ब्रॅण्डेड कपडे आणि वागणं फुसकं?
By admin | Published: April 10, 2017 05:53 PM2017-04-10T17:53:43+5:302017-04-10T18:01:28+5:30
ब्रॅण्डेड कपड्यांवर नाही आपल्या वागणूकीवर ठरते आपली किंमत, हे आपण कधी समजणार?
- धनंजय काळे
स्टॅण्डर्ड, क्लासिक, एवन हे शब्द हमखास प्रत्येकाच्या तोंडावर हल्ली असतात. ब्रॅण्डेड कपडे घालायचे, सगळ्यांच्या नजरेत भरायचं, ब्रॅण्डेड टी शर्ट्स, जीन्स, शूज घालायचे आणि उड्या मारायच्या, मिरवायचं..
हे आपल्याला फार महत्वाचं वाटतं. कुठेही जाताना ब्रँडेड कपडे घालायचे, आपलं राहणीमान स्टॅण्डर्ड ठेवाचयं, कोण बघेल का, कोण बघतंय याचा सतत विचार करायचा.
कोणी कोणत्याही कंपनीचे कपडे, शूज, बॅग्ज, शर्ट, टी-शर्ट घालायचे आणि ते फक्त महाग असले पाहिजेत बस्स! म्हणजे ते चांगले असा हा विचार. चारचौघात काही येत असो वा नसो. कोणत्याही पार्टीत, इव्हेण्टमध्ये जाऊन दारू पिणं नाचणं हे ही मग त्यापाठोपाठ स्टॅण्डर्ड होत चालांय.
दारू न पिणारा आता अनेकांना मागास वाटतो. म्हणजे दुनिया जे करते ते आपण केलं नाहितर आपण मागास, आऊटडेटेड आणि आणि नशा करणं म्हणजे स्टॅण्डर्ड, नेमकं कुठं चाललोय आपण? आता तर अनेकजण ग्रुपसुद्धा आपल्या पद्धतीने निवडतात. पिणारा ग्रुप आणि न पिणारा ग्रुप असे सरसकट गट पडतात.
पण यासाऱ्यात योग्य काय याचा काही विचार केला जात नाही.
खरंतर माणूस विचाराने ब्रँडेड पाहिजे, कपड्यांनी नाही. विचार स्टँडर्ड पाहिजे. आपल्या शरीराचा सीपीयू ब्रँडेड पाहिजे तरच मग आपलं सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर चांगलं काम करेल. आपल्या विचार करण्याच्या क्षमतेवरून माणूस ठरला पाहिजे. कपड्यांवरून नाही.
अंगावर सगळं ब्रँडेड, आई-वडिलांनी कमवून दिलेलं आणि टवाळखोर. काहीही कर्तृत्व नाही, असं काय कामाचं? तुम्ही स्वत: कोण आहात ते शोधा मग दुसऱ्याचे दोष दाखवा आणि जज्ज करा.
रस्त्याने जाताना कचरा टाकायचा, गाडीचा हॉर्न वाजवायचा, नाहीतर मग स्टण्ट करायचे. मोठ्या आवाजात बसमध्ये गाणी वाजवायची आणि जोरात गाडीचा आवाज करून निघून जायचं. त्यांना वाटतं कि ते तिथून निघून गेल्यावर लोकं त्यांच्याकडे (मुले/मुली) आकर्षित होतील. हे सगळं करण्यात त्यांच्या आयुष्याचा वेळ वाया जातो हे कळत नाही.
हे सारं करुन आपण काय कमावणार? आपलं वर्तन, विचार आणि आपलं कर्तृत्व, साधेपणा ही श्रीमंती जास्त महत्वाची असते.