बॉण्ड! जेम्स बॉण्ड!!
By admin | Published: June 1, 2017 11:03 AM2017-06-01T11:03:25+5:302017-06-01T11:03:25+5:30
नव्या बॉण्डचा शोध सुरू झालाय, काय सांगावं यापुढे जेम्स नाही तर ‘ती’ जेमी बॉण्डही असेल कुणी !
Next
>- अनघा पाठक
गेल्या ५५ वर्षांत बॉण्ड बदलला. त्याच्या मैत्रिणी बदलल्या. बॉण्डपटातलं स्त्रियांचं चित्रणच नव्हे, तर त्यांच्या विषयीचा दृष्टिकोन बदलला.बॉण्ड ज्यांच्याशी लढतोय ते घटकही बदलले. रशियन आणि त्यानंतर चायनीज कम्युनिस्टांशी लढणारा बॉण्ड, तेलसम्राट, भ्रष्ट कॉर्पोरेट्स, मीडिया बॅरॉन्सशी लढायला लागला आणि आता तर तो धार्मिक दहशतवाद्यांशी लढताना दिसतोय. बॉण्ड असा बदलला..कारण जग बदलतंय!
अस म्हणतात की सिनेमात जे दाखवलं जातं त्याचा आणि समाजात जे घडत असतं त्याचा जवळचा संबंध असतो. इतका जवळचा की ते दोन्ही एकमेकांचे प्रतिबिंब वाटावेत. त्यामुळे या दोन्ही घटकांनी एकमेकांवर प्रभाव टाकणं आणि काहीवेळेला एकमेकांच्या ढाच्यात आमूलाग्र बदल घडवून आणणं ही स्वाभाविक गोष्ट. चित्रपट समाजावर कसे प्रभाव टाकतात, लोकांच्या आयुष्यात कसे बदल घडवून आणतात यावर बराच अभ्यास झालेला आहे आणि याची भरपूर उदाहरणंही देता येतील.
पण याच्या उलट घडण्याची उदाहरणं किती?
शक्यता असते. त्याचा एक सणसणीत अपवाद म्हणजे बॉण्ड, जेम्स बॉण्ड!
त्याच्या आगमनापासून गेली ५५ वर्षे फॅन्सच्या मनावर तो अधिराज्य गाजवत आहे. त्याची मधेच आठवण होण्याचं कारण म्हणजे ही व्यक्तिरेखा सर्वाधिक काळ भूषवणाऱ्या अभिनेत्याचं, रॉजर मूर यांचं अलीकडेच झालेलं दु:खद निधन. सर रॉजर मूर यांनी ही व्यक्तिरेखा सात चित्रपटांमध्ये साकारली अणि तीही त्यांच्या खास शैलीत. किंबहुना ही व्यक्तिरेखा वाट्याला आलेल्या प्रत्येक अभिनेत्याने ती एका विशिष्ट शैलीत साकारली आणि त्या-त्या व्यक्तिरेखेला भोवतालच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीची जोड दिली.
गेल्या ५५ वर्षांत बॉण्डचं ढोबळ स्वरूप तसंच कायम राहिलं, जसं त्याचा मानस पिता आणि बॉण्ड कथांचा लेखक इयान फ्लेमिंग याने सर्वप्रथम त्याच्या पुस्तकात रेखाटलं होतं. पण वर वर सारख्या वाटणाऱ्या या व्यक्तिरेखेने एवढ्या मोठ्या कालखंडात अनेक लहान-लहान बदल आत्मसात केले.
