बाउन्सर समीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 10:45 AM2018-05-31T10:45:45+5:302018-05-31T10:45:45+5:30

ठाण्यातली पहिली महिला बाउन्सर अशी तिची ओळख. कराटे चॅम्पियन असणारी समीक्षा दिवसा जिम ट्रेनर म्हणून काम करते, आणि रात्री बाउन्सर असते. ...हे कसं जमतं तिला?

Bouncer Review | बाउन्सर समीक्षा

बाउन्सर समीक्षा

Next

- अश्विनी भाटवडेकर

काळी जीन्स, काळा टी-शर्ट, चेहऱ्यावर करारी भाव अशा वेशभूषेत समीक्षा कांबळे आपल्या कामाच्या ठिकाणी येते. तिथे तिला पाहून अनेकांच्या भुवया उंचावत असतील, क्वचित काही कमेंट्सही पास होत असतील. पण समीक्षाला आता या नजरांची सवय झालीय. सुरुवाती सुरुवातीला वाटणारं या नजरांचं अवघडलेपण आता संपलंय. आता तिच्या कामानं तिनं आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
समीक्षा कांबळे. ठाण्यातील पहिली लेडी बाउन्सर. ज्या काळात महिला बाउन्सर असा शब्दही नवीन होता, तेव्हापासून धडाडीनं समीक्षानं बाउन्सर म्हणून ओळख कमावली. तिच्या कामाचं वेगळेपण पाहून एका जर्मन फिल्ममेकरनं तिच्यावर एक डॉक्युमेण्टरीही बनवली. २९ वर्षांची समीक्षा गेली तीन वर्षे लेडी बाउन्सर म्हणून काम करते आहे. रात्री ती बाउन्सर म्हणून काम करते, दिवसा ठाण्यात एक जिममध्ये इन्स्ट्रक्टर म्हणूनही काम करते. ठाण्यातल्या ‘टल्ली - द अनरिफाइण्ड लाउन्ज’मध्ये रात्री बाउन्सर म्हणून काम करते. घरी वडिलांची काळजी घेते, घर चालवते. पाच वर्षांपूर्वी आई गेली, त्यानंतर तिनं स्वत:सह घर आणि वडिलांनाही उत्तम सांभाळलं आणि बाउन्सर म्हणून आपली स्वतंत्र ओळख कमावली. विशेष म्हणजे हॉटेल इंडस्ट्रीतल्या नव्या सेवाक्षेत्रात मुलींना बाउन्सर म्हणूनही काम करता येऊ शकतं यासाठीची रुजवातही तिनं करून दिली.

समीक्षा सांगते, जिममध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून काम करताना मी अनेकदा बाउन्सरबद्दल ऐकलं होतं. त्यांच्या या कामाचं कुतूहलदेखील होतं. पण, हे काम कधी आपल्याला करायला मिळेल असं वाटलं नव्हतं. पण एक दिवस अचानकच विचारणा झाली की, बाउन्सर म्हणून काम करशील का? मी पटकन होकार भरला कारण ही एक वेगळ्या कामाची संधी आहे हे मला जाणवत होतं. मुळात मी मध्यमवर्गीय घरातली. तसं या क्षेत्रात काम करण्याचं काही आर्थिक कम्पल्शन नव्हतं. उलट मला या क्षेत्राचं कुतूहल होतं, एक नवीन क्षेत्र, एक नवीन संधी म्हणून मी या कामाकडे पाहिलं. असं कसं रात्री काम करणार असं काही मनातही आणलं नाही आणि नवीन काम म्हणून अपार उत्सुकतेनं या संधीकडे पाहिलं. अर्थात सुरुवातीला पब, नाइट क्लबमध्ये ‘बाउन्सर’ म्हणून एक मुलगी उभी आहे हे पाहताच तिथं आलेल्याला धक्का बसायचा. काहींच्या नजरेत आश्चर्य, कौतुक अशाही भावना दिसायच्या. पण नंतर नंतर मला आणि इथं येणा-या लोकांनादेखील याची सवय व्हायला लागली. त्यांच्या नजरेतही आदर दिसायला लागला. बाहेर कुठे भेट झाली तर लोक आवर्जून बोलू लागले, ओळख सांगू लागले.
मात्र अनुभवावरून सांगते, या क्षेत्रातही प्रचंड मेहनत आहे. घरी यायला रात्री जवळपास मध्यरात्रीचे दोन ते अडीच वाजतात. शिवाय, कामाच्या ठिकाणाहून मला ड्रॉपही मिळत नाही. मी माझ्याच गाडीने ये-जा करते. बाउन्सर म्हणून कामाला सुरुवात केली, तेव्हा तर अशा अवेळी येण्याने सोसायटीतल्या लोकांना अनेक प्रश्न पडायचे. पण, जेव्हा कामाचं स्वरूप कळलं, त्यानंतर मला सगळ्यांकडून सहकार्यच मिळालं. इथे काम करायचं म्हणजे फिजिकल आणि मेंटल फिटनेस हा सर्वात महत्त्वाचा. त्याबरोबरच पेशन्सही अत्यंत आवश्यक आहेत. आपण जिथे काम करतो, तिथे येणाºया ग्राहकांशी अत्यंत सौजन्याने वागणं, फार गरजेचं असतं. आपल्या तिथल्या वावरण्यानं आपल्याबद्दल लोकांच्या मनात विश्वास निर्माण व्हायला हवा, भीती नव्हे,’ असं समीक्षा सांगते.

गर्दी कशी सांभाळायची, एखादी अप्रिय घटना किंवा भांडण वगैरे होत असेल, तर ते कसं थांबवायचं, सेलिब्रिटी किंवा अन्य पाहुण्यांना गर्दीत व्यवस्थित कसं सांभाळायचं, अशा अनेक गोष्टींचं नियोजन तिला करावं लागतं. पबमध्ये येणा-या, मद्यपान करणाºया महिलांना सावरण्याचं कामदेखील तिला करावं लागतं. अतिमद्यपान केल्यानंतर अशा नाइट क्लब किंवा लाउन्जमध्ये होणारी भांडणं सोडवावी लागतात, तीही शांतपणे. इथं संयमाची आणि संवाद कौशल्याचीही कसोटी लागते. पब किंवा लाउन्जमध्ये असे काही भांडणाचे प्रसंग आलेच तर आम्ही संबंधिताना तीनवेळा वॉर्निंग देतो. पण त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर मात्र त्यांना बाहेर काढण्यावाचून आमच्याकडे काही पर्यायच नसतो असं समीक्षा सांगते.
मात्र या कामाची जशी संधी आहे, तसं आव्हानही हेही ती आवर्जून सांगते. म्हणते, या क्षेत्रात फिजिकल फिटनेस फार गरजेचा आहे. नियमित वर्कआउट करायलाच हवं. अगदी सेल्फ डिफेन्स म्हणून कराटे येणं ही आजच्या काळातली फारच आवश्यक गोष्ट आहे. समीक्षा स्वत: कराटेमधील कुमिते प्रकाराची नॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे.
केवळ पुरुषांचं म्हणून ओळखल्या जाणा-या या क्षेत्रात आज समीक्षा पाय घट्ट रोवून उभी आहे. ठाण्यातील पहिली लेडी बाउन्सर ही तिची ओळख ती सार्थ ठरवते आहे.

समाधान आहेच..
मी माझ्या कामाबद्दल अत्यंत समाधानी आहे. मला स्वत:ला महिला म्हणून या क्षेत्रात कधी त्रास झाला नाही. जरी काही वाईट अनुभव आलेच, तर त्याला तोंड देण्याची माझी तयारी नेहमीच असते. एकूणच अनेकदा पबबाहेर, क्लबबाहेर माझ्यासोबत फोटो काढतात, ते फार छान वाटतं. आवर्जून कामाची दखल घेतात, प्रतिसाद देतात, तेव्हा खूप बरं वाटतं. मागे एकदा रशियावरून काही गेस्ट आले होते, त्यांनीदेखील लेडी बाऊन्सर म्हणून माझं कौतुक केलं.

 

Web Title: Bouncer Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.