त्याला विचारा..
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 07:55 AM2018-04-05T07:55:03+5:302018-04-05T07:55:03+5:30
सोशल मीडियात आणि प्रत्यक्षातही धर्मावरून किती विखार, किती शाब्दिक युद्ध पेटतात, ते का?
रिचर्ड डॉकिन्स
‘देव’ आणि ‘धर्म’ म्हटलं तर खरं शांत, शुद्ध, काहीतरी चांगलं, पवित्र असं वाटलं पाहिजे, नाही? पण हे शब्द आता ऐकले की अनेकदा आपल्या मनात नकारात्मक भावना का उमटतात? कदाचित व्यक्तिश: छान, प्रसन्न वाटतं प्रार्थनेनं; पण समाजात विशेषत: सोशल मीडियात तर धर्म, देव याविषयी बरीच नकारात्मकता जाणवते. सतत लोक एकमेकांच्या शाब्दिक जिवावरच उठतात. हे असं का? याचा विचार केलाय आपण कधी?
अशा बऱ्याच गोष्टींबद्दल बेसिकमध्ये विचार करायला लावणारा लेखक म्हणजे रिचर्ड डॉकिन्स. असा लेखक मोठ्या क्लिष्ट कल्पनाही अतिशय सोप्या पद्धतीनं समजावून सांगू शकतो. त्यामुळे त्यांची पुस्तकं वाचताना मजा येते; पण नंतर विचार करायला लागलो की मात्र डोक्याला मुंग्या येतात.
रिचर्ड डॉकिन्सचं असंच एक पुस्तक म्हणजे ‘गॉड डिल्युजन’. त्यांच्या मते, आज जगात ज्या ज्या काही हिंसक घटना घडल्या आहेत, त्या धर्मामुळे नाही, तर धर्माच्या नावाखाली घडल्या, घडवण्यात आल्या आहेत. मी स्वत: निरीश्वरवादी असलो तरीही मला या सृष्टीबद्दल अतोनात प्रेम आहे. जगाची निर्मिती, मानवाचं असणं, हे मला अचंबित करतं. त्यामुळे याचं संवर्धन करणं हाच माझा धर्म, असं त्याचं मत.
२००६ साली प्रकाशित झालेलं हे छोटंसं पुस्तक आपल्याला खूप मोठ्या प्रश्नांबद्दल मूलभूत विचार करायला लावतं. तुम्हाला हे इंग्रजी पुस्तक वाचायचा कंटाळा आला असेल, तर यू ट्युबवर ‘रिचर्ड डॉकिन्स - गॉड डिल्युजन’ एवढं सर्च करा. त्यात तुम्हाला डॉकिन्स यांचा एक इंटरव्ह्यू आणि या पुस्तकाबद्दल त्यांनी अमेरिकेतील एका महाविद्यालयात दिलेलं भाषण ऐकायला मिळेल.