बॉण्डपटांमध्ये गेल्या काही वर्षांत झालेला मोठा बदल म्हणजे यातील स्त्रियांचे चित्रण. सुरुवातीला मादक दिसणं, आपल्या क्रूरतेचं वा निर्बुद्धपणाचं व त्याबरोबरीने आपल्या शरीराचं वारेमाप प्रदर्शन घडवणं, आणि मुख्य म्हणजे बॉण्ड म्हणेल तिथे व म्हणेल तेव्हा त्याच्याशी सेक्स करणं ही तत्कालीन बॉण्ड गर्ल्सची (पक्षी नायिका) विहित कर्तव्ये होती. जसजशी समाजात स्त्री-पुरु ष समानता रुजत गेली आणि कदाचित स्त्री दर्शक आपण आता घालवून बसू की काय या भीतीपोटी बॉण्डपटांमधलं स्त्रियांचं चित्रण बदलत गेलं. पिअर्स ब्रॉस्ननच्या ‘टुमारो नेव्हर डाइज’मध्ये मिशेल येऊह ही व्यक्तिरेखा बॉण्ड सोडूनही आपल्याला आयुष्य, मिशन आणि अस्तित्व आहे हे प्रखरपणे दाखवते.
डॅनियल क्र ेगच्या बॉण्ड गर्ल्स तर याहून एक पाऊल पुढे.
साठ आणि सत्तरच्या लेस्बियन असणाऱ्या पुसी गलोरला सेक्स करायला भाग पाडणारा (शॉन कॉनरी) आणि सेक्सनंतर स्त्रीवरच बंदूक रोखून तुला सेक्सच्या आधी मारलं असतं तर काय मजा असं म्हणणारा (रॉजर मूर) बॉण्ड एकविसाव्या शतकात मात्र स्वत:च प्रेमात पडतो.
कॅसिनो रोयालच्या व्हेस्पर लिंडच्या आठवणी बॉण्डला (डॅनियल क्र ेग) भुतासारख्या छळत राहतात. ‘स्कायफॉल’मध्ये बॉण्ड आणि त्याची बॉस एम यांच्या नात्याचे काही छुपे कंगोरे समोर येतात. पिअर्स ब्रॉस्ननच्या काळात एम म्हणून स्त्री व्यक्तिरेखेचा (ज्युडी डेन्च) समावेश जरी झाला असला तरी ब्रॉस्ननचा बॉण्ड आणि ज्युडीची एम यांच्यातील नातं हे कायम एक खोडकर मुलगा आणि एक कडक क्लासटीचर एवढंच राहतं. डॅनिएलच्या काळात ते पहिल्यांदा पुढे जाऊन आई-मुलगा या पातळीवर येतं. एमच्या काळजीने जेव्हा बॉण्ड चिंताग्रस्त होतो तेव्हा वाटतं की हा खोडकर शाळकरी पोरगा आता जबाबदार पुरु ष झाला आहे. या बॉण्डला फक्त त्या गोष्टीसाठी लागणाऱ्या मैत्रिणी नसून आई-बहीण अशा नातलग स्त्रियाही आहेत. अजून एक सांगायचं म्हणजे ज्युडी डेन्चची एम ही व्यक्तिरेखा खऱ्या आयुष्यातल्या टक - 5 या ब्रिटिश इंटेलिजन्सची हेड असणाऱ्या स्टेला रिमिंग्टनवर बेतली आहे. समाजातले बदल बॉण्डपटामध्ये उतरण्याचं हे आणखी एक उदाहरण.
नुसतं स्त्रियांचं चित्रण किंवा त्यांच्या विषयीचा दृष्टिकोन नव्हे, तर बॉण्ड ज्यांच्याशी लढतोय ते घटक, त्याच्या आसपास असणाऱ्या राजकीय विचारसरण्या आणि इझम्सदेखील बॉण्डपटांमधे कालानुरूप बदलत आहेत. त्यामुळे फ्रॉम रशिया विथ लव्ह पासून रशियन आणि त्या नंतर चायनीज कम्युनिस्टांशी लढणारा बॉण्ड, नंतर तेलसम्राट, भ्रष्ट कॉर्पोरेट्स, मीडिया बॅरॉन्स आणि आता आता दहशतवाद्यांशी लढताना दिसतोय. मुळात ज्या उद्देशासाठी बॉण्डची निर्मिती केली गेली होती (कम्युनिस्ट राजवटींना विरोध करणे) त्याचा आता मागमूसही बॉण्डपटांमध्ये दिसत नाही. कम्युनिस्ट राजवटींची जागा आता धार्मिक दहशतवादाने घेतली आहे आणि हेदेखील काळाला साजेसच म्हणायचं.
जी गोष्ट राजकीय विचारसरणीची तीच गोष्ट तंत्रज्ञानाची. क्यू, टक-6 च्या रिसर्च आणि अॅनालिसिस विंगची प्रमुख असणारी ही व्यक्तिरेखादेखील कालपरत्वे बरीच बदलली. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात बॉण्डचा फॅन असणारा, थोडासा विक्षिप्त आणि बॉण्डला वेगवेगळी आयुधं देणारा मध्यमवयीन क्यू आता पंचविशीचा हॅकर झालाय. स्कायफॉलमध्ये पहिल्यांदा दिसलेला हा क्यू (बेन व्हीशॉ) जेम्स बॉण्डपेक्षा वयाने बराच लहान आहे आणि तरीही त्याच्यापेक्षा हुशार. वयाने लहान आहे म्हणून त्याला येड्यात काढायचा प्रयत्न करणाऱ्या बॉण्डला तो पहिल्याच भेटीत वाजवतो.. जे करायला तुझ्या बंदुकीला एक वर्ष घालवावं लागेल ते मी माझ्या कॉम्प्युटरवर एका क्लिकवर करू शकतो. त्या एक क्लिकमध्ये जगाला वेठीस धरायची ताकद आहे. साहजिक आहे जिथे एक रॅन्समवेअर सलग तीन दिवस मोठ्या मोठ्या राष्ट्रांची अर्थव्यवस्था जेरीस आणू शकतो, तिथे क्यू जे म्हणतो ते न पटायची बातच नच्छो!
सध्याचा बॉण्ड डॅनियल क्र ेग आता रिटायर व्हायचं म्हणतोय.
म्हणजे आता लवकरच नवा बॉण्ड शोधावा लागणार.
हा बॉण्ड एखादा कृष्णवर्णीय किंवा आशियाई असला तर?
हरकत काय आहे?
आता असंही लंडनचा महापौर पाकिस्तानी वंशाचा सादिक खान आहे; मग पुढचा बॉण्ड कोरियन किंवा मलेशियन असायला काय हरकत आहे?
असं झालंच तर हा बॉण्डच्या ५५ वर्षांतल्या स्थित्यंतराचा आणखी एक मैलाचा दगड असेल.
आणि बॉण्ड, जेम्सच्या ऐवजी जेनी बॉण्ड असेल तर?
शक्य तर काहीही आहे..
समाजात आलेल्या स्थित्यंतरामुळे सिनेमा, त्यातली पात्रं, त्यांची विचारसरणी बदलते? हे शोधणं थोडंसं कठीण, कारण आलेला प्रत्येक चित्रपट हा एकाच काळाचे प्रतिनिधित्व करत असतो. सहसा असे चित्रपट, त्यातले विषय, पात्रं यांचं आयुष्य तेवढ्या एका काळाकरताच मर्यादित असतं.
याला अपवाद फक्त एकच.. Frnachise सिनेमे.
म्हणजे असे सिनेमे त्यातल्या प्रमुख व्यक्तिरेखा कायम राहतात, फक्त काळाप्रमाणे कथा आणि व्यक्तिरेखा सादर करणारे कलाकार बदलतात. आपण पाहतो ते सिक्वल, प्रीक्वल याचं पठडीतले. तरीही समाजातले मोठ्या प्रमाणावरचे आणि मोठ्या कालखंडात झालेले बदल हे चित्रपट दाखवू शकत नाही, कारण या चित्रपट Frnachise चे आयुष्यही साधारण ५ ते १० वर्षंच असतं.