. या शॉर्टफिल्मला 2017 च्या नॉन फिचर कॅटेगिरीत ‘बेस्ट फिल्म’ म्हणून राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. आणि आता नुकतीच या फिल्मची गोव्यातल्या आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी निवड झाली आहे. ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ अर्थात  ‘इफ्फी’च्या  नॉन फिचर सेक्शनमध्ये ‘भर दुपारी’ची निवड करण्यात आली आहे.
एका सुखी संसारात येणार्‍या भयंकर वादळाचं चित्र ‘भर दुपारी’ या शॉर्ट फिल्ममधे स्वप्निल कापुरेनं चित्रित केलं आहे. 15 मिनिटांच्या मर्यादित आवाक्यात हे नाटय़ बसवणं स्वप्निलसाठी आव्हानच होतं; पण स्वप्निलला प्रयोग करून बघायचा होता. काय शक्य काय अशक्य हे चाचपडून बघायचं होतं.  फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’ या संस्थेत फिल्म डिरेक्शनचा अभ्यास करणार्‍या स्वप्निलला प्रयोग करण्याची संधी तर मिळालीच शिवाय प्रयोगातली मोकळीकताही अनुभवता आली. स्क्रिप्टपासून कलाकारांकडून अभिनय करून घेण्यार्पयत प्रत्येक टप्प्यावर स्वप्निलनं त्याच्या मनातले प्रयोग करून बघितले. 
जळगाव जिल्ह्यातील पारोळ्याचा असलेला स्वप्निल. घरची परिस्थिती अगदीच बेताची. गावाकडे वडील शिवणकाम करतात. स्वप्निलनेही काही काळ ते काम केलं. ते काम करता करता केमेस्ट्रीत बीएस्सीची डिग्री घेतली. वडिलांना वाटायचं जगण्यासाठी पगार देणारी नोकरी महत्त्वाची; पण लहानपणापासून नाटय़वेडा असलेल्या स्वप्निलला केमेस्ट्रीतल्या डिग्रीतून आपल्या करिअरचं सूत्र काही मांडता येत नव्हतं. त्यानं वडिलांकडून वेळ मागून घेतला आणि आयुष्यात एक प्रयोग करण्याचं ठरवलं. एनएसडीत जाऊन नाटकाचे धडे गिरवण्याचं स्वप्न असलेल्या स्वप्निलनं पैशाअभावी आपला मोर्चा फिल्म मेकिंगकडे वळवला. आणि या क्षेत्रातलं नाटय़ त्याला गवसलं. 
 भर दुपारी ही शॉर्ट फिल्म विविध चित्रपट महोत्सवातून दाखवली जात आहे. लवकरच ती यू टय़ूबवरही उपलब्ध होणार आहे.


 

Web Title: bhar dupari short film selected for IFFI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.