बॉयफ्रेण्ड
By admin | Published: June 3, 2016 12:43 PM2016-06-03T12:43:31+5:302016-06-03T12:43:31+5:30
मला कॅन्सर झाला म्हणून तो हळवा, टेन्शनमध्ये नव्हता आणि ‘तुम मुझे भूल जाओ. मै तुम्हारे लायक नही हूँ’ अशा माइंड सेटमध्ये मी तर कधीच नव्हते. त्यावेळी त्याच्या अनेक मित्रांना तो म्हणजे प्रेम आणि त्यागाचा हिरो वाटत होता.
Next
>
मला कॅन्सर झाला म्हणून तो हळवा, टेन्शनमध्ये नव्हता आणि ‘तुम मुझे भूल जाओ. मै तुम्हारे लायक नही हूँ’ अशा माइंड सेटमध्ये मी तर कधीच नव्हते. त्यावेळी त्याच्या अनेक मित्रांना तो म्हणजे प्रेम आणि त्यागाचा हिरो वाटत होता. आणि माझ्या काही मैत्रिणी म्हणायच्या,
‘लकी आहेस तू.’! पण आम्ही मात्र एकमेकांना कोणत्याही प्रकारचे कसमे-वादे दिले घेतले नाहीत.
आमचं एकमेकांबरोबर असणं आमच्या दृष्टीनं पुरेसं होतं. आगे क्या होगा, किसने सोचा था..
कॅन्सर डेज्
ऐन विशीत कॅन्सरशी सामना करून मिळवलेल्या हिमतीची जिगरबाज गोष्ट
डॉ. व्यास, मी आणि आईची मैत्रीण डॉक्टरांच्या केबिनमध्ये बसलो होतो. त्यांनी माङो रिपोर्ट्स बघून मला कॅन्सर असल्याचं सांगितलं.
बाहेर वेटिंग रूममध्ये मुकेश बसला होता.
मी बाहेर येऊन त्याच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडत होते. त्याला त्यावेळी काय वाटलं हे मी कधीच विचारलं नाही. पण तो प्रत्येक वेळी बरोबर होता. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष.
बाबांना आमच्या रिलेशनशिपबद्दल काहीच माहीत नव्हतं. आमचे एक फॅमिली फ्रेण्ड डॉक्टर होते. त्यांना आमच्या अफेअरबद्दल माहिती होतं. मुकेशला ते भेटले होते. त्यांनी बाबांना स्पष्ट सांगितलं की, ‘‘शचीला बरं वाटणार असेल तर मुकेशला हॉस्पिटलला येऊ दे. तू त्याला आडकाठी करू नकोस.’’
म्हणून कदाचित मुकेशचं माङयाबरोबर असणं त्यांनी स्वीकारलं. मनापासून की नाइलाजानं ते माहीत नाही..
कॅन्सर डिटेक्ट झाला तेव्हा वाटलं, मुकेश मला सोडून जाईल. आमचं ब्रेकअप होईल. कदाचित लगेच नाही जाणार पण थोडय़ा दिवसांनी, माझी ट्रिटमेंट संपल्यावर कदाचित जाईल. म्हणजे भीती नव्हती वाटली, पण अंधुकसा असा एक विचार आला होता मनात, इतकंच.
त्याला विचारलंही मी. पण तो म्हणाला, मला आवडतेस तू. माझं प्रेम आहे तुङयावर. मग कॅन्सर असल्यानं काय फरक पडतो? मी तेव्हा बरं म्हटलं. पण पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारत राहिले. शेवटी तोच म्हणाला, तुला करायचंय का ब्रेकअप?
तेव्हा मी गप्प बसले.
तो पहिल्यांदा टाटा हॉस्पिटलला आला तो माङया ऑपरेशननंतर. मला बघायला. नाकाला ऑक्सिजन मास्क. सलाइन. हे सगळं बघून तो घाबरला आणि त्याला असं घाबरलेलं बघून मी घाबरले. बाबाही तिथंचं होते त्यामुळे फार काही बोलता आलं नाही. बाबांनी त्याला विचारलं, ‘‘तू थांबतोयस का? तर मी चहा पिऊन येतो.’’ तो हो म्हणाला. बाबा गेले. जेमतेम दहा मिनिटं असतील, आम्ही खूप दिवसांनी भेटत होतो. काहीच बोलत नव्हतो. त्यानं विचारलं, ‘‘बरी आहेस का?’’
मी- ‘‘हो’’
‘‘लवकर बरी हो. मग आपण पाणीपुरी खायला जाऊ’’ - तो म्हणाला.
मी हसले. ‘हो’ म्हणाले.
मग दोघांनी एकमेकांची फालतू चौकशी केली. तू जेवलास का, तू जेवलीस का, आज ऑफिस नाही का, बाकी दोस्त मंडळींची काय खबर, त्याला बहुतेक माङया बाबांची भीती वाटत होती. मला त्याचं हसायला आलं. बाबा येईर्पयत आम्ही दोघांनी अशाच पकाव गप्पा मारत वेळ काढला. बाबा चहा पिऊन आले. तो बाबांशी जुजबी बोलला आणि गेला. ‘हुश्श्श्श!’ त्यानं मनात म्हटलं, पण मला ऐकू आलं.
टाटाबाहेरचं माझं जग इंटरेस्टिंग पण नॉर्मल राहील याची त्यानं पुरेपूर काळजी घेतली. किमोथेरपी झाली की दुस:या किंवा तिस:या दिवशी माझं नॉर्मल आयुष्य सुरू होतं असे. बाइकवरून सुसाट फिरणं, वरळी सी फेसला बाकावर बसून गप्पा, चायना मॅनचं मंचाव सूप किंवा कीर्ती कॉलेजचा वडापाव आणि रात्नी अकरार्पयत घरी. मग रात्नी एक-दोन वाजेपर्यंत फोनवर गप्पा.
आमच्या रुटीनमध्ये काहीच फरक नव्हता. आधी आणि कॅन्सर असताना. फिरणं, गप्पा आणि भांडणंसुद्धा. किमो सुरू असताना मला उग्र वास जराही सहन व्हायचे नाहीत. डोकंच फिरायचं. मुकेश भसाभस डिओ लावून यायचा. बाइकवर मागे बसून माङया अंगाला, बॅगलाही त्याच्या डिओचा वास यायचा. मग आमचं भांडण. मला भेटू नकोस, तुला एकदा सांगून कळत नाही का, मला त्नास होतो, नको लावू इतका डिओ. माझा आरडाओरडा. तो बरं म्हणायचा. पण पुढच्यावेळी भेटायला येताना तोच घमघमाट घेऊन यायचा. मग आम्ही पुन्हा भांडायचो. त्याला बहुधा माझं हे वागणं किमोचाच साइड इफेक्ट वाटत असावा.
आमचं दोघांचं वागणंही अगदी टिपिकल गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचं असतं तसंच होतं. मला कॅन्सर झाला होता म्हणून तो हळवा, टेन्शनमध्ये नव्हता आणि ‘तुम मुङो भूल जाओ. मैं तुम्हारे लायक नही हूँ’ अशा माइंड सेटमध्ये मी तर कधीच नव्हते. त्यावेळी त्याच्या अनेक मित्नांना मुकेश म्हणजे प्रेम आणि त्यागाचा हिरो वाटत होता. आणि माङया काही मैत्रिणी, ‘लकी आहेस तू, तो तुङया बरोबर आहे. कौतुक आहे त्याचं’ असं काहीसं बरळत असायच्या.
मला कॅन्सर झाला आणि त्यानं मला सोडलं नाही यात मी लक मानण्यासारखं काय होतं.? मॅड लोकं!
हां, फक्त आमचं भांडण झाल्यावर ‘मी आहे म्हणून तुला सहन करतोय’ अशा ट्रॅकवर आमचं संभाषण येणार नाही याची मात्र तो काळजी घ्यायचा. पण मला तसा संशय अधूनमधून यायचा. मला कॅन्सर डिटेक्ट झाल्यावरही आम्ही बसून, बोलून आता काय करायचं असं काही ठरवलं नाही. कोणत्याही प्रकारचे कसमे-वादे दिले घेतले नाहीत. बेसिकली मला वाटतं, ते आमचं वयच नव्हतं की आपलं नातं आणि आयुष्य कसं असेल असा काही असं काही विचार करण्याचं. इनफॅक्ट त्यावेळी आम्ही लग्न करायचं की नाही याचाही विचार केला नव्हता. निदान मी तरी नव्हता केला. आमचं एकमेकांबरोबर असणं आम्हाला आवडत होतं आणि आमच्या दृष्टीनं तेच पुरेसं होतं. आगे क्या होगा, किसने सोचा था..
पण आम्ही पुढे चालत गेलो, दिवस, वर्षे मागे सरत गेली आणि हाच बॉयफ्रेंड मुकेश, आज माझा नवरा आहे.
- शची मराठे
shachimarathe23@gmail.com
(कॅन्सरशी यशस्वी लढा देऊन आशावादी जगणं जगणारी शची ही एक मुक्तपत्रकार आहे. आणि न्यूज चॅनलमध्येही तिनं काम केलेलं आहे.